गृहमंत्र्यांवरचे शंभर टक्के आरोप

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज होते. पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.

गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सांगितलं गेलं.

मार्च महिन्याच्या मध्यात वर्षा बंगल्यावर मी तुमची भेट घेतली. त्या ठिकाणी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली. इतकंच नाही तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या अन्य मंत्र्यांना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. गेल्या अनेक महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दरमहा १०० कोटी जमा करण्यास सांगितली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितलं. त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे गोळा करण्यासाठी काय करायचं हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितलं. मुंबईत १७५० बार आणि रेस्तराँ आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा. या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

परमबीर सिंग डीजी म्हणून कार्यरत आहेत. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यासकारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.

भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

“गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिंग यांचं धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिद्ध करण्याच विडाच उचलला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे,” अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी बार, रेस्तराँ यासाठी उघडण्याची घाई केली होती का? असा खोचक सवाल करत जोरदार टीका केली.

“अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो, महिन्याला १०० कोटी?, अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे? बार, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?, यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी,” असं म्हणत प्रसाद लाड यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

“मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,” अशी प्रतिक्रिया यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.

अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते. परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला आहे.‌ सर्वच जण साशंक झाले आहेत. विरोधकांना आता आयतेच कोलीत मिळाले आहे. आधीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. आता यावेळी शिवसेनेसह सत्ता आल्यानंतर हे नीट राहतील, यांच्यावर कोणतेही आरोप होणार नाहीत असे महाराष्ट्राच्या जनतेने गृहीत धरले होते.‌ जर हे आरोप जसे देशमुखांनी फेटाळले तसे निर्दोष सिद्ध केले पाहिजेत. अन्यथा प्रतिमा इतकी मलिन होईल की कशानेही धुवून निघणार नाही.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२१.०३.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *