माता रमाई ह्या बाबासाहेबांच्या केवळ पत्नी, सहचरिणी नव्हत्या. बाबासाहेब नावाच्या महासूर्यासोबत संसार करीत असताना सतत धगधगत राहणारी पृथ्वीवरल्या तमाम दीन-दलितांच्या आयुष्याला क्रांतीचा मुलामा देणारी मशाल होती. रमाईचे लहानपणीचे नाव रामी होते. रामीचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मध्ये दाभोळ जवळच्या वणंद गावात झाला. त्यांचे वडील भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असत. त्यांना छातीचा त्रास होता. रामी लहान असतानाच तिच्या आईचे म्हणजे रुक्मीणींचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे कोवळ्या रामीच्या मनावर दुःखाघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर हे लहानच होते. पुढे भिकू धुत्रे यांचेही निधन झाले. या भावंडांचे आता माता-पित्याचे छत्रच हरवले. मग वलंगकर काका आणि गोविंदपूरकर मामा या लहान भावंडांना घेऊन मुंबई येथे भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे आपल्या भिवासाठी वधू संशोधन करीत होते. भायखळ्याच्या एका बाजाराच्या दिवशी रामीची गाठ रामजींशी पडली आणि सन १९०६ साली अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांशी बालविवाह संपन्न झाला. त्याकाळी बालविवाहाची प्रथा समाजात रुढ होती.
नऊ वर्षाची भिकु धुत्रेची रमा सकपाळ घराण्यात आली आणि महासूर्याच्या प्रकाशात उजळून निघण्याऐवजी अग्निज्वाळांनी जळत राहिली. एकीकडे प्रचंड महाविद्वान आणि त्याची पत्नी भोळी, अडाणी रमा ही त्या विद्वतेची गौरवशाली सुखसावली झाली तर आज आंबेडकरी नावाच्या महाप्रवाहात समाविष्ट झालेल्या भीमपर्वाची माता रमाई झाली. रमाईचा हा जीवनप्रवास म्हणजे भळभळत्या जखमांची कार्यशाळाच होती. तिच्या अंगी असलेला असिम त्याग आणि बाबासाहेबांवरील प्रचंड निष्ठा हे तिला जगण्याच्या जळण्यातही फुलण्याची शक्ती प्रदान करीत. बाबासाहेबांनी संसाराची कसलीच चिंता करु नये, खूप-खुप शिकावे असे रमाईला मनापासून वाटत असे.
बाबासाहेबांचे त्यांच्या रामूवर जीवापाड प्रेम होते. त्यांना रमाईची दैन्यावस्था जाणवतच नव्हती असे नाही. पण त्याहीपेक्षा धर्मव्यवस्थेच्या विखारी जात्यात भरडत असलेला समाज गटारगंगेतल्या अळ्या किड्यांप्रमाणे जगत होता. त्यांच्या जगण्याचे काही प्रयोजनच नव्हते. तो या पृथ्वीवरील नैसर्गिकरित्या जगत असलेल्या इतर प्राण्यांप्रमाणे सुद्धा ‘माणूस’ नावाचे नामाभिधान तो वापरु शकत नव्हता. मन, काया, वाचा, मेंदू हे सगळेच पारतंत्र्याच्या साखळदंडाने जखडला गेलेला होता. पृथ्वीच्या या अस्पृश्य क्षितीजावर भीमभास्कर उगवायचाच होता. त्या किड्यांना स्वच्छ पाण्यात धुवून काढणार होता. त्यांना अंधार कोठडीतून बाहेर काढून स्वयंप्रकाशित बनविणार होता. जनावरांसारखं लाभलेलं आयुष्य बदलवून माणसाचं नैसर्गिक जगणं प्रदान करणार होता. म्हणून त्या भीमयुगानं कोटी-कोटी चिल्या-पिल्ल्यांचं मातृत्व त्या युगस्वामिनीला बहाल केलेलं होतं. हे अडाणी आणि भोळ्या असलेल्या रमाला प्रकर्षाने जाणवत होतं. त्यामुळच किमान चिमणा-चिमणीचा सुखाचा, येल मांडवाला जाण्याच्या आशीर्वादाचा संसार ती करु शकत नव्हती. किंवा ते स्वप्नंही पाहू शकत नव्हती. तिच्या नशीबी धगधगत राहणंच होतं.
बाबासाहेबांनी रमाईला थोडं फार शिकवलेलं होतं. प्रिय रामू, नावाची पत्रपौर्णिमा दोघांच्यात उगवलेली इतिहासाने पाहिलेली आहे. बाबासाहेबांची पत्रे वाचण्याचा तो एक दुःखोत्सवच असायचा. तो अश्रूंनी नटलेल्या सौंदर्याचा विश्वविजय होता. त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांचा अत्यंत कमी सहवास. रामजी गेल्यानंतर बाबासाहेबांपेक्षा रमाईवरच आभाळ कोसळले. दुःखाच्या मालिकेचा महाएपिसोडच सुरु झाला. एकुलता एक आधारवड उन्मळून पडलेला होता. बाबासाहेब स्वतःच्या घराकडं, संसाराकडं दुर्लक्ष करुन आमचे संसार उभे करीत होते. आमची घरं बांधत होते. त्यामुळे त्यांची पोटची मुलं मरत होती. बाबासाहेबांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळं हे सारं घडत होतं. परंतु त्यांचं सर्वच लक्ष आमच्याकडं होतं. आमच्यामध्येच रमेश, इंदू, गंगाधर, राजरतन जन्माला येत होती. आम्ही तमाम जनता त्या महासूर्याची क्रांतीबीजं म्हणून भारताच्या नवक्षितीजावर सूर्यपुत्र म्हणून जन्माला येत होतो.
बाबासाहेबांच्या पश्चात रमाईनं शेणाच्या गोवर्या थापून संसार चालविला. उदरनिर्वाहाची वा जीवन यापनाची कोणतीही इतर साधनं नव्हती. बाबासाहेबही काही पैसे पाठवतील याची आशा नव्हती. लुगड्याला ठिगळं लावून, चिंध्यांच्या गाठी बांधून जगण्याचा हा जीवनप्रवास होता. हेच स्वाभिमानाचं, कुलवंतीचं जिणं होतं. दुसर्यासमोर पदर पसरण्याचा करंटेपणा रमाईच्या मानी व्यक्तीमत्त्वात नव्हता. कुणाची मदत घेणंही जीवावरं यायचं. यातूनच दिवसेंदिवस उपासमार व्हायची. पोटाला पोटभर नव्हे नीट अन्नही मिळत नव्हतं. शरीरातील शक्ती कमजोर होत होती. अनेक रोगांनी रमाईत आपला ठिय्या मांडला होता. शरीर सातत्यानं खंगत चाललं होतं. रमाईचं शरीर काबाड कष्ट करुन आतून पोखरलं होतं. रमाईचा आजार बळावला होता. सन १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईची परिस्थिती आणखीनच बिघडली. मे महिन्यात तर डॉक्टरांचे औषधपाणीही काम करीना. बाबासाहेब रमाई शेजारी बसून राहत व रमाई बाबासाहेबांकडे नुसत्या पाहत. बोलण्याचा प्रयत्न करायच्या पण तोंडातून आवाजही निघत नव्हता. बाबासाहेब स्वतः औषध आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस देत असत. पण आजार काही केल्या कमी होईना. काळाचा पडदा हळूहळू मृत्यूकडे सरकत होता. तो क्षण आला आणि ‘रामजी का बेटा बडा होशियार’ हे गाणं ऐकताना रमाई नावाच्या त्यागस्विनीची २७ मे १९३५ रोजी सकाळी प्राणज्योत मालवली. त्यावेळी हा युगपुरुष ढसाढसा रडला. आणि एकाकी पडला. राजगृहासमोर लोक मोठ्या संख्येने जमले होते. सर्व परिसर आकांतांत बुडाला. कोट्यावधी दीन-दलितांची आई कायमची दुरावली होती.
आजच्या स्त्रिया रमाईच्या पुढे कितीतरी पट आलेल्या आहेत. कोणती साडी घालावी, कोणते कपडे घालावेत हा एक प्रश्नच त्यांच्यासमोर असतो. खायला जे हवे ते मिळते आहे. जगभरातल्या सर्वच सुखसोयी तिच्या पायाशी लोळण घेत आहेत. अखिल विश्वात मुक्त विहरण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ही माता रमाईची जन्मोनजन्मीची बोळवण आहे. सावित्रीच्या लेकी ह्या रमाईच्याही लेकीच आहेत. आजच्या या लेकींच्या जगण्याला रमाईच्या त्यागाचे संदर्भ आहेत. म्हणून तमाम स्त्रियांनी रमाईचा आदर्श अंगी बाळगला पाहिजे.
आज कुणाला रमाईच्या दुःख वेदनांची जाणीव होत नसेलही परंतु बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाईची ऐतिहासिक भूमिका होती. तिच्या जगण्याला जळण्याची झालर होती, हे नाकारता येत नाही. तिचं वैवाहिक आयुष्य संकटांनीच भरलेलं होतं. पंढरपूरला जाण्याची इच्छाही प्रतिपंढरी वसविण्याच्या महत्त्वाकांक्षी भीम निर्धारापुढे थांबली गेली. दागदागिण्यानेही अलंकृत होण्याचंही एक दुर्लभ स्वप्न तिला पडलं होतं. तिने आम्हाला अनेक स्वप्नं दिली; ती पूर्ण करण्याचे मार्ग, सोयी उपलब्ध करुन दिल्यात. म्हणून आयुष्याचं डिजीटलायझेशन करुन घेणं घातक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचं भोगविलासी जगणं आणि शील, तत्त्व आदर्श यांच्याकडे पाठ फिरवून सुख सोहळे साजरे करणं रमाईच्या त्यागाला तिलांजली देणं आहे. आज प्रत्येकाला आंतरजालानं आपल्या जाळ्यात ओढलं आहे. मोबाईल, टी.व्ही. सारखी तत्सम साधने आपल्या उरावर बसली आहेत. त्यामुळे आदर्शवादाचे रतीब घालणारे बुरखेही टराटरा फाटत आहेत. रमाईची गोड गाणी गळ्यावर गात बसणार्या आणि दूरदर्शनवरील नव्या नव्या मालिकांत गुरफटणार्या स्त्रियांनी बाबासाहेबांआधी रमाईला समजून घेतलं पाहिजे!
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०७.०२.२१