बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सरंक्षण व देखभालीसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी
अहमदपूर –
श्रीक्षेत्र माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आरोपीचा छडा लावत पोलीसांनी एका तरुणास अटक केली. परंतु सर्वात जास्त बाबासाहेबांच्याच पुतळ्याची विटंबना होते त्यामुळे राज्यभरात शहरात व खेडोपाडी ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे आहेत त्या त्या ठिकाणी त्या पुतळ्यास संरक्षण व देखभालीसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील सम्राट मित्रमंडळाच्यावतीने युवा नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड लातूर महामार्गावर असलेल्या माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त समजताच काही आंबेडकरी तरुणांनी एकत्र येत निषेध नोंदविला. सम्राट मित्रमंडळाने तहसिलदार, अहमदपूर यांना आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या देखभालीची व संरक्षणाची जबाबदारी माळेगाव ग्रामपंचायतीने स्विकारावी तसेच भविष्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबतीत राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत राज्य सरकारने सर्व पुतळ्याच्या देखभाल व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करुन त्या अंमलात आणाव्यात तसेच यासाठी आवश्यकतेप्रमाणे निधीची उपलब्धता करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर युवा नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्यासह गोविंदराव गौरी, आकाश सांगवीकर, अजय भालेराव, सचिन बानाटे, इंद्रजित वाघमारे, गणेश मदने, अमोल कांबळे, रोहिदास तिगोटे, आकाश वाघमारे, शाहरुख पठाण, नूर मोहम्मद, प्रशांत जाभाडे, मोहम्मद पठाण, मुजम्मील कुरेशी, मल्हारी सोनकांबळे, शरद बनसोडे, धम्मानंद कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.