लॉकडाऊन’ पाळून रूग्णवाढ रोखा; अन्यथा व्यवस्था कोलमडण्याची भीती,,,!पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे कळकळीचे आवाहन

नांदेड, दि. १८ एप्रिल २०२१:

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करते आहे. पण रूग्णवाढीचा वेग कमी झाला नाही तर साऱ्या सुविधा अपुऱ्या पडण्याची भीती आहे. कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तूर्तास ‘लॉकडाऊन’चे काटेकोर पालन हाच पर्याय आहे. अन्यथा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडेल व कठोर ‘लॉकडाऊन’शिवाय इलाज राहणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

रविवारी सकाळी समाजमाध्यमांवरून जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी लोहा तालुक्यात कोरोना रूग्णाच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या घटनेचा संदर्भ देत कोरोनामुळे समाजमनावर मोठा आघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेवरून कोरोना रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबाची मानसिक स्थिती कशी असेल, याची कल्पना येते. मी आणि माझे कुटूंब या प्रसंगातून गेलो आहे. विरोधकांवरही कधी अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, असे सांगून परिस्थिती चिंताजनक असली तरी सर्वांनी मिळून धैर्याने त्याचा मुकाबला करावा लागणार असल्याचे चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली. नांदेड येथील २०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उद्यापासून कार्यरत होणार आहे. तिथे ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध असेल. ग्रामिण भागातील नागरिकांना प्रारंभिक उपचार किंवा ऑक्सिजनसाठी नांदेडच्या रूग्णालयात येण्याची गरज भासू नये, या दृष्टीने अनेक ग्रामिण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मध्यंतरी जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडेल असे वाटत होते. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्यात येत असून, १३ तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करतो आहोत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले.

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांमध्ये अडचण होऊ नये म्हणून यंदाच्या टाळेबंदीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काहीअंशी शिथिलता दिली. पण दुर्दैवाने रस्त्यावरील गर्दी फारशी कमी झालेली नाही. नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतले नाही तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करण्याशिवाय राज्य सरकारकडे इलाज राहणार नाही, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायांनी त्यांना घरूनच अभिवादन केले. त्याचप्रमाणे पुढील काळात येणारे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, ईद आदी सण-उत्सव तसेच महापुरूषांच्या जयंती-पुण्यतिथीला सुद्धा नागरिकांनी गर्दी न करता घरी राहूनच आपली श्रद्धा व्यक्त करावी, अशीही विनंती अशोक चव्हाण यांनी केली.

कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी. अशा संस्थांना कोविड सेंटरचे बाह्य व्यवस्थापन, कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे आदी कामांसाठी मदतीला घेता येईल, असे पालकमंत्री म्हणाले. या संकटकाळात अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना रूग्णांच्या अंत्यविधीसारखे अवघड काम केले. माणुसकीच्या नात्याने त्यांनी दिलेले हे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे सांगून अशोक चव्हाण यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *