नांदेडः
सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी मुंबईत गेल्यामुळे नांदेडच्या आरोग्य सेवेवर चव्हाणांचा विश्वास नाही का?, असा सवाल करणारे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतःही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर औरंगाबादेत उपचार घेत आहेत. त्यामुळे चिखलीकरांचाही नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का?, असा उलट सवाल आता नांदेडच्या राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे.
खासदार चिखलीकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर औरंगाबादेतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची बाधा होणारे ते नांदेड जिल्ह्यातील पाचवे लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नांदेड येथील खासगी रूग्णालयातून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. त्यावेळी अशोक चव्हाण यांचा नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही काय?, असा सवाल करत खासदार चिखलीकरांनी चव्हाणांवर टिकेची झोड उठवली होती.
नांदेडच्या आरोग्य सेवेत उपचार न घेता पालकमंत्री मुंबईला उपचार घेण्यासाठी जाणे हे नांदेडच्या आरोग्य विभागावर, त्यांच्या कामावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करणारी ही बाब आहे, असेही चिखलीकर म्हणाले होते. आता स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये उपचार न घेता उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाल्यामुळे चिखलीकरांचाही नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का? असा सवाल केला जात आहे.
खासदार चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतु कोणी कुठे उपचार घ्यावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतानाही चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांना सवाल करत टिकेची झोड उठवली होती. चिखलीकरांची ही टिका नांदेड राजकीय वर्तुळात अनेकांना रूचली नव्हती. असे सवाल उपस्थित करणेच गैर आहे, अशी प्रतिक्रिया तेव्हा नांदेडच्या राजकीय वर्तुळात उमटली होती.
माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनीही अशीच भूमिका मांडली होती. त्यामुळे आता स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर चिखलीकरांनी नांदेडमध्येच उपचार घेऊन नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास दाखवायला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावून सर्वसामान्य माणसांच्या मनातील भीती दूर करायला काय हरकत होती?, इतरांना सल्ले देतानाच स्वतःच्या कृतीतून त्यांनी हे का दाखवून दिले नाही?, असे सवाल नांदेडच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.