संकटात आलेला अनुभव!
खंडाळा पो.ठाणे सातारा गुरुवार १६ जुलै २०२० रोजी नेहमी प्रमाणे सकाळी ९:०० वा. पोलीस ठाण्यात हजर झालो. त्या अगोदर दोनच दिवस खंबाटकी घाटात प्रेमीयुगलांना लुटमार करणारी टोळी मी आणि माझ्या तपास पथकाने पकडली होती. त्याच तपासाचे काम चालू होते. आरोपी अटकेत होते. आरोपीकडून एकुण नऊ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याची उकल झाली होती. गुन्ह्यातील गेल्या मालाची रिकव्हरी करण्यात आमची टिम व्यस्त होती. रिकव्हरी करीता वाई, भुईंज, फलटण, ताथवडे, सांगवी असा दिवसभराचा प्रवास केला. संध्याकाळी पुन्हा खंडाळा येथे आलो. तपासामध्ये प्रगती होवून आणखी गुन्हे उघड होत असल्याने एक वेगळेच समाधान आमच्या टिमला होते. कोरोनाचा आम्हांला पुर्ण विसर पडला होता..एवढे आम्ही तपासामध्ये व्यस्त होतो. शुक्रवारी १७ जुलै २०२० नेहमी प्रमाणे सकाळी माँर्निंग वाँकला उठलो. प्रचंड अंगदुखी या व्यतिरिक्त दुसरा काहीच त्रास होत नव्हता.
प्रवास झाल्यामुळें अंग दुखत असेल म्हणून दुर्लक्ष करून नेहमी प्रमाणे ९ कि.मी मौजे हरळी गावापर्यंत माँर्निंग वाँक करून आलो. परंतु नेहमीप्रमाणे फ्रेश वाटायला पाहिजे तसे काहीच जाणवले नाही. म्हणुन पोलीस ठाणे येथे जाता जाता सहकारी डॉक्टर मित्रांला फोन करून हकीकत सांगितली. त्यांनी हाँस्पिटला येवून एक अंगदुखीचे इंजेक्शन घेवून जा असे सांगितले. त्याचवेळी थोडा ताप सुध्दा असल्याचे त्यांनी सांगितले. शंका नको म्हणून तात्काळ शिरवळला जाऊन स्वॅब देवून टाकण्याचा सल्ला दिला. त्यांचे सांगणेप्रमाणे सकाळी ११:०० वा शिरवळला Swab देवून पुन्हा पोलीस ठाणेत येवून कामकाज करीत बसलो. संध्याकाळी ९:०० वा हजेरी संपवून घरी गेलो. नुकतेच जेवण करून बसलो. त्याचवेळी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांचा फोन आला त्यांनी फक्त स्वॅब दिला होता का? असे विचारले त्यावर मी काही बोलायचे आत रिपोर्ट Positive आला आहे असे म्हणून फोन ठेवून दिला. दोन मिनिटे काहीच सुचेना घरात पत्नी दोन मुले… मुलीने तर positive एवढाच शब्द ऐकला तिने लगेच रडायला सुरवात केली.
जेमतेम दहा वर्षाच वय तिचं कशीबशी तिची पत्नीने समजूत काढली. मार्च महिन्यापासून आज अखेर खांद्याला खांदा लावून कोरोना कालावधी मध्ये खंडाळा येथे ज्याचेसोबत काम केले त्यांच सहकारी अधिकारी यांनी केवळ रिपोर्ट Positive आला म्हणून पाहण्याचा द्रष्टिकोन बदलून काही बोलायचे आत फोन ठेवून दिला. बाकी मदत करणे तर खुप लांबची गोष्टी प्रंचड वाईट वाटले आणि खऱ्या अर्थाने तेथूनच हेळसांड होण्यास सुरवात झाल्याचा अनुभव सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य घेवून खचून न जाता पत्नी व मुलांना धीर देवून लागलीच आवश्यक ते साहित्य घेवून बँग भरून पंधरा मिनिटाच्या आत रुमच्या बाहेर पडलो. पत्नी आणि मुले त्यांचे अश्रु लपवू शकत नव्हते ती परिस्थिती खुप भयावह होती..रिपोर्ट Positive आल्याबाबतची माहिती मी मा. #पोलीस#अधीक्षक_तेजस्वी_सातपुते_मँडम यांना कळविली. त्यांनी संपूर्ण माहिती घेवून जो आधार देवून विचारपूस केली. त्यानंतर थोडी माझी मानसिकता बदलली. मँडम यांनी तात्काळ तयार रहा मी तुमच्या करीता वाई येथील घोटावडेकर हाँस्पिटला बेडची सोय केली आहे. तसेच वपोनि आंनद खोबरे यांना देखील पूर्व कल्पना दिलेली आहे. तुम्ही वाईला रवाना व्हा असे सांगून काही ही अडचण आली तरी थेट माझ्या मोबाईल फोन वर संपर्क करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
मी देखील108 अँम्ब्युलन्सची वाट न पाहता वरिष्ठांनी दिले आदेशानुसार माझ्या स्वतः चे कारने वाईला रवाना झालो. घोटावडेकर हाँस्पिटल मला माहिती नव्हते. वपोनि खोबरे साहेबांनी मला हाँस्पिटला पोहचविण्यासाठी रस्त्यावर एक कर्मचारी उभा केला होता. तो माझी वाटच पाहत उभा होता. त्यांनी मला घोटावडेकर हाँस्पिटलला पोहचविले. मी जाणेपुर्वीच पो. अधीक्षक मँडम यांनी डॉक्टरांना माझ्या बाबतची माहिती देवून ठेवली होती. दरम्यान चे कालावधी मध्ये मा.अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील साहेब उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग तानाजी बरडे साहेब वाई उप विभागीय अधिकारी अजित टिके साहेब तसेच जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारी अधिकारी यांनी देखील आस्थेने काळजी पोटी फोन करून विचारणा करून मानसिक धीर देवून आधार दिला. दोन दिवसाचा कालावधी घोटावडेकर हाँस्पिटला गेला. तो पर्यंत तीव्र अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. पंरतू तिस-या दिवशी अचानक भयंकर खोकला वाढू लागला एक दोनवेळा फणाणून थंडी ताप आला डॉक्टरांना माहिती दिली. त्यांनी पँरासिटामाँल व खोकल्यावर बेनेड्रिअल औषध या व्यतिरिक्त काही वेगळे उपचार केले नाही. मी डॉक्टरांना विंनती केली मला खोकल्यामुळे Chaist-Pain होतायत ताप कमी जास्त होतोय त्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या होईल कमी अशी समजूत घातली…अगोदरच कोणी जवळ येत नाही त्यात लांबूनच बरे होण्याची दिलेली सहानुभूती व मानसिक आधार या व्यतिरिक्त इतर कोणतेही शारीरिक उपचार नाहीत… खोकला तर वाढत चाललेला औषधे घेवुन हि फरक नाही..घोटावडेकर हाँस्पिटला Positive रुग्णांची लागलेली रिघ..अशातच नर्सेस नेहमी प्रमाणे आँक्शिजन लेवल चेक केली आणि ती अचानक ८२ ते ८३ पर्यंत खाली आली मग त्यानंतर डाँक्टरांनी माझा Chest-Xry काढला इसीजी (ECG) काढला परत एकदा तोच मानसिक आधार रिपोर्ट छान आहेत.काही घाबरायचे नाही ठिक होइल सगळं फक्त दिलेल्या गोळ्या खा वाढेल तुमची आँक्शिजन लेवल काळजी नका करू असे म्हणून परत एकदा पुर्वीप्रमाणेच दूरवरूनच मानसिक आधार दिला… पण माझा ताप आणि खोकला काही केले कमी होईना नाईलाजास्तव मी पुन्हा पो.अधीक्षक मँडम यांना फोन करून माझी वरील परिस्थिती सांगितली. मला म्हणावे असे उपचार येथे मिळेनात खुप त्रास होतोय मला उपचारासाठी पुण्यात जायचं आहे. तेव्हा त्यांनी कोठे उपचार घेणार असे विचारल्यावर कोणत्याही नामांकित रुग्णालयात मला पाठवा तिथे उपचार घेतो असे सांगितले. त्यानंतर मँडमनी स्वतः रुग्णालयाची माहिती घेवून त्यांच्या संपर्कातून मला हडपसर येथील नोबेल रुग्णालयात* जागा नसताना व्यक्ती:श पाठपुरावा करून एक बेड उपलब्ध करून घेतला. आणि तातडीने १०८ अँम्ब्युलन्स मधून मला पुणे हडपसर येथे पाठवले.. तोपर्यंत प्रकृती गंभीर होत चालली होती श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता…नोबेल हाँस्पिटलला गेल्यावर मला तात्काळ आँक्शिजन लावावा लागला..सर्व शारीरिक तपासण्या झाल्या त्यामध्ये मला कोरोना सह निमोनिया या आजाराचा तिव्र जंतूसंसर्ग झाल्याचे निदान झाले. श्वसनयंत्रणा प्रतिसाद देईना रोग प्रतिकार शक्ती कमी होत चालली होती. निमोनिया आणि कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला असून आजार गंभीर स्वरूप धारण करीत असल्याची माहिती डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगून टाकली.आणि डॉक्टरांनी जवळ कोणी नातेवाईक आहेत का विचारले त्यावेळी माझे सोबत कोणीच नव्हते. पत्नी आणि मुलांना खंडाळा येथे विलगीकरण करण्यात आले होते.. नातेवाईक सोबत असते तरी देखील कोणाला जवळ येता आले नसते. पंरतू बाहेरून लागणारी औषधे उपलब्ध करण्यासाठी निश्चितच त्यांची मदत झाली असती..गुरुवार २३ जुलै २०२० रोजी सकाळी ९:०० वा डॉक्टर द्रविड व पोतद्दार राऊंडला आले. त्यांनी आँक्शिजन लेवल ८० पेक्षा खाली गेलेली पाहून त्याचवेळी क्रूत्रिम श्वसनयंत्रणा लावावी लागणार असल्याचे सांगितले व लगेच अतिदक्षता विभागात (ICU) मला हलविले. पंरतू यामधून बाहेर पडण्यासाठी रेमडेसिव्हीर (Remdesivir)ची एकुण 5 इंजेक्शन आणि अँक्टेंमरा (Actemra) चे एक अशी एकुण सहा इंजेक्शनची आवश्यकता लागेल. पंरतू वरील इंजेक्शनस हे सध्या पुण्यात सहज उपलब्ध होत नाहीत तुम्ही तुमच्या स्तरावर आजच ऊपलब्ध करून घ्या असे सांगितले. त्यानंतर मात्र साक्षात मृत्यूच मला समोर दिसायला लागला…क्षणभर चेहरा निस्तेज झाला… भुंगे मेंदू कुरतडायला लागल्या सारखे वाटू लागले…. पुण्या सारख्या ठिकाणी औषधांची ही परिस्थिती म्हटल्यावर मला नक्कीच इंजेक्शन मिळणार नाही आणि आपण या गंभीर आजारातून वाचणार नाही याबद्दल चा आत्मविश्वास मावळू लागला….शेवटची संधी म्हणून लागलीच मा.पोलीस अधीक्षक #तेजस्वी_सातपुते_मँडमना फोन केला वरील हकीकत सांगितली. मँडमना इंजेक्शन ची तर खुप आवश्यकता आहे पण ती पुण्यात उपलब्ध होतील असे वाटत नाही.
इंजेक्शन शिवाय पर्याय नाही. असे मँडमना सांगितले. त्यावर पो.अधीक्षक मँडम यांनी तुम्ही निश्चितं राहावा काळजी करू नका…मी ताबडतोब PSI वाघ वेल्फेअर यांना पुर्णपणे नियोजन करण्यासाठी सांगते. प्रवासाचा कालावधी वगळता कोणतीही दिरंगाई होणार नाही.. इंजेक्शने आजच पुण्यात नोबेल हाँस्पिटला पोलीस वाहनांतून तातडीने पोहोच केली जातील तुम्ही टेन्शन घेवू नका हे मँडमचे आधाराचे शब्द ऐकून डोळे पाण्यानं भरून आले.. सकाळी ११:०० वा इंजेक्शन चा मेसेज मी मँडम ना दिलेनंतर वरील सहा ही इंजेक्शन घेवुन पोलीस टिम दुपारी २:३० वा. नोबेल हाँस्पिटल हडपसरला पोहचली..आणि पुढील उपचार तातडीने सुरू करणेस डॉक्टरांना मँडमनी स्वतः फोनद्वारे सांगितले. इंजेक्शन आणली आहेत असे जेव्हा डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचा विश्वास बसेना…..अवघ्या तीन तासाच्या आत सातारा येथून इंजेक्शन पुण्यात उपलब्ध करून दिली. मा.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी फक्त जिल्हा पोलीस प्रमुख च नव्हे तर एक कुंटुबप्रमुख या नात्याने प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना आजाराची सुरवात झाल्यापासून आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्यातर आहेतच पण पुण्या सारख्या मेट्रोपाँलिटियन शहरात जी इंजेक्शन उपलब्ध होवू शकली नाही ती भविष्याची गरज लक्षात घेवून जिल्हा पोलीस दलासाठी मा.पोलीस अधीक्षक सो यांनी ती उपलब्ध करून तरतूद करून ठेवली होती आणि माझ्या सारख्या कोरोना बाधिताला कोणतेही आडेवेढे न घेता उपलब्ध करून देवून ख-या अर्थाने माझे प्राण वाचवण्यासाठी जी मदत केली ती शब्दात व्यक्त न करण्यासारखी आहे. खरचं पोलीस खात्याचा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा मी सदैव ऋणी राहील. तसेच या कठीण प्रसंगी मला व माझ्या कुटुंबियांना मानसिक आधार देणारा माझा मित्रपरिवार पोलीस स्टाफ यांचे देखील शत:श आभार….
– श्री हनुमंत गायकवाड(स.पो.निरिक्षक, खंडाळा सातारा)