नांदेड – देशात जे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे ते केवळ शेतकऱ्यांसाठीच नसून ते आंदोलनाला समर्थन देणाऱ्या बहुसंख्यांकांचे आहे. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेले कायदे हे शेती, शेतमजूर आणि शेतकरी यांच्यासाठी अहितकारक आहेत. शेतीचा मालक हा व्यापारी असेल. शेतकऱ्यांना गुलाम बनविणारी ही प्रक्रिया आहे. कायदे लागू झाले तर ते भांडवलदारांच्याच फायद्याचे असतील असे स्पष्ट मत प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांनी मांडले. ते अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अरविंद निकोसे , अमृत बनसोड, संजय मोखडे, प्रमोद वाळके, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, सुनील कुमरे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीपर्वानिमित्त साहित्य महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आॅनलाईन पद्धतीने दि. १० एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानमाला सुरू आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते झाले. त्यानंतर यवतमाळ येथील प्रा. माधव सरकुंडे आणि नांदेड येथून प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर यांनी आपले विचार मांडले. चौथे पुष्प ‘बाबासाहेब, संविधान आणि शेतकऱ्यांची आंदोलने’ हा विषय घेऊन डाॅ. प्रकाश राठोड यांनी गुंफले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी भारतीय संविधानात कलम ४८, ११ वी अनुसूचि, भाग नऊ – अनुच्छेद २४३ (छ) नुसार आर्थिक विकास, कृषी व पशुसंवर्धन यांतील सुसूत्रता याबाबत अंतर्भाव करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांचा सर्वसामावेशक विचार न करता घटनात्मक तरतुदी निष्प्रभ करण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आॅनलाईन व्याख्यानमालेत फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मुरलीधर थोटे, रविंद्र कचरे, शत्रुघ्न लोणारे, आश्विनी गडलिंग, सुभाष लोखंडे, संजय डोंगरे, संदिप व्यवहारे, धर्मेंद्र जाधव, प्रशांत पाईकराव, मोतीराम मनोहर, सुरेश खोब्रागडे, उषा नगराळे, शिलवंत डोंगरे, पंकजपाल राठोड, डॉ. सुनील होळे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. आज १५ एप्रिल रोजी प्रा. डॉ. अनंत राऊत हे सहभागी होणार असून येत्या शुक्रवारी प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.
देशात कोरोनाच्या आडून राजकारण
जेथे निवडणूका आहेत तिथे मोठ मोठ्या सभा होतात. कुंभमेळा भरविला जातो. कोरोनाच्या आडून राममंदिर बांधणे, शाहिनबाग आंदोलन चिरडणे, मुलांचे शैक्षणिक भवितव्य उध्वस्त करणे, नागरिकत्व कायदा लादणे, टाळेबंदीतून सर्वसामान्यांना देशोधडीला लावणे आदी कार्यक्रम हाती घेतले गेले आहेत. त्यामुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय अस्तित्वाला कलाटणी देणारे आहे. त्यामुळे सरकार हे आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, असे डॉ. प्रकाश राठोड म्हणाले.