टिलीमिली कार्यक्रमात जवळ्याचे विद्यार्थी रमले.
नांदेड –
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली सहा महिने शाळा बंदच आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता नवीन शैक्षणिक वर्ष शिक्षण विभागाला सुरू करता आलेले नाही. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ‘शाळा बंद-शिक्षण चालू ‘ हा उपक्रम राबविण्यात आला. तो अजूनही चालूच आहे. मागील महिन्यात २० तारखेपासून एमकेसीएल या संस्थेच्या सहकार्याने शासनाने डी डी सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीवर इयत्तानिहाय टिलीमिली या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे. नुकत्याच बदललेल्या वेळापत्रकानुसार जवळा येथील विद्यार्थी या कार्यक्रमाचा घरोघरी लाभ घेत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी.एस., सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार हे प्रयत्नशील आहेत.
आॅनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. परंतु या शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी ज्यांच्याकडे टी.व्ही. उपलब्ध आहे अशा घरी एकाच कुटुंबातील दोन ते चार विद्यार्थी एकत्र बसवून आपापल्या इयत्तांचा अभ्यास करीत आहेत. तसेच घरातील मोठ्यांना आपल्या शंका विचारत आहेत. सर्व कुटुंबच या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले असून वीज भारनियमनामुळे अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी गावकरी करीत आहेत. टिलीमिली या आनंददायी कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी एपिसोड स्वरुपात पाहता यावे यासाठी एमकेसीएल यांनी मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यास या कार्यक्रमाचे भाग आपल्याला पुन्हा पाहता येतील, याकरिता सर्व पालकांनी हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करुन घ्यावेत असे आवाहन मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले आहे.