केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशासाठी एमआयएमचेखा. इम्तियाज जलील यांनी काढला लकी ड्रॉ
औरंगाबाद (राहूल वानखेडे)
खासदार कोट्यातून केंद्रीय विद्यालयात आपल्या मुला-मुलीला प्रवेश मिळावा यासाठी पालक लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवतात, किंवा त्यांच्या जवळच्या माणसाकडे खेट्या मारतात. थोडक्यात काय? तर वशिलेबाजी किंवा नातेवाईक, जवळच्या व्यक्तीलाच खासदार कोट्यातील प्रवेशाचा लाभ मिळवून दिला जायचा. पण वशिलेबाजीला फाटा देत खासदार इम्तियाज जलील यांनी चक्क आपल्या संपर्क कार्यालयात त्यांच्याकडे अर्ज केलेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांसमोरच लकी ड्रॉ काढत दहा प्रवेश निश्चित केले. पारदर्शकपणे राबवल्या गेलेल्या या पध्दतीमुळे इम्तियाज जलील यांचे ज्यांना प्रवेश मिळाला त्या व ज्यांनी नोंदणी केली होती त्या सगळ्यांनीच आभार मानले.
केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊन आपल्या पाल्यांला चांगले शिक्षण मिळावे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. परंतु केंद्रीय महाविद्यालयात प्रवेशाची क्षमता व नियम अटी पाहता इथे प्रवेश मिळणे एवढे सोपे नसते. औरंगाबाद हे लष्करी छावणी असलेले शहर असल्यामुळे लष्करातील अधिकारी, जवान यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते.
तर या शिवाय जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांना दहा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्राकडून कुपन दिले जाते. अशावेळी लोकप्रतिनिधींच्या जवळचे, नातेवाईक किंवा राजकारणातील हितसंबंध असलेल्या व्यक्ती यासाठी प्रयत्न करता आणि हे प्रवेश आपल्या पदरात पाडून घेतात. त्यामुळे खरा गरजवंत सामान्य व्यक्ती ज्याला आपला मुलगा किंवा मुलगी देखील केंद्रीय विद्यालयात शिकली पाहिजे अशी इच्छा असते त्याला याचा लाभ मिळत नाही.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याचे भान राखत आपल्या खासदार कोट्यातील दहा प्रवेश देण्यासाठी चक्क लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला. विशेष म्हणजे केंद्रीय विद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या पालकांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले होते.
त्यानूसार दहा प्रवेशांसाठी इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाकडे तब्बल १८० पालकांनी नोंदणी केली होती. या सर्व पालकांना आज दुपारी विद्यार्थ्यासह पालकांना संपर्क कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानूसार सर्व पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्की ड्रॉ काढण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला प्रवेशासाठीचे कुपन देण्यात आले. विशेष म्हणजे उपस्थित विद्यार्थ्यांच्या हातानेच या चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या.
*आणखी एका विद्यालयाची मागणी करणार..*
इम्तियाज जलील यांनी केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी काढलेल्या या लकी ड्रॉ बद्दल समाधान व्यक्त केले व पारदर्शक पद्धतीने हे प्रवेश निश्चित झाल्यामुळे समाधान वाटत असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाची कुपन जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांनाच दिले जायचे, ही प्रथा मला बंद करायची होती. आजही मला अनेक आमदारांचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले की आमची चिठ्ठी कशी निघेल ते बघा, पण मी त्यांना लकी ड्राॅमध्ये निघाली तर तुमचे नशिब असे सांगितले आहे.
त्यामुळे आधी नाव नोंदणी आणि मग आलेल्या अर्जातून लकी ड्रॉ पध्दतीने प्रवेशाची कुपन देण्याचा मी निर्णय घेतला होता. यामुळे ज्या दहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे त्यांना व ज्यांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला त्यांना देखील एक समाधान वाटले. खासदार म्हणून मला दहा जणांना कुपन देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकपणा असावा माझा पुर्वीपासूनचा आग्रह होता.
आपला जिल्हा व शहर हा लष्करी छावणीचा भाग असल्यामुळ केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाला मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असून देखील इथे प्रवेश मिळत नाही. जिल्ह्याची विद्यार्थी संख्या आणि केंद्रिय विद्यालयातील प्रवेश क्षमता पाहता औरंगाबादेत आणखी एक केंद्रीय विद्यालय मंजुर करावे, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार आहोत.
तसेच कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, यासाठी राज्य सरकारकडे देखील आपण पाठपुरावा करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.