नांदेड, दि. २२ फेब्रुवारी २०२१:
कोरोनाच्या नव्या संकटाकडे गांभिर्याने बघण्याची आवश्यकता असून, पुन्हा टाळेबंदीसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला नियंत्रित ठेवावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी समाजमाध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढला आहे. या तीनही जिल्ह्यांशी नांदेड जिल्ह्याचे रोजचे दळणवळण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत. भारतातील कोरोनाचा नवा विषाणू पूर्वीपेक्षाही अधिक घातक असल्याचे ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी जाहीर केले आहे. कोरोना होऊन गेलेल्या आणि ज्यांच्या शरिरात ‘अॅंटीबॉडी’ आहेत, अशांनाही नव्या कोरोनाची लागण होऊ शकते. या विषाणूचा प्रसार होण्याचे प्रमाणही पूर्वीपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे हे नवे संकट गंभीर ठरू शकते, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.
सार्वजनिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणांसाठी असलेल्या नियमावलीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे. पन्नासहून अधिक लोक सहभागी असलेल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक नागरिकांनी स्वतःहून आपल्याकडील सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ आदी कार्यक्रम स्थगित केले आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी होणारा ‘संगीत शंकर दरबार’ कार्यक्रमही यावर्षी रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
सोबतच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री स्वीकारण्याची गरज आहे. हा कोरोनाला दूर ठेवण्याचा सर्वात सुलभ पर्याय आहे. पण काही नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात निष्काळजीपणे वागून स्वतःचे आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत आहेत. अशा लोकांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना आपण दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात असल्याने नांदेड जिल्ह्यात तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही. गेल्या वर्षी आपण लॉकडाऊन आणि त्याचे दुष्परिणाम भोगले. त्यामुळे पुन्हा ती परिस्थिती येऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.