नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील पारंपारिक मूल्यव्यवस्था नाकारली आणि भारतीय समाजाच्या पुनर्चनेसाठी संवैधानिक मूल्यांची नवी संरचना मांडली. आंबेडकरी चळवळीत तसेच बाबासाहेबांच्या लेखनात, त्यांच्या भाषणात व्यवस्था बदलाचे सूत्र होते. समता, स्वातंत्र्य बंधुता, न्याय या चतुसूत्रीवर आधारलेल्या धम्माचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत पडलेले आहे. म्हणून धम्म हाच बाबासाहेबांच्या व्यवस्थांतराचा तत्वव्युव्ह आहे असे ठाम मत येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्मम संकुलातील प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी मांडले. ते आॅनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ता. १२ रोजी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, कार्यक्रमाचे समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, प्रा. माधव सरकुंडे, भैय्यासाहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून १० एप्रिलपासून अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी ‘बाबासाहेबांच्या व्यवस्थांतराचा तत्वव्युव्ह’ या विषयावर आपले परखड मत व्यक्त केले. ते बोलतांना पुढे म्हणाले की, जात नाही ती जात असे म्हणतात ते निखालस चुकीचे आहे. जात जन्माला आली तर ती जाईलच! परंतु बाबासाहेबांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्य, अगाध ज्ञान, प्रचंड अभ्यास आणि लढ्यांच्या जोरावर इथली माणूसपण नाकारणारी मूल्यव्यवस्था नाकारली. बौद्ध धम्म हा सबंध भारतीय समाजव्यवस्थेला दिलेला पर्याय आहे, असे ते म्हणाले. आज काही भारतीय समुह समतेच्या दिशेने निघाले आहेत. मानवी कल्याण्यासाठीच्या सर्वहितकारी भूमिका त्यांना मान्य आहेत. अशा रीतीने भारत बौद्धमय होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आॅनलाईन पद्धतीने संदिप व्यवहारे, उषा नगराळे, दीपक भालेराव, अभय अवथरे, शिलवंत डोंगरे, डॉ. रंगनाथ नवघडे, अश्विनी गडलिंग, धम्मानंद सोनकांबळे, आकाश संसारे, सुधाकर सोनोने, इश्वर चिकाटे, विनायक ढवळे, रामदास सावळे, संतोष चिरमाडे, अशोक खनाडे, मिलिंद ढवळे, तुकाराम सोनवणे, पांडूरंग कोकुलवार आदींनी प्रतिक्रियासह सहभाग नोंदवला. तसेच महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे, देवानंद सुटे, सुनंदा बोदिले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.
चौकट-
कोरोना महामारी हे भयचिंतेचे नाव
सद्या कोरोनाच्या महामारीचा भयंकर काळ सुरू आहे. त्यात अनामिक भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाबत आकड्यांची भाषा बोलली जाते. टाळेबंदी करायची की नाही, किती दिवसांची करायची ह्याबाबत निर्णय होत नाही. परंतु टाळेबंदीचे जे दुष्परिणाम होतात याची गणती नाही. आकड्यांचा नव्हे तर माणसांचा विचार झाला पाहिजे. बाबासाहेबांनी आरंभिलेल्या चळवळीत माणूस हा केंद्रबिंदू होता. यासंदर्भाने माणसाच्या मनातील भिती आधी दूर झाली पाहिजे असे डॉ. गोणारकर बोलताना म्हणाले.