कंधार दि.14 एप्रिल ( प्रतिनिधि)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. दीन, दलित, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढा देऊन जगाला मानवतेचा संदेश दिला. दुर्बल घटकातील व्यक्तींना शिक्षित करुन सशक्त केले. न्याय व समतेवर आधारित प्रगतशील असे संविधान देशाला दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व विचार हे समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय व समतेचे पुरस्कर्ते असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी जि.प.सदस्य संजय भोसीकर यांनी केले.
बुधवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कंधार शहरातील प्रियदर्शनी कन्या शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर,प्राचार्या सौ.राजश्री शिंदे,कृष्णाभाऊ भोसीकर,स्वच्छतादूत तथा पत्रकार राजेश्वर कांबळे, सुदर्शन पेठकर, अशोक कांबले,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना संजय भोसीकर म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. दीन, दलित, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढा देऊन जगाला मानवतेचा संदेश दिला. हजारो वर्षापासून गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या भारतीय स्त्रीयांना शिक्षित करुन सशक्त केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड बुद्धिमत्ता होती. त्यांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. त्यांनी एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण केले. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. न्याय व समतेवर आधारित प्रगतशील असे संविधान देशाला दिले. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. डॉ आंबेडकर यांचे कार्य भारतीय समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे असे संजय भोसीकर म्हणाले. या प्रसंगी सौ. वर्षाताई यांनी बाबासाहेबांच्या स्त्री विषयी कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. राजश्री शिंदे यांनी केले. तर आभार अशोक कांबले सर यांनी मानले.