भांडण तंटे हेवे दावे नको इशारे नकोत नारे,
जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!
नको बंधने शरिरावरती
नको कुंपणे घराभोवती,
मन स्वप्नांची बाग फुलविण्या
घेऊ भरारी क्षितिजावरती
कवेत घेऊ डोंगर झाडे अथांग सागर नदी किनारे,
जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!
हव्या कशाला मंदिर मशिदी
बायबल आणि कुराण गीता,
समानतेचा मंत्र जपुनी
लिहू आगळी जीवनगाथा
सुरात गाऊ एकदिलाने माणुसकी हा धर्म खरा रे,
जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!
नकोच पैसा नकोच सत्ता
कोरुन घेऊ हृदयावरती,
किती जमविला पैसा अडका
शेवट आहे सरणावरती
सोडुन देऊ लोभ लालसा नको तिजोरी नको पहारे,
जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!
भांडण तंटे हेवे दावे नको इशारे नकोत नारे,
जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कण कण सारे !!
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२