संपादकीय…
विघ्नहर्त्याच्या विसर्जनाबरोबर कोरोनाचेही विसर्जन व्हावे…!
कोरोना’मुळे प्रत्येकच क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे खेदजनक असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही उपाय आजतरी आपल्याकडे नाही. गणेश भक्तांसाठी सणांचा राजा गणेशोत्सव अवघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची तयारीही लवकरच सुरू होईल. काही गणेश मंडळे सद्यपरिस्थितीचे भान ठेवून भव्य स्वरुपाचा गणेशोत्सव रद्द करु शकतात. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते. मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सूज्ञपणे सर्व टाळावे लागणार आहे. Covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले गेले. यात सर्वांचेच सहकार्य लाभले. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. कोरोनाकाळात सर्व महापुरुषांच्या जयंत्या, स्मृतीदिन, सण, उत्सव अत्यंत साधेपणानेच साजरे झाले. या काळात हे दिवस घरीच साजरे करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. आता गणेशोत्सव घरीच साजरा करा असे सांगणे शक्य नाही म्हणून सरकारने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
गणपतीचे आगमन २२ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीला घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल.याला कोणतेही बंधन असणार नाही. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील, अशी महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या भक्तांची आशा आहे. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील तर चांगलेच असणार आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मंडपात दरवर्षी जशी गर्दी होते तशी नको आहे. गणपतीचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होणे आवश्यक आहे. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी मुख्यमंत्र्यांनी सखोल चर्चा केली आहे. गणेश विसर्जन शक्य असल्यास पुढील वर्षी करता येईल का याचा विचार करण्यास पार्श्र्वभूमी तयार होत आहे. गणरायाच्या कृपेने या कोरोना नावाच्या विघ्नाचेही विसर्जन होईल अशी अपेक्षा ते बाळगत आहेत. गणपती दूध पिणार नाही पण तो भारतावरील संकटाला दूर करीत कोरोनाला गिळून टाकेल, ही एक मुख्यमंत्र्यांची श्रद्धा आहे. श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल व गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य व संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श व परंपरा नेहमीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल. मात्र सर्वच गणेश मंडळांना घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर कोरोनाचा कहर निर्माण होऊ शकतो.
गंगाधर ढवळे ,नांदेड