सात दिवसीय आॅनलाईन व्याख्यानमालेचा समारोप; दर्शकांची मोठ्या संख्येने आॅनलाईन पद्धतीने उपस्थिती
नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशात आणि जगभरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली जाते. आपण जयंतीचा अर्थ बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक असा घेतला आहे. परंतु आंबेडकरी विचार हा माणसाच्या क्रांतिकारी पुनर्रचनेचा विषय आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हा मनोरंजनाचा, नाचगाण्याचा विषय नसून ती एका मानवमुक्तीच्या लढ्याच्या विजयाची आणि क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळाच आहे असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, अमृत बनसोड, संयोजक प्रशांत वंजारे समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, किरण पतंगे, डॉ. प्रकाश राठोड, साऊल झोटे, शालिक जिल्हेकर, सुनील कुमरे, संजय डोंगरे, भैय्यासाहेब गोडबोले यांच्यासह शेकडो दर्शकांची आॅनलाईन उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दि. १० एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत पद्मश्री लक्ष्मण माने, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली. व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी (ता. १६ ) यशवंत मनोहर बोलत होते. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे युगांतराचे नियोजन’ या विषयावर आपले विचार मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, जयंती म्हणजे जन्मदिवस नव्हे. हा दिवस म्हणजे व्यवस्थांतराचा तत्वव्युह मांडणाऱ्या आणि विषम व्यवस्थाच उध्वस्त करणाऱ्या समर्थ बुद्धिवादाची ही जयंती आहे. एका विश्वविख्यात महातत्वज्ञानाचीच ही जयंती आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचं पर्व युगांतराच्या नियोजनाचं पर्व म्हणून साजरं झालं पाहिजे.
वर्गणी गोळा करून, मोठ्या स्वरुपाची सजावट करुन, चित्र विचित्र प्रकाश योजना, डीजे लावून आणि त्याच्या तालावर बीभत्सपणे नाचून, निळ उधळून जयंती साजरी करु नये. ही बाबासाहेबांच्या वैचारिकतेला, तत्वज्ञानाला, जगण्याच्या आदर्शवादाला, माणसाच्या स्वातंत्र्याला, हद्दपार करण्याची ही प्रक्रिया आहे. जयंतीच्या सोहळ्याला विकृत करण्याचा, तत्वज्ञानाला भिडू न देण्याचा हा कट आहे. क्रांतीला गोठविणारी जी व्यवस्था आहे, त्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेच्या अधिन तुम्ही झालं पाहिजे. तिचं दास्यत्व तुम्ही पत्करलं पाहिजे अशी इथल्या आंबेडकर विरोधकांची अभिलाषा असते. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी जयंतीचं चिंतनशील प्रारुप समजून घेतलं पाहिजे असे डॉ. मनोहर म्हणाले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.
जगण्याच्या सर्वच क्षेत्रात महामारीचा शिरकाव
डॉ. मनोहर म्हणाले की, भारतीय राजकारणातही कोरोना महामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज कोरोनाचा प्रश्न जगण्याचा महाप्रश्न, महासंकट झाला आहे. प्रत्येकाला जगण्याची निश्चिती वाटत नाही. या देशातल्या बहुजनास, सर्वहारांना, उपेक्षितांना एका अर्थानं बाहेर काढणारं, पदच्युत करून जीवनाच्या मुख्य प्रवाहातून हद्दपार करणारं वातावरण निर्माण झालं आहे. राजकारणाबरोबरच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि साहित्याच्याही क्षेत्रात कोरोना शिरला आहे. गोरगरिबांना हाल अपेष्टांनी या व्यवस्थेतूनच अदृश्य केल्या गेलं आहे. व्यवस्थेनं लोकांना मारलं नाही तर विचारबंदी केली, मेंदूचीच टाळेबंदी केली, संवेदनशीलता बंद केली तर वेगळं मारण्याची गरजच उरत नाही. अशा अत्यंत संवेदनशील काळात बौद्धिक शक्ती पणाला लावून जयंतीचं पावित्र्य, वैचारिक मूल्य अबाधित ठेवायला हवं.—————————————————————————————————————————————————————————————————-