महाराष्ट्र पोलीस भले शाब्बास!

महाराष्ट्रात अवैधमार्गाने होणारी गुटखा विक्रीची पाळमुळं शोधून काढत पोलिसांनीकर्नाटकामध्ये जाऊन तंबाखू उत्पादन आणि साठवणूक करणाऱ्या सर्व ठिकाणांवरती पथकाने छापे टाकून 120 कोटी रूपयांचा विमल गुटखा त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशिनरी जप्त केली. परराज्यात जाऊन अशा प्रकारची छापा कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदाच केली आहे. अवैध उद्योगांवरील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

गुटखा विक्रीला आळा बसावा याकरिता पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या गुटखा विरोधी मोहिमेंतर्गत आजपर्यंत 28 ठिकाणी छापे टाकून अवैध गुटखा पकडण्यात आला. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड सहिता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणे चंदननगर हददीत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, प्रवीण मुकुंद वाहुळ, नीरज मुकेश सिंगल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात 7 लाख 50 हजार रूपयांचा गुटखा व वाहने जप्त करण्यात आली. या गुन्हयाचा तपास युनिट 4 च्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या गुन्हयाच्या तपासात प्रतिबंधित गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल ही हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या मार्फत 5 हवालाद्वारे व्यवहार करून देणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून सुमारे 4 कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या छाप्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपासात एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात प्रतिबंधित विमल गुटखा याचा पुणे व इतर महाराष्ट्रातील वितरक अरूण तोलानी असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा, व्ही 1, तंबाखू हा माल तुमकुर कर्नाटक येथील व्हीएसपीएम प्रॉडक्टस व व्ही.एस प्रॉडक्टस या उत्पादन कंपन्या अरूण तोलानी याला महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी अवैध मार्गाने पुरवठा करतात आणि 18 आरोपी विमल गुटखा व सुगंधित व्ही 1 तंबाखू स्थानिक वितरकांना पुरवतात हे समोर आले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार एक टीम कर्नाटकात पाठविण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी छापा कारवाईसाठी वेगवेगळी पथके तयार केली. आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने तुमकुर येथील अंतरसनाहल्ली इंडस्ट्रीयल परिसरात छापा टाकून संबंधित ठिकाणांवरील 120 कोटी रूपयांचा विमल गुटखा त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशीनरी आढळून आले. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अँथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गत आॅक्टोबर महिन्यात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपयांवर चाेरणा-या आंतरराज्य टोळीचा येथील शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला आहे. विशेष म्हणजे सातारा पाेलिस विभागातील धाडसी अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित संशयित आराेपींना हरियाणात जाऊन तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून पकडले. या संशयित आराेपींकडून दोन लाख रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. सकरुद्दीन फैजरू (रा. घागोट, ता. जि. पलवल, हरियाणा) आणि रवी ऊर्फ रविंदर चंदरपाल (रा. मोहननगर, पलवल रेल्वेस्टेशनजवळ ता. पलवल हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा शहरातील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तींनी २० व २१ सप्टेंबरला एटीएमधून हातचलाखीने दाेन लाखांची रक्कम काढून बँकेची फसवणूक केली होती. याबाबत माहिती घेतांना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्याचे प्रकार होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएमवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

या माहितीनुसार सातारा पोलिस दलाचे शाहूपूरी विभागाचे एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी पळून जात असताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान संबंधित संशयित आराेपींना साता-यात आणल्यानंतर सातारा पाेलिस दलाने सहायक पाेलिस निरीक्षक संदीप शिताेळे, काॅन्सटेबल माेहन पवार, पाेलिस नाईक स्वप्नील कुंभार, काॅन्सटेबल पंकज माेहिते या पथकाचे फटाके फाेडून, सातारी कंदी पेढे भरवून धडाक्यात स्वागत केले. यावेळी सहायक पाेलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पथकास शुभेच्छा दिल्या होत्या.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय

२२.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *