मुक्त विहार दिनांक-२०/०४/२०२१
नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर शाळेत गेले. गेट उघडले. जे आधी आम्ही येण्यापूर्वीच उघडे असायचे. चिमुकली पाखंर
“माझ्या मॅडम आल्या, मॅडम आल्या.”
म्हणत धावत पळत जवळ यायची.हातातली पिशवी नको म्हटले तरी काढून आपल्या हातात घ्यायची. त्यांना मॅडमना काय सांगू आणि काय नको असं होऊन जायचं.
“आमच्या गायीला वासरू झालं बरं का.लई भारी हाय. जन्माला आलं की थोड्या वेळात कान वर करून उभं पण राहिलं”.
तोपर्यंत दुसऱ्याला सांगण्याची घाई असायची.
“आमच्या आजीनं राती आम्हाला लई भारी गोष्ट सांगितली.मी आज ती वर्गात सांगणार हाय. सांगू ना मी गोष्ट?”.
कुणाला घरात झालेले संवाद, घटना सांगण्याची घाई तर, कोणाला गावात नवीन कोण आलंय त्याचं वर्णनं करण्याची घाई.मॅडमना काय सांगू आणि काय नको असं या चिमुकल्या लेकरांना होऊन जायचं.
कधी ती आपल्या मनातली गोष्ट सांगताना इतकी रंगून जायची की “बाई ऐका ना म्हणण्याऐवजी,आई ऐक ना म्हणायची.”
लक्षात आले की जीभ दाताखाली धरून उगीच चावायची. पाठीवरून हात फिरवला की, लगेच चेहऱ्यावर हास्य फुलायचे.
शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांना पाणी घालताना, त्यांची निगा राखताना अनेक प्रश्न मुलं आम्हाला विचारायची.
“गुलाबाला कळी कधी येणार”?
“पेरुचे झाड कधी मोठे होणार?
“झाडाला आवळे कधी लागणार?'”
एक ना अनेक प्रश्न बालमनाला पडलेले असायचे. पण आज कोणीच बोलत नव्हतं. गुलाबाच्या झाडाला खूप कळ्या आल्या होत्या. पण त्या पाहण्यासाठी छोटी लेकरं नव्हती. छोटंसं रोपटं वाढताना त्याचं निरीक्षण करायचे होते.त्यांना झाडं मोठे झालेले कळ्या फुलांनी भरलेले पाहायचे होते. पण काय करणार! कोविड१९ ने दिवसच बदलले.सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले.१ली ते४थी पर्यंतची मुले वर्षभरात शाळेत येऊच शकली नाहीत.
तेवढ्यात एक रंगीबेरंगी फुलपाखरू झाडावर येऊन बसले. मोगऱ्याच्या वेलीवर खूपच कळ्या, फुले आली होती. सुगंध चोहीकडे दरवळत होता. छोट्या चिमण्या, पक्षी आवळ्याच्या झाडावर चिवचिवाट करत होती. आज जणू पक्ष्यांची शाळा भरल्यासारखे वाटत होते. काळ्या रंगाचा छोटा पक्षी तर धीटपणे जवळच येऊन बसला. आपले छोटे पंख हलवत मागे पुढे करू लागला. निलगिरीच्या झाडावर दोन खारुताई पाठशिवणीचा खेळ खेळत आसताना दिसल्या. वर्षभर शाळाच भरली नाही त्यामुळे पक्षी प्राण्यांचा मुक्त वावर सगळीकडे दिसत होता. पाणी,भरपूर झाडे, गावापासून एका बाजूला लांब शांत ठिकाणी शाळा असल्याने ते त्यांनी आपले निवासस्थानचं करून ठेवले होते. झाडांना पाणी घालावे या विचारात मी उठले. बादलीने पाणी घालू लागले. तर बिळातून खसफसण्याचा आवाज आला. मी लगेच बाजूला झाले .तेवढ्यात करड्या रंगाचा ससा उड्या मारतच बाहेर आला. मला पाहताच घाबरून तो पळाला. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या आजोबांना मी तो ससा दाखवत होते. तर ते लगेच मला म्हणाले
“ससा काय घेऊन बसलात, कितीदा मी तुमच्या शाळेच्या आवारात साप फिरताना पाहिलाय. तुम्हीपण जरा जपून दरवाजा खोलत जा. ते काय किरडू कुठं बी लपून बसतं”.
आजोबांच्या त्या बोलण्याने मी न घाबरल्यासारखी दाखवत होते पण मनातून कुठेतरी भीती वाटतच होती.
वर्गात येऊन बसले पण जिथं मुलेच नाहीत. हास्य नाही, बोबडे बोल नाहीत,नवीन काहीतरी करू म्हणत उडया मारणारे आमची चिमणी पाखंर नाहीत. ती शाळा खूपच पोरकी वाटत होती.मन रमेना म्हणून मी परत शाळेच्या पायरीवर येऊन बसले. फुलांवर उडणाऱ्या फुलपाखरांना, आणि मुक्तपणे फिरणाऱ्या प्राणीपक्ष्यांनाच प्रश्न केला.
‘कधी येतील चिमुकले पक्षी माझ्या शाळेच्या घरट्यात? कधी भरेल माझी शाळा? आणि वाहील पुन्हा एकदा नव्याने चैत्यन्याचे वारे….
लेखिका-रंजना सानप
मायणी(सातारा)