शिवास्त्र …. एक छिद्र उरलेलं

शिवास्त्र : एक छिद्र उरलेलं


आपल्या लहानपणी जवळपास आपण सर्वांनीच एक कथा ऐकली आहे, कदाचित आजही तुम्हाला ती कथा जशास तशी आठवत असेलही – एक गरीब म्हातारा राजधानीला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो राजाला भेटला. परंतु तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं राजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली. तेव्हा राजे त्याला म्हणाले, ‘आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.’ तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला. या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले राजकुमार ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर राजकुमार राजाला म्हणाले, ‘महाराज, आपण त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण एक विचारू.? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते.?’ राजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं. राजकुमारांनी विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो त्यालाच आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. 
‘तो कालच मला भेटला होता, आज तो नाहीये. तो मघाशीच माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.’ असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. हा क्षण माझा आहे, पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर, लबाडी, चोरी, विश्वासघात या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर, ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी प्रेमळ जीवणगाणं.!
जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात. जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात. जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय.? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण.? कुठल्या रूपात मागे उरतो आपण.? 
माझ्या घरात आज मी आहे, उद्या मी नसेन, माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल, त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो. काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल. आणखी काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल आणि मग त्यानंतर पिढ्यान्-पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.! आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण ‘उत्सवात’ करायचं का.? 
कोणाला ही दुखवू नका, कोणालाही कमी लेखू नका, कोणाचाही अपमान करु नका, तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडेच येणारे असते. चोरी, लबाडी, गद्दारी, लाचारी अपमानास्पदच ठरते तर प्रामाणिकपणा, स्वाभिमान, सत्यवचन सन्मानजनकच राहतो. तुम्ही इतरांना मान दिला तरच तुमचा सन्मान होतो, कारण जे पेरतो तेच उगवते.!  त्यामुळे स्वतः आनंदाने जगावे आणि दुसऱ्यांना आनंदाने जगू द्यावे..

इंजि. शिवाजीराजे पाटील, नांदेडमास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *