संविधानमूल्यांचा उजेड पेरणारे क्रांतिकाव्य : यशवंत मनोहर यांची युद्धकविता
समिक्षा…….
समाजाने नाकारलेल्या माणसाच्या जगण्यातला उद्वेग आपली आशयाभिव्यक्ती बनविणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. यशवंत मनोहर. मनाची सीमातीत, जात्यतीत आणि धर्मातीत व्यापकता असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखणीने अनेकांच्या नकारजीवनात संविधानसौंदर्याच्या ‘कलमां’ची पेरणी करीत समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा विचार प्रसृत करणाऱ्या बोधिवृक्षाची विचारसावली फुलवली. त्यामुळेच ‘माणसाचे माणूसपण’ हाच आपल्या विचारसिद्धांताचा पाया मानणाऱ्या डॉ. मनोहरांची कविता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्धचा उद्रेक घेऊन येते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रेरणेचा पांथस्थ होताना शोषकांच्या कारखाने उद्ध्वस्त करते.असे करताना माणूस विस्कटून जाणार नाही, याचीही काळजी घेत डॉ. मनोहर यांची कविता माणसांसाठी युद्ध पुकारते. डॉ. मनोहर यांच्या १९७७मध्ये प्रकाशित ‘उत्थानगुंफा’ या पहिल्याच काव्यसंग्रहातून स्वातंत्र्यविरोधी सर्वच अरिष्टांना जाळण्याचा ध्यास घेणारी कविता त्यांच्यातील अस्वस्थेता विद्रोहाग्नी होऊन येते. कवीच्या आत धुमसत असलेल्या या विद्रोहाग्नीला मिळणारे अभिजात शब्दकळांचे रूप म्हणजे ‘उत्थानगुंफा’ या संग्रहातील कविता आहेत. ‘उत्थानगुंफा’ आणि त्यानंतरचे ‘काव्यभीमायन’, ‘मूर्तिभंजन’, ‘जीवनायन’, ‘प्रतीक्षायन’, ‘अग्नीचा आदिबंध’, ‘स्वप्नसंहिता’, ‘युगांतर’, ‘बाबासाहेब..!’, ‘युगमुद्रा’, ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’, अशा एकूण ११ कवितासंग्रहांतून डॉ. यशवंत मनोहर यांना अस्वस्थ करणारी माणसाचे माणूसपण चितारणारी शब्दकळा चितारतानाच आपल्या न्याय हक्कासाठी पेटून उठण्याची ऊर्मी जागते. त्यामुळे डॉ. मनोहर यांची कविता जात, धर्म, वंश, देश अशा सीमारेषांपलिकडे जाऊन परिवर्तनवाद, विज्ञानवाद आणि पुनर्रचनेची मांडणी करताना तर्कगंभीर युद्ध पुकारते. डॉ. यशवंत मनोहर यांच्या उपरोल्लेखीत अकराही कवितासंग्रहांचा आशयानुबंध उलगडण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ. अक्रम हबीबखान पठाण लिखित ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ हा समीक्षाग्रंथ.
‘कवी यशवंत मनोहर यांची कविता ही युद्धकविताच आहे, तिने येथील सर्वच प्रकारच्या अमानुषतेशी निकराचे युद्ध पुकारले आहे. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाला दयनीय करणाऱ्या घृणास्पद आणि अमानुषतेच्या छळछावण्यांशी युद्ध करून ‘माणूस’ कसा अजिंक्य आहे हेच त्यांच्या कवितेने सिद्ध केले आहे. कवीने पुकारलेले युद्ध सर्वच अंतर्विरोधांशी आहे. या अंतर्विरोधाने मानवी जीवनाला ‘बोन्साय’ करून टाकले आहे. माणूस हा आता ‘बोन्साय’ होता कामा नये म्हणून मनोहरांच्या कवितेने युद्ध पुकारलेले आहे.’ ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ या समीक्षा ग्रंथामागील भूमिका मांडताना डॉ. अक्रम पठाण यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या काव्यातील सामाजिक आशयाभिव्यक्तीसोबतच क्रांतिभिमुखता अधोरेखित केली आहे. डॉ. यशवंत मनोहर यांच्या अकराही कवितासंग्रहांवर स्वतंत्र समीक्षात्मक लेख लिहितानाच आपल्या आकलन मर्यादांनाही डॉ. पठाण यांनी वाचकांसमोर ठेवत डॉ. मनोहर यांचा विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला आहे.उत्थानगुंफा : मराठी कवितेला बुलंद इहवादी पाया देणारी ज्वालांची कविता’, ‘काव्यभीमायन : भीमक्रांतीच्या मर्मविधानाचा नक्षत्रपिसारा’, ‘मूर्तिभंजन : वेदनेतून सर्जकता सिद्ध करणारी कविता’, ‘जीवनायन : उजेडाचे लालित्य विशद करणारी कविता’, ‘प्रतीक्षायन : स्त्री-पुरुष या आदिम नात्यांचा सन्मान करणारी कविता’, ‘अग्नीचा आदिबंध : सर्जनशील सौंदर्याची मनोरम बाग फुलविणारी कविता’, ‘स्वप्नसंहिता : मानवी मूल्यांची संहिता’, ‘युगांतर : माणसाला महानायक करणारा कवितासंग्रह’, ‘बाबासाहेब..! : ग्लोबल आंबेडकरवादाची मांडणी करणारी कविता’, ‘युगमुद्रा : मानवतेचे धगधगते सौंदर्य फुलविणारी कविता’, ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता : सांस्कृतिक शल्यचिकित्सा’ या समीक्षात्मक लेखांतून डॉ. अक्रम पठाण यांनी ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.’उत्थानगुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहातील डॉ. यशवंत मनोहर यांच्या कविता नकार, विद्रोह आणि मानवता या तत्त्वत्रयीचे विचारसूत्र मांडणारी आहे.
मला मान्य नाहीतुमच्या बोटांपुढची दिशामला मान्य नाहीपरंपरागत वर्णपाती नशा
समाजातील वर्णव्यवस्था, जातव्यवस्थेला आव्हान देणारी डॉ. मनोहर यांची कविता शोषणाविरोधात विद्रोहाची ठिणगी होताना भारतीय संविधानाचा मूल्यजागर करते. तद्वतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार हाच डॉ. यशवंत मनोहर यांच्या काव्य पर्यावरणाचा क्रांतिबिंदू होते. ‘बाबासाहेब..!’ या कवितासंग्रहातील याच शीर्षकाच्या कवितेत डॉ. यशवंत मनोहर म्हणतात
बाबासाहेब..!आता आम्ही जीवनाला प्रश्न विचारतोआम्ही उजेडाला प्रश्न विचारतो.आम्ही भांडवली जागतिकीकरणालाआणि उदारिकरणाला सरळ प्रश्न विचारतोगोंधळून न जाता विचारतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या मृतप्राय मनात चेतना फुंकली आणि नव्या आत्मभानाने आम्ही प्रश्न विचारणारे झालोत. या चेतनेमुळे हजारो वर्षे मृतवत जीवन जगणाऱ्यांना सुंदर आणि विद्रोहाचे जगणे बहाल केले. म्हणूनच सर्वच वंचित घटक आज प्रस्थापित व्यवस्थेला गोंधळून न जाता प्रश्न विचारत आहेत, असे समीक्षात्मक रसग्रहण डॉ. अक्रम पठाण यांनी संबंधित कवितांवरील आपल्या प्रत्येक लेखात केले आहे. डॉ. यशवंत मनोहर यांच्या संबंधित संग्रहातील काव्यसौंदर्य, कवी मनोहरांची शैली, संबंधित काव्यसंग्रहातील प्रतिमा, संबंधित काव्यसंग्रहातील विद्रोह, जीवनदृष्टी आणि काव्यदृष्टीची समीक्षात्मक मांडणी करतानाच डॉ. अक्रम पठाण यांनी त्यातील प्रतिमा-प्रतीकांतील सौंदर्यस्थळे उलगडली आहेत. समीक्षात्मक लेखनाला आवश्यक असलेली डॉ. अक्रम पठाण यांची स्वत:ची अंगभूत भाषाशैली वाचकाला या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर खिळवून ठेवते. ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ या संग्रहाला डॉ. पी. विठ्ठल यांची साक्षेपी प्रस्तावना लाभली आहे. डॉ. यशवंत मनोहर यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील लेखनातील सीमारेषेचे मन्वंतर अधोरेखित करीत डॉ. मनोहरांच्या काव्यजाणिवांतील समकालीनतेकडे लक्ष वेधले आहे. ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ या समीक्षा ग्रंथाचे जयंत आष्टनकर यांनी डॉ. यशवंत मनोहर यांचा काव्यप्रवास उलगडणारे मुखपृष्ठ अत्यंत समर्पकतेने चितारले आहे. एकूणच ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ या समीक्षाग्रंथाच्या निमित्ताने डॉ. यशवंत मनोहर यांच्या काव्यातून व्यक्त होणाऱ्या मानवतावादी दृष्टिकोनाचा आणि संविधानातील मूल्यजागराचा भावानुबंध समीक्षेच्या अंगाने संवेदनशीलपणे उलगडला आहे.
यशवंत मनोहरांची युद्धकविता’
(समीक्षा)लेखक : डॉ. अक्रम हबीबखान पठाणसमीक्षक : सुरेंद्र गोंडाणे, नागपूर.प्रकाशन : बहुजन साहित्य प्रसार केंद्र, नागपूरमुखपृष्ठं : जयंत आष्टनकरकिंमत : १८० रुपये.पृष्ठं : १९२