नांदेड ; प्रतिनिधी
सध्या नांदेडसह सर्व भारतभर कोविड लसीकरण मोहीम चालू असून लसीकरण घेतलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे छायाचित्र असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हेतुपुरस्कर प्रमाणपत्र वितरित करण्यात येत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रत्येक नागरिकाला लसीकरण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपा महानगर नांदेड जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केली आहे.
भविष्यात लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार असल्यामुळे प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत ते ठिकाण सोडून बाकी सर्वत्र प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहेत. नांदेड महापालिकेच्या हद्दीतील लसीकरण केंद्रात मुद्दामहून प्रमाणपत्र वितरित न करता ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे सांगितले जात आहे. सध्या लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्यामुळे ऑनलाइन प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांना करता येत नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रातच प्रमाणपत्र देणे उचित ठरणार आहे. शासकीय लसीकरण केंद्रासह सर्व खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात देखील प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी प्रवीण साले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.