फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
जिद्द , चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर नक्कीच यशाचे शिखर सर करायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागत नाही अशी प्रतिक्रिया देणारे संग्राम दगडोबा कागणे रा. भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील पहिले रेल्वे चालक ठरले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
शकुंतलाबाई व दगडोबा कागणे या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी संग्राम व भीमराव हे दोन पुत्ररत्न जन्माला आले. वडील अल्पभूधारक शेतकरी , घरची एक एकरच शेती असतानाही काबाडकष्ट करून आणि मोलमजुरी करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले आणि जे काबाडकष्ट आपल्या नशिबी आहेत ते किमान आपल्या मुलांच्या तरी नशिबी येऊ नयेत असेच प्रत्येक आईवडीलाची इच्छा असते त्यातलेच हे पण आईवडील होते.
संग्राम कागणेचा छोटा भाऊ भीमराव कागणे हा यापूर्वीच भारतीय सैन्य दलात भरती झाला असून नुकतेच संग्राम कागणे यांची भारतीय रेल्वेत चालक या पदावर निवड झाली असून ते आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ट्रेनिंगला विशाखापट्टणम येथे रुजू झाले आहेत. संग्राम चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे हाडोळी ब्र. येथील पुंडलिक विद्यालयात झाले तर ११ वी , १२ वी ही कुरुळा येथील श्री शिवाजी कॉलेज येथून पूर्ण केले. त्यानंतर पदमभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून त्यांनी मेकॅनिकल ब्रँच मधून इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले व गुट्टे अकॅडमी नांदेड येथून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
२०१८ साली प्रकाशित झालेल्या जाहिरारी प्रमाणे त्यांनी अर्ज दाखल करून प्री व त्यानंतर मेन परीक्षा देऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. या यशात माझ्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा असून वेळोवेळी मला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनाबरोबरच त्यांचे मामा केशव पंढरी गुट्टे यांचेही मोलाचे सहकार्य असल्याचे बोलून दाखवले.
पुढे बोलताना ते म्हणाले की रेल्वे भरतीत नेहमीच उत्तर भारतीय लोकांचेच फार वर्चस्व असते कारण रेल्वेच्या परीक्षा या सीबीएसई पॅटर्न नुसारच होत असतात तेंव्हा आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी त्याच धर्तीवर अभ्यासाला प्राधान्य देऊन सातत्याने प्रयत्न केले तर नक्कीच यश हे हाती लागल्याशिवाय राहणार नाही याचा मी स्वतः अनुभव घेतला असून माझ्या महाराष्ट्रीयन बंधू भगिनींनी ही तसाच शैक्षणिक जीवन प्रवास करावा असा मोलाचा सल्ला ही संग्राम कागणे यांनी दिला.