चौथा विद्यार्थी दिवस साजरा ; सप्तरंगी साहित्य मंडळाचा पुढाकार
नांदेड –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करीत शिक्षण घेतले. त्यांच्या शिक्षणामुळे भारतातील विद्यावंचितांच्या जीवनाला योग्य आकार मिळाला. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या आणि माणूसपण नाकारलेल्या मानवी समुहात शिक्षणामुळे क्रांती घडून आली. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन शिकणारा विद्यार्थी आजन्म विद्यार्थीच असतो असे प्रतिपादन येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. भीमराव तलवाडे यांनी केले. ते विद्यार्थी दिनानिमित्त शहरातील महामायानगरात आयोजित चर्चासत्रात बोलत होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, मंडळाचे कोषाध्यक्ष, समीक्षक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, अभिनव तलवाडे, सृष्टी तलवाडे, दीक्षा तलवाडे यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभरात साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करुन चौथा विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन : एक ऐतिहासिक दिवस’ या विषयावर डॉ. तलवाडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या कुटुंबाला कसलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना मी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिकलो पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सेट नेट, पीएचडी मिळवली. बीएड आणि एलएलबीचे अभ्यासक्रमही पूर्ण करीत आहे. माझी शिकण्याची इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही. आजच्या विद्यार्थ्यांनी इतर वाम मार्गाला न लागता शिक्षणाची कास धरली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
आॅनलाईन पद्धतीने चर्चासत्रात सहभागी होतांना प्रा. प्रकाश भुतांगे म्हणाले की, निश्चितच, अज्ञानांना ज्ञान अर्जित करण्याची प्रेरणा मिळाली, स्वाभिमान शून्य लोकांना स्वाभिमानी जीवनाची जाण झाली आणि सर्वात महत्वाचे बाबासाहेबां मुळेच प्रतिष्ठित , सन्मार्गाने जीवन जगण्याचा मार्ग मिळाला म्हणूनच या दिवसापासून एका नवीन क्रांतीची सुरवात झाली. शिवाजी कांबळे यांनी बाबासाहेबांनी उचलेले प्रत्येक पाऊल,त्यांची एक-एक पदवी आमच्या साठी खूप मोठा सण आहे, या शब्दांत बाबासाहेबांचा गौरव केला. किशनराव बडवणे या चर्चासत्रात सहभागी होतांना बाबासाहेबांचा शाळा प्रवेश म्हणजे एका मोठ्या क्रांतीचा आरंभ बिंदू आहे. अगर या शाळेत बाबासाहेब आंबेडकरांनी पाऊल टाकले नसते, तर आज आपण जे आहेत ते नसतो, असे मत नोंदवले. या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून गंगाधर ढवळे यांनी काम पाहिले. तर आयोजनासाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, एकनाथ कार्लेकर यांनी परिश्रम घेतले.