नांदेड जिल्ह्यात एड्स दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची माहीती

नांदेड दि. 4 :

– जिल्ह्यात सुमारे 6 हजार 374ॲक्टीव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुष 2 हजार 953, महिला 2 हजार 938 , टीजी 12, बालक 460 आदींचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देवून मोफत बस प्रवास, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदि सुविधांचा लाभ पोहचावा. यादृष्टीने एनजीओमार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

जागतिक एड्स दिनानिमित 1 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री. गरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालय नांदेड अंतर्गत एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक एड्स दिनानिमित जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जागतिक एकता आणि सामुहिक जबाबदारी याद्वारे आपण एचआयव्ही, एड्स विरूध्द जनजागृती करून एड्सचा धोका टाळु शकतो असे आवाहन केले आहे.

यामध्ये सोशल मिडीया वरती एचआयव्हीची माहिती देणारे विविध व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले. तसेच मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे कोविड 19 चे नियम पाळुन एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मास्क डिझाईनिंग, जिआयएफ, मिम्स, सेल्फी विथ स्लोगन आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नेहरू युवा केंद्रातील युवा क्लबच्या माध्यमातुन जिल्ह्यातील वीस गावामध्ये एचआयव्ही,एड्स बद्दल जनजागरणाकरीता वॉल पेंटींग आणि पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले. गरोदर मातापासुन बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल. जागतिक एड्स दिनानिमित एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देवुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रायवेट हॉस्पीटल (पीपीपी) ज्यांनी गरोदर मातासाठी उत्कृष्ट काम केले. त्यांना देखील प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *