रावसाहेब दानवे आणि जोडे मारो आंदोलन

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. “शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही”, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. यावरून अनेकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दानवे यांच्या या विधानाचा दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीने निषेध केला आहे.

रावसाहेब दानवेंचं हे विधान अपमानजनक असल्याचं शीख संस्थेनं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांचा विरोध करण्यासाठी त्यांना राष्ट्रद्रोही आणि अराजक असल्याचं देखील म्हटलं जात असल्याचं शीख संस्थेने म्हटलं आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीचे अध्यक्ष एस. मजिंदरसिंह सिरसा यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी “शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सरकार मात्र न्याय देण्यात असमर्थ आहे. जे शेतकरी स्वत: देशासाठी लढत आपला जीव अर्पण करतात, अन्नधान्य पिकवतात, ज्यांची मुलेही देशासाठी शहीद होतात, त्यांना देशद्रोही दाखण्याचा प्रयत्न करू नका” असं म्हटलं आहे.

रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. “आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असेही दानवे म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जर केंद्रीय मंत्र्याला शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचा सुगावा लागला आहे, त्यांनी संरक्षण मंत्र्यांना तातडीने याची माहिती द्यायला हवी. तसेच चीन आणि पाकवर लगेचच सर्जिकल स्ट्राईक करावा. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि सैन्यदलाच्या प्रमुखांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा टोला लगावला आहे.

केंद्रीयमंत्री रावासाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनास चीन आणि पाकिस्तानचं पाठबळ असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, राज्यात दानवेंविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांचा निषेध नोंदवत पुतळेही जाळण्यात आले.

संगमनेर येथे दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नेहमीच द्वेषपूर्वक विधान करणाऱ्या दानवेंचा निषेध करण्याचे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिले होते. त्यानुसार संगमनेरात शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या फोटोलो जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अकोटात दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात आली.

जळगाव येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी जळगाव महापालिका इमारतीसमोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण फासून संताप व्यक्त केला. आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या भरवल्या. त्याचप्रमाणे सर्व आंदोलकांनी दानवे यांच्या पुतळ्याला शेण भरवून त्यांना आता तरी अक्कल येईल, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपचे मंत्री नेहमी प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवून आंदोलन केले. यावेळी मोटरसायकल-सिलेंडर यांची प्रतिकात्मक मिरवणूक काढली. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा दहन केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे विधान केले आहे. त्यांची मंत्री पदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली

लॉकडाऊन लागू झाल्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी गाडी लोटो आंदोलन केले. यावेळी दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसोबतच केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पाच कंदिल चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर गाडी लोटो आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आले.

केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलची सतत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे शिवसेनेने चंद्रपूर जिल्हाभरात आंदोलन केले. चंद्रपूर येथील गांधी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्त्व्याचा निषेध म्हणून त्यांचा पुतळा तुडविण्यात आला.

पेट्रोल डिजेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या वाढीविरोधात शिवसेनेतर्फे संताप व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्रसरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदा समंत केला. त्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र हे आंदोलन पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याची टिका भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केली. त्या वक्तव्याच्याही निषेध करुन त्याचा पुतळा तुडवून त्यांना जोडे मारण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा विरोध व भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा निषेध म्हणून शनिवारी येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

आनंदराव पवार म्हणाले, केंद्र सरकार तळागाळापर्यंत असणाऱ्या घटकांचा विचार न करता देशात काम करत आहे. फसव्या घोषणा आणि पोकळ जाहिरातबाजीचा उद्योग सरकार करत आहे. त्यांच्याकडून सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. त्यातच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवांच्याविरोधात विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तर अकलेचे तारे तुटलेले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याची सवय त्यांनी आता बंद करावी. या सर्व बाबींचा शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत.

दानवे यांचा निषेध करीत शिवसेनेने सांगलीत तिरडी मोर्चा काढला. केंद्र सरकार व भाजपच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने शिवाजी मंडई येथील शिवसेना कार्यालय ते स्टेशन चौकापर्यंत केंद्र सरकारचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्टेशन चौकात जमलेल्या सर्व शिवसैनिकांनी केंद्र सरकार व भाजपविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर तिरडी मोडो आंदोलन करून भाजप सरकारचा व रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या कित्येक दिवसांत सातत्याने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नोटबंदी, जीएसटी यामुळे आधीच सर्वसामान्यांचे छोटे-मोठे व्यवसाय बुडाले आहेत आणि त्यातच कोरोनाने उरले सुरले सर्व छोटे-मोठे व्यवसाय व कष्टकऱ्यांचे काम हिरावले गेले. त्यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधामध्ये जे तीन काळे कायदे केले आहे, त्याच्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून, त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बेताल वक्तव्य केले.

रावसाहेब दानवे यांनी भारतातील तमाम शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा शिवसेना सांगली जिल्ह्यात रावसाहेब दानवेंना पाय ठेवू देणार नाही. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द न केल्यास सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजप सरकारच्या विरोधात श्राद्ध आंदोलन केले जाईल, असा इशाार विभुते यांनी दिला.

कोल्हापूरातील हुपरी येथे शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन करण्यात आले. गडहिंग्लज येथे शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले. प्रारंभी प्रांत कचेरी ते दसरा चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले.

यवतमाळ येथे तर फार आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सतत शेतकर्‍यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणार्‍यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे. तुम्हीही निघा, शेतकर्‍यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही, अशा शब्दांत यवतमाळ विधानसभेचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.

दानवे यांच्या वक्तव्याच्या विरोधात शनिवार (ता.१२) स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकानी आंदोलन करीत निषेध नोदविला.
भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुद्धिभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार करीत आहे. आता तर काळया कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे, असे म्हणत शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्वच पदाधिकार्‍यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला.

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतक-यांचे सुरु असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केन्द्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. या वक्तव्याच्या विरोधात यवतमाळात दुसऱ्या एका ठिकाणी शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रावसाहेब दानवेंचा पुतळा भरचौकात तुडवला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा जप्त केला.

शिवसेना यवतमाळ जिल्हा जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड म्हणाले की, याआधी सुध्दा रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांना साले अशी शिवी दिली होती. आता पुन्हा शेतक-यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम दानवे करीत आहे. हे सर्व ते मद्य पिऊन करतात काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी
रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकाऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरित रावसाहेब दानवे यांना मंत्रीपदावरून निष्कसित करावे व भाजप मधून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी केली.

शिवसेना दानवेंचा निषेध करीतच आहे पण आंदोलनामागे इतरही काही कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमती अत्यंत कमी असताना केंद्र शासन यात दररोज वाढ करून जनतेची पिळवणूक करीत आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यात येऊन केंद्र शासनाने त्वरित डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात. केंद्र शासनाने कृषी कायद्यांना मंजुरी दिली. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, धनिकांचा व व्यापाऱ्यांचा फायदा होणार असल्याने हे कायदे रद्द करावे आदी मागण्या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी केल्या आहेत. शिवसैनिकांच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे खुद्द जावई हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. हर्षवर्धन जाधवांनी रावसाहेब दानवेंवर टिका का केली आहे. रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन केली.

शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर गुरुवारपासून आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी रावसाहेब दानवे यांचे जावई तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलकांना पाठिंबा देत जलकुंभावर आंदोलनस्थळी त्यांच्यासोबत जेवण सुद्धा केले.

राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रपरिषद आयोजित केली होती. यादरम्यान त्यांना पत्रकारांनी दानवेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर मागील १२ दिवसांपासून शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. देशातील बहुतांश पक्षांनी संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आंदोलनाबाबत असे वक्तव्य योग्य नाही. दानवे हे केंद्रीय मंत्री राहिले आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना याबाबत काही माहिती असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आंदोलकांना देशद्रोही, अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. पाकिस्तानमधून कांदे, साखर आणणारे तुम्हीच.आता शेतकरीही तिथून आणले का?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलतांना ते म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर अनेक भाजप नेते टीका करीत आहेत, या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहोचू शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर
येथे स्पष्ट केले.

आठवले म्हणाले शेतकऱ्यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परन्तु सुधारणा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. थंडीमध्ये शेतकरी आहेत हे आम्हालाही चांगलं वाटत नाही, सरकारची संवादाची भूमिका आहे, शेतकऱ्यांनीही दोन पाऊल पुढे यावे, आंदोलन चिघळवणे बरोबर नाही. आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा काही संबंध नाही, असे आठवलेंनी स्पष्ट केले.

देशभर त्याचे पडसाद उमटत असतांना याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दानवे भैताड माणूस आहे. एकदम येडपट आहे, असे ते म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, हा भैताड माणूस राजकारणात कसा काय आला, हेच कळत नाही. बरं आला तर आला, पण भारतीय जनता पक्षाने याला मंत्रीही करून टाकले. ज्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, बोलण्याचे भान नाही, अशा माणसाला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्‍नचिन्ह आहे. हा माणूस काहीतरी शोध करत असतो. कार्टून माणूस, इब्लीस माणूस जे करतो, नेमके तेच काम हा करत आहे.

आमच्या बच्चू कडूंनी तर म्हटले आहे की, याला घरात घुसून मारले पाहिजे. पण त्याहीपूर्वी याच्या कमरेत डावा मारा किंवा उजवा मारा, एक मारलाच पाहिजे. केव्हा काय बोलावं, याचं भान त्या दानवेला कधी राहिलं आहे का? कीव येते भारतीय जनता पक्षाची की, अशा लोकांना पक्षाचा प्रदेशाध्यक्ष केलं आणि केंद्रात राज्यमंत्री केलं. या पक्षाची काही विचारधारा आहे की नाही आणि असेल तर कुठल्या थराला गेली आहे, याची कल्पना दानवेच्या वक्तव्यावरून येते, असे वडेट्टीवार म्हणाले.

दानवेंनी जे वक्तव्य केलं आहे ते खूपचं गंभीर आहे. यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे. बाहेरील शक्ती आपल्या देशात घुसत असताना गुहमंत्री काय करतं होते. हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडणारे केंद्रीय राज्यमंत्री यांच्यावर राज्यमंत्री संतापले आहेत. ‘रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे,’ असा संताप कडू यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणासह काही राज्यांतील शेतकरी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे. तर, कायद्यात बदल करण्याच्या भूमिकेपर्यंत सरकार आलं आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सुरू नसल्यामुळं सरकारची मोठी अडचण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून आंदोलनाबद्दल वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथं बोलताना, ‘हे आंदोलन एक कटकारस्थान आहे. आंदोलकांना चीन व पाकिस्तानाची मदत फूस आहे,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दानवे यांचं वक्तव्य केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर, बच्चू कडू यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दानवे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. ‘मागच्या वेळेस दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. मात्र, आता परिस्थिती अशी आली आहे की आम्हाला त्यांच्या घरात घुसून त्यांना चोप द्यावा लागेल,’ असं कडू यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी विरोधकांना आणि विरोध करणाऱ्यांना ज्यावेळेस देशद्रोही म्हणू लागतात त्यावेळेला ते हुकूमशाहीचे निदर्शक असते. जगातील सर्व हुकूमशाही राज्यांनी त्यांच्या प्रशासनाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही असे म्हटले आहे. मोदी सरकारने गेल्या ६ वर्षापासून त्यांच्या विरुद्ध झालेल्या प्रत्येक आंदोलनाची देशाच्या विरोधातील कट म्हणूनच संभावना केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या गरिब शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन पाकिस्तानाशी जोडून शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे देशात लोकशाही नाही तर मोदीशाही असल्याचे दर्शवणारा असून या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि दानवे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

‘गेल्या ६ वर्षांमध्ये मोदींसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी विरोधकांची देशद्रोही म्हणून संभावना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देखील देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या सहा वर्षांत देशात झालेले प्रत्येक आंदोलन, जेएनयू, कोरेगाव भिमा, शाहीन बाग, आयआयटी मद्रास, रोहित वेमुला, या सर्व आंदोलनांना टुकटे टुकडे गँग किंवा देशद्रोहाशी जोडण्याचा प्रयत्न गेला होता. सीएएच्या आंदोलनालाही असाच रंग देऊन देशविरोधातील कट ठरवण्याचा प्रयत्न झाला. काश्मीरमध्ये होणाऱ्या विरोधालाही तसाच रंग देण्यात आला. हाथरस घटनेनंतरही सरकारविरोधातील कट होता असे दाखवून यूएपीए कायद्याअंतर्गत पत्रकारांना अटक करण्यात आली. देशात विक्रमी प्रमाणात देशद्रोहाचे खटले दाखल केले आहेत’, असे नमूद करत सावंत यांनी केंद्राला लक्ष्य केले.

राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे म्हणणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते शिवाजीनगर भागातील जलकुंभावर चढले आहेत व तिथे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. वीस पेक्षा अधिक कार्यकर्ते जलकुंभावर असून साठ ते सत्तर कार्यकर्ते जलकुंभाच्या खाली आहेत. जोपर्यंत रावसाहेब दानवे शेतकऱ्यांची माफी मागत नाहीत. तो पर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा पावित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दानवे यांच्या जालना येथील घरावर युवक काँग्रेस कार्यकर्ते यांनी धडक दिली. दानवे यांनी याआधीही शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. आता पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ते कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तान, चीनचा संबंध त्यांनी जाणीवपूर्वक जोडला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठीच हे आंदोलन केले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. याबद्दल कर्जतमध्ये बोलताना पवार यांनी त्यांचा चांगलचा समाचार घेतला आहे. पवार म्हणाले, ‘भाजपमध्ये अनेक लोक असे आहेत की ते अशी निराधार वक्तव्य करीत असतात. शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.’

याआधीही अनेकदा दानवेंनी वादग्रस्त विधाने केली आहेत.
निवडणूकीत प्रचारादरम्यान त्यांनी तुम्ही माझ्या मागे उभं राहा, मी तुम्हाला पैसै देतो, वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मतदानाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ महत्वाची असते. आदल्या दिवशी घरात लक्ष्मी येते. तिचा स्वीकार करा, असे वादग्रस्त वक्तव्य  भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे जाहीर सभेत केले होते. त्यामुळे यावरुन राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीने दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळ महत्त्वाची असल्याचे सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असे वादग्रस्त विधान दानवे यांनी पैठण प्रचार सभेत केलं. उद्या नगरपरिषदांचा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

जालन्यातच मी तुम्हाला पैसे देऊ ऱ्हायलो…त्यांना पैसे भेटू नाही राहिले…तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणारकी नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विचारला होता. त्यांचे थेट पैशाशी संबध असलेले वक्तव्य सोशल मिडियात व्हायरल झाले होते. रावसाहेब दानवे हे आपल्या जालना जिल्ह्यातच बरळले. शेतकऱ्यांची सरकारने एवढी तूर खरेदी करूनही ते रडतात साले, असे वाक्‍य त्यांनी वापरले. पक्षाचा कार्यकर्ता त्यांना सहजपणे विचारत होता की साहेब तुरीच्या प्रश्‍नावरून शेतकरी सरकारवर नाराज आहेत. दानवे यांचे तेवढ्यावरून पित्त खवळले. सरकारने विक्रमी खरेदीचा दावा करताना ते शेतकऱ्यांवर घसरले. कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यावे, असेही त्यांनी कार्यकर्त्याला सुनावले.

मी असेपर्यंत खुशाल गायी कापा असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. रावसाहेब दानवे यांचे प्रचारसभेतले एक भाषण व्हायरल झाले. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत होते. केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली. मात्र त्यांच्याच सरकारमधले मंत्री आता हे वक्तव्य करत आहेत, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना ते असं बोलले आहेत यासंदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

या भाषणात रावसाहेब दानवे म्हणतात ” केंद्र सरकारने गोहत्या बंदी लागू केली तेव्हा यांच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले. बकरी ईद आली आहे साहेब आता कसं करायचं? मी म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले अहो ते गोहत्या बंदी आहे ना, मी त्यांना म्हटलं मी असेपर्यंत खुशाल गायी कापा” हे वक्तव्य असलेलं त्यांचं भाषण व्हायरल झालं. एवढंच नाही तर आपल्या तालुक्यात दोन नंबरचे धंदे सुरु आहेत तुम्ही म्हणत असाल तर दोन मिनिटात ते बंद करतो असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

मात्र रावसाहेब दानवे यांनी या वक्तव्याबाबत कानावर हात ठेवले. काहीजणांनी खोडसाळपणा केला आहे. व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट करुन व्हायरल केला आहे असा आरोप दानवे यांनी केला. तसेच मी असे बोललोच नाही असेही त्यांनी म्हटले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत त्यांच्यावर पातळी सोडून निशाणाही साधला.

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा भोकरदन तालुक्‍यातील जवखेडा या गावातील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. घरात कुठलाही राजकीय वारसा नसतांना रावसाहेब दानवे यांनी ग्रामपंचायतीपासून आपल्या राजकारणाला सुरूवात केली. सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनवेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार व सलग पाचवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी २०१४ मध्ये कामाला सुरूवात केली. आपल्या कारकीर्दीत भाजपला राज्यात विधानसभा, लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत अभूतपुर्व यश मिळाले. केंद्रातील मोदी सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची देखील संधी मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर केंद्रात पुन्हा एकदा दानवे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. याशिवाय भोकरदन तालुक्‍यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अनेक शैक्षणिक संस्था देखील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. राजकारणातील एक प्रसिध्द तितकेच वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात. आपल्या ग्रामीण भाषेमुळे रावसाहेब दानवे यांची भाषणं नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहेत.

गंगाधर ढवळे नांदेड ,

संपादकीय
१३.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *