कवी – मनमोहन नातू
कविता –
- ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
- मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
गोपाळ नरहर नातू (मनमोहन नातू).
जन्म – ११/११/१९११ (माणगाव, कोल्हापूर).
मृत्यू – ०७/०५/१९९१
लोककवी मनमोहन या नावाने प्रसिद्ध.
मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपण नाव होते.
कवी मनमोहन यांनी अंदाजे ५००० मंगलाष्टके, कविता, भविष्ये, कादंबऱ्या, लघुलेख असे विविध प्रकारात लेखन केले.
कवी मनमोहन यांचे शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण, तळेगाव अशा विविध ठिकाणी झाले.
मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषेतील साहित्याचे त्यांनी सखोल वाचन केले.
सुप्रसिद्ध कवी जयकृष्ण केशव उपाध्ये आणि अर्वाचीन मराठी वाङमय सेवककार श्री.गं. दे. खानोलकर यांचे मनमोहन यांच्यावर संस्कार झाले होते.
कवितेला अवघे जीवन वाहिलेल्या काहिशा विलक्षण आणि दीर्घजीवी प्रतिभेचा कल्पक कवी म्हणून त्यांची प्रतिमा आजही रसिकांमध्ये अढळ आहे.
कवी मनमोहन यांनी सामाजिक, विनोदी, विडंबन, उपहास, मार्मिक अशा विविध विषयांवर कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेला भावगीत हा प्रकार रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाला.
आधुनिक काळात गांधीजी, सुभाषचंद्र, सावरकर, तर ऐतिहासिक काळात शिवाजी, संभाजी, डेंगळे यांच्या गौरवार्थ त्यांनी अनेक कविता केल्या.
लोकविलक्षण, स्वैर आणि अनिर्बंध ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यात त्यांची प्रतिमा होती.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा कवी अशी त्यांची ख्याती होती.
सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ताजीतवानी वाटतात.
“मैत्रिणींना सांगू नका नाव घ्यायला” हे त्यांचे अतिशय गाजलेले गाणे आजही नववधुंना लाजवते.
उद्धार, कॉलेजियन, बॉम्ब, युगायुगांचे सहप्रवासी हे त्यांचे दीर्घ कविता संग्रह, तर अफुच्या गोळ्या, शिवशिल्पांजली, सुनीतगंगा असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले.
छत्रपती संभाजी, संभवामी युगे युगे, तोरणा, प्रतापगड, आग्र्याहून सुटका, सूर्य असा मावळला, छत्रपती राजाराम, छत्रपती शाहू असे त्यांनी कादंबरी गद्य लेखनही केले.
आमुचे नाव आसू गं, आरसा फोडलात तुम्ही, कसा गं बाई झाला, जेव्हा पदराला ढळल्या, ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती, मी मुक्तांमधला मुक्त, मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला, विश्वाशी मी वैर धरीले, शव हे कवीचे जाळू नका हो, सांग पोरी सांग सारे, हळू हळू बोल कृष्णा हळू हळू बोल….
अशा त्यांच्या अनेक कविता/गाणी आजही रसिक मनावर राज्य करीत आहेत.
गांधीजींच्या आणि सावरकरांच्या गौरवार्थ त्यांनी केलेल्या रचनांचा आस्वाद आपण घेऊयात. स्वातंत्र्यासाठी चंदनाच्या देहाप्रमाणे झिजलेला अहिंसेचा पुजारी असे आपल्या कवितेमध्ये कवी मनमोहन यांनी गांधीजींचे वर्णन केले आहे.
तर सावरकर तुरुंगात असताना त्यांची साहित्यिक प्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तेव्हा त्यानी जेल अधिकाऱ्याकडे लिहिण्यासाठी कागदांची मागणी केली. ती मागणी अमान्य करण्यात आली. त्यानंतर सावरकरांनी त्यांच्या रचना कोळशाने कैदेतल्या भींतींवरती लिहिल्या. त्यावेळच्या परिस्थितीवर मार्मिक रचना कवी मनमोहन यांनी केली.
या दोन्ही रचनांचा आस्वाद आपण घेऊयात –
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती
झुंजला राजासवें हा, रंगला रंकासवें हा
पेटता देहेहि आता दिव्यता दावून जाती
चंदनाचे खोड लाजे हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती
पृथ्वीच्या अक्षाशी लाली, पृथ्वीच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापताती
नाव ज्याचे ऐकुनिया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी नाम रामाचे मुखी
सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी
- लोककवी मनमोहन नातू
■■■
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||
— लोककवी मनमोहन नातू.
■■■
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/