वर्षाव कौतुकाचा
योगेश अशोकराव बावणे IAS
नायगाव
नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी हे गाव महणजे ग्राम स्वच्छता अभियानातील एक तीर्थक्षेञ . अनेक पुरस्काराने सन्मानीत झालेलं एक आदर्श गाव. त्याच कालावधीत नांदेड येथे कर्मयोगी जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकर परदेशी यांनी कॉपी मुक्त अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही हा उपक्रम नेटाने राबवला. त्याच अभियानात दहावी परिक्षेत तावून सुलाखून निघालेला याच गावाचा विद्यार्थी योगेश अशोकराव बावणे.
गावात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या परदेशी साहेबांना त्यानं पाहिलं ,ऐकलं आणि वज्र निर्धार केला की आपणही एक ना एक दिवस कलेक्टर व्हायचंच. सोळाव्या वर्षी पाहीलेलं स्वप्न मोठं असलं तरी कठीण नव्हतं. “असाध्य ते साध्य करीता सायास Iकारण अभ्यास तुका म्हणे II ग्रामीण भागातच बारावीला प्रवेश घेउन जिल्ह्यात सर्व द्वितीय येण्याचा बहुमान ही त्यानेच पटकावला. त्यामुळे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या निता अंबानी पुरस्काराचा मानकरी ठरला. राज्यस्तरीय CET परिक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन काॅलेज ऑफ इंजिनीअरिंग ( COEP) पुणे येथील सरकारी काॅलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून पदवी शिक्षण पूर्ण केलं. चांगल्या कंपनीतील नोकरीच्या ऑफर चा त्याग केला. यातच त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास दिसून येतो .व्यापक समाजसेवेचं माध्यम म्हणून सिव्हिल सर्व्हिस च करायचं हे स्वप्न उराशी बाळगून ध्येयाप्रत वाटचाल चालु ठेवली. आत्मविश्वासाला कठोर मेहनत, चिकाटी व दृढनिश्चयाची जोड देत, समाजमाध्यमापासून चार पावले दूर रहात पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये 231 वी रँक पटकावत IPS या पोलीस सेवेतील पदाला गवसणी घातली. पण स्वप्न साकार झाले नाही.
Success is a journey not a destination.
या प्रमाणे त्याने पुन्हा IAS ने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या पदाला पाञ व्हायचंच असं ठरवून वर्षभर सातत्य पूर्ण व नियोजनबध्द अभ्यास करून अखेर भारतात 63 वी रँक मिळवून आपले IAS होण्याचे स्वप्न साकारले. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाच्या मुलाने एवढे उत्तुंग यश मिळवले म्हटल्यावर जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांना आनंद होणे साहजिकच आहे. त्यामुळे दिवसभर सोशिएल मिडीयावर योगेश बावणे आणि त्यांच्या परिवारावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचेच औचित्य साधत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्री संजय बेळगे व माजी जि.प.अध्यक्ष श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी आपल्या दालनात योगेश बावणे यांचा त्यांच्या वडीलासह यथोचित सत्कार व अभिनंदन केले.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, आगळे, इंगोले,पाटील, श्रीनिवास मोरे( मा.जि.प.सदस्य ) अधिकारी व पदाधिका-यासह सह शिक्षक नेते चंद्रकांत दामेकर, मधुकर उन्हाळे, डाॅ.हेमंत कार्ले , संजय कोठाळे, विठ्ठल ताकबिडे आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभकामना दिल्या……….