आनंदी सहजीवन…….

शिवास्त्र : 

आनंदी सहजीवन


विवाह केवळ शिवकुटुंबव्यवस्था निर्माण करणारी औपचारिक घटना नसून प्रत्येक नागरिकाला एक परिपुर्ण व परिपक्व व्यक्ती म्हणून विकसित करणारी व प्रत्येकाच्या भावनिक, मानसिक व बौध्दिक विकासाची अमुल्य संधी असते. आपल्या वैवाहिक सहजीवनातील सहकर्मी हा आपल्याला आयुष्यातील सर्वात महत्वाचा आधार असतो, ज्याच्यासोबत आयुष्य आनंदाने जगत असताना अनेक नवीन गोष्टी शिकत शिकत आपला भावनिक, वैचारिक, बौध्दिक, मानसिक आणि शारिरीक विकास होत असतो आणि हेच ध्येय समोर ठेवून सर्वानी वैवाहिक जीवनात प्रवेश करायाला हवा. आपला जोडीदार शोधत असताना फक्त रूप, संपत्ती, नौकरी, कुटुंबाचा वारसाच न पाहता दोघांनी आपली आपली भावनिक, वैचारिक गरज ओळखून ती समोरच्या व्यक्तीसोबत जोडून पहावी आणि मगच निर्णय घ्यावा, असे केले तरच पुढे जीवन समाधानी राहील. नवीन जोडपे घरी आल्यावर घरातील जेष्ठांनी ‘बँकसीट’वर बसायला शिकले पाहिजे. नवीन जोडीला त्यांचा संसार फुलवायला, त्यांना त्यांच्या समस्या एकत्र बसून सोडवायला व नाविन्यपुर्ण सोल्युशन, समस्या निवारण पध्दती व संसारिक आपत्ती व्यवस्थापन शिकायला वेळ दिला पाहिजे. जोपर्यंत ते त्यांच्या समस्या घेऊन ते तुमच्याकडे येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनापासून दोन हात दूर राहुन केवळ निरिक्षण करायला पाहिजे. जर उगीच त्यांच्या वैवाहिक जीवनात जेष्ठ वारंवार हस्तक्षेप करीत राहिले तर त्यांचे वैवाहिक जीवन कधीच सुदृढ, खंबीर व सशक्त होणार नाही आणि ते संपूर्ण घरासाठी कायमस्वरूपी डोकेदुखी ठरू शकते. 
लग्न हे एकमेकांशी आयुष्याचा प्रत्येक कप्पा सुसंवादयुक्त व सामायिक करण्यासाठी करायचे असते. शाररीक, भावनिक, आर्थिक, भौतिक, वैचारिक अशा अनेक पातळ्यांवर आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये सोबत काम करावे लागते. हे करत असताना स्वतः मधील अनेक गोष्टींचा त्याग करायची तयारी ठेवावी लागते, स्वतःला आवडणाऱ्या जेवणापासून तर आवडत्या छंदापर्यंत काही गोष्टी आपल्या लाईफ पार्टनरसाठी वेळप्रसंगी सोडण्याची तयारी ठेऊनच आपण हा सहजीवनाचा प्रवास करणार असू आणि हे करीत असताना पार्टनरला स्वतःच्या आयुष्यात जागा निर्माण करून देण्याची तयारी ठेवत असू तर नक्कीच आपण सुखी समाधानी वैवाहिक आयुष्य जगू. सुखी वैवाहिक जीवनाचे हेच रहस्य आहे. विवाहामध्ये समस्या येतील, त्यामध्ये भांडणे व कुरबुरी होतील परंतु हे सर्व खंबीररित्या पार पाडून भावनिक एकोपा निर्माण करून एकमेकांना मजबूत व खंबीर साथ देत जगणे हाच उद्देश मनुष्याला शिवविवाहातून साध्य करायचा असतो. 

इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड)

 मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली 

राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद

[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *