कंधार;प्रतिनिधी
कंधारमधील गाळे बांधकामाचा पेच अखेर सुटला आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून रखडलेल्या व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सोमवारी सायंकाळी टेंडर उघडण्याची प्रक्रिया नियमानुसार एकदाची पार पडली. यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.तर आज महाराणा प्रतापचौक येथुन या 40 दुकानाच्या गाळे बांधकामाचे भुमीपुजन आज दि.24 मार्च रोजी दुपारी होणार असल्याचे वृत्त आहे.भुमीपुजन नक्की आजच होणार ? का आणखी कोणते विघ्न येणार या कडे सर्वाचे लक्ष आहे.
२०१२ मध्ये जिल्हा प्रशासनाने कंधार शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. यात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. यामुळे व्यापारी रस्त्यावर आले होते. अनेकांचे संसार ध्वस्त झाले. रोजीरोटीसाठी अनेकजण शहर सोडून गेले. बाजारपेठ ध्वस्त झाल्याने शहर भकास झाले.
तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी सर्वप्रथम व्यापारी गाळयांसाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्यानंतर तत्कालीन आमदार तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यापारी गाळयांसाठी प्रयत्न करुन गाळयांसाठी नवीन जमीन उपलब्ध करुन दिली.
मधल्या काळात व्यापारी गाळे कसे बांधावे यावर चिखलीकर व काँग्रेसचे अरविंद नळगें यांच्यात वाद सुरू झाला. चिखलीकर बीओटी तत्वावर तर नळगे नगरपालिकेकडून गाळे बांधकाम व्हावे यासाठी आग्रही होते.
यामुळे गाळे बांधकामासाठी निधी प्राप्त असून ही गाळे बांधकाम अधांतरी लटकून राहिले होते. चिखलीकर व नळगे यांनी गाळे बांधकाम प्रतिष्ठेचा केल्यामुळे पालिकेचे राजकारणही ढवळून निघाले.
यातूनच शह-काटशहचे राजकारण होऊन कोर्टकचेऱ्या झाल्या. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर ४० गाळे बांधण्यासाठी टेंडर काढण्यांत आले.
या टेंडरमध्ये त्रुट्या आल्याचे कारण उपस्थित करून विरोधकांनी पालिकेला दुसरा टेंडर काढण्यास भाग पाडले. दुसरा टेंडर झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल असे वाटत असतानाच पुन्हा विरोधक समर्थकाने गाळे बांधकाम रोखण्याच्या उद्देशाने नियमबाह्यचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गाळे बांधकाम लटकते की काय असे वाटत असतानाच उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. जिल्हाधिकाऱ्यांनीही सोमवारी ती याचिका फेटाळल्यानंतर शेवटी टेंडर उघडण्यात आले.