नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता. परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एकपक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि महत्वाच्या उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते, असे त्यांचे मत होते. मार्क्सपेक्षा बुद्धाचा समाजवाद अधिक टोकदार होता. तो जीवनाच्या प्रश्नांना भिडणारा होता. माणसांची मनं जिंकून विजय प्राप्त करणारा बुद्धाचा क्रांतिकारी समाजवाद बाबासाहेबांनी स्विकारला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोककल्याणकारी समाजवाद गरजेचा आहे असे मत येथील पिपल्स विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रपाठक तथा संविधान संस्कृतीचे अभ्यासक डॉ. अनंत राऊत यांनी केले. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, अमृत बनसोड, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, भैय्यासाहेब गोडबोले, साऊल झोटे, बी.बी. गजभारे, सुमित गायकवाड, साहेबराव नितनवरे, इवान केंझी, गणपत वाठोरे, विरभद्र मिरेवाड, सिद्धार्थ मोरे, संदिप व्यवहारे, निवृत्ती पाटील आदींची उपस्थिती होती.
अ. भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर १० एप्रिलपासून आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. डॉ. राऊत म्हणाले की, समाजवाद ही भांडवलशाहीच्या दोषांविरोधात निर्माण झालेली प्रतिक्रिया होती. समाजवादात लोककल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेचा आशावाद होता. भांडवलशाहीने जन्माला घातलेल्या विषमता, शोषण, ‘ नाही रे’ वर्गाची पिळवणूक यांसारख्या अनेक समस्यांचा अंत करायचा असेल तर उत्पादन साधने समाजाच्या मालकीची असणे आवश्यक आहे अशी भूमिका बाबासाहेबांची होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाती व्यवस्थेवरील हल्ला हे केवळ उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादाला दिलेले आव्हान नव्हते तर आर्थिक विकासाशी त्यांच्या मांडणीचा जवळचा संबंध होता. जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
व्याख्यानमालेच्या सहाव्या दिवशी देशभरातून विविध ठिकाणाहून सहभागी झालेल्या दर्शकांच्या प्रतिसादात ‘बाबासाहेबांचा क्रांतिकारी समाजवाद’ या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. डॉ. राऊत पुढे म्हणाले की, माणसातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरातील भिन्नतेमुळे निर्माण झालेले भेद अमान्य आहेत. अशा भेदरहित समाजाकडून सर्व गरजा आणि गरजा पुरवणाऱ्या सेवा आणि संसाधनांवर नियंत्रण राहील हा मुख्य विचार ‘सर्वजण समान आहेत’ ही प्रेरणा देतो. इथे आर्थिक स्त्रोत कोणा एकाच्या मालकीचे नसून शासनाच्या मालकीचे असावेत. संपत्तीची खाजगी मालकी हे शोषणाचे व दुःखाचे मूळ कारण आहे. महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे, सुनील कुमरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत व लेखक डॉ. यशवंत मनोहर यांच्या भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.
देशात भांडवलशाही धार्जिणे धोरण लागू
देशात गोरगरिबांच्या हिताची भाषा करायची आणि मूठभर भांडवलदारांसाठी धोरणे लागू करायची असा प्रकार सुरू आहे. बीएसएनएल ही शासकीय सेवा बंद पाडून जीओ ला प्रोत्साहन दिले. रेल्वे, एलआयसी, बँकांच्या खाजगीकरणातून आरक्षण, लोकशाहीतील कल्याणकारी समाजवाद संपुष्टात आणल्या जात आहे. कोरोनामुळे प्रस्थापितांच्या हातात आयते कोलीत आले आहे. जयघोष, आंबेडकरवाद्यांचे लांगूलचालन, भावनिकतेतून खऱ्या आंबेडकरी चळवळी आधीच थंडावल्या आहेत आणि कोरोनाने कोणत्याही मोर्चा, आंदोलनाला आडकाठीच आणली आहे. परंतु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी समाजवाद विरोधी धोरणांचा कडाडून विरोध केला पाहिजे. नव्या चळवळी जोमाने उभ्या राहिल्या पाहिजेत आणि बुद्धाचा क्रांतिकारी समाजवाद प्रस्थापित झाला पाहिजे असे डॉ. राऊत म्हणाले.