माळेगाव पाणीपुरवठा योजना, अंतर्गत पाईपलाईनचे काम सुरु
\
माळाकोळी ; एकनाथ तिडके
ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या,व त्यामुळे रखडलेल्या माळेगाव पाणीपुरवठा योजनेच्या गावातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम संबंधीत कंत्राटदाराने अधिक्षक अभियंता जिल्हा परिषद नांदेड व उप अभियंता कंधार यांच्या लेखी आदेशानुसार सुरुवात केली आहे. यामुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत माळेगाव येथील पदाधिकार्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील महिणाभरापासुन पत्रकार परिषदा व प्रसीद्धी पत्रकाद्वारे एकमेकांविरोधात आरोप – प्रत्यारोप करत जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील व सरपंच प्रतिनिधी बालाजी राठोड यांनी योजनेला विरोध – समर्थन करण्याची स्पर्धा सुरु होती, यामुळे माळेगावच्या पाणीपुरवठा योजनेचा वाद राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांच्या दरबारी पोहचला होता, कधी स्थगिती तर कधी काम सुरु करण्याचे आदेश …असा खेळ सुरु होता. अखेर दि 24 जुलै रोजी अधिक्षक अभियंता जिल्हा परिषद नांदेड व उप अभियंता कंधार यांच्या लेखी आदेशान्वये कामाला सुरुवात करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधीत कंत्राटदाराने गावातील अंतर्गत पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी संबंधीत योजना गावातील तलावातुन करु नये तर लिंबोटी धरणाहुन केली जावी म्हणुन विरोध केला तर सरपंच प्रतिनिधी बालाजी राठोड यांनी सदर योजना गावाअंतर्गत पाणी पुरवठ्याची असल्याने माळेगांव यात्रा येथे सद्य स्थितीत लिंबोटी धरणांतून पाणी पुरवठा चालू असुन ही योजना गावाच्या हिताची व टंचाईवर मात करणारी असल्याचे सांगत योजनेच्या पुर्णतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला.
चौकट …
माळेगाव पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भाने झालेल्या वादाला उगाळत बसण्याची माझी ईच्छा नसुन सदर योजनेमुळे गावातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे व गावाचा फायदा होणार आहे यामुळे या योजनेच्या कामाला सुरुवात झाल्याचा आनंद आहे.
बालाजी राठोड सरपंच प्रतिनिधी माळेगाव