फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि दिवसागणिक होत असलेली बाधित रुग्णांची वाढ रोखण्यासाठी व प्रादुर्भावावर अंकुश ठेवण्याच्या हेतूने प्रशासनाने कंधार तालुक्यातील चार गावे कंटेंटमेंट झोन म्हणून ता.१९ एप्रिल रोजी जाहीर करून सदर गावांच्या ग्राम पंचायतीला तसे लेखी पत्र पाठवून सतर्क राहण्याचे आवाहन केले खरे परंतु आमचं गाव पाच दिवसापासून नावालाच कंटेंटमेंट झोन , मग आम्हाला सुविधा पुरवणार तर कोण ? असा सवाल फुलवळ पासून जवळच असलेल्या मुंडेवाडी येथील सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी व्यक्त केला असून प्रशासनाच्या अशा दुर्लक्षितपणामुळे व दिरंगाईमुळे आजपर्यंत कुठलीच आरोग्य सुविधा किंवा उपचार अथवा साधी तपासणी सुद्धा करायला कोणी फिरकले नाही अशी खंत व्यक्त केली.
कंधार तालुक्यातील एकूण चार गावे प्रशासनाने कंटेंटमेंट झोन म्हणून ता. १९ एप्रिल रोजी जाहीर केली असून त्यात कुरुळा , उस्मानगर , शेकापूर आणि मुंडेवाडी या गावांचा समावेश आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार कुरुळा येथे २६ , उस्माननगर येथे २१ , शेकापूर येथे २४ तर मुंडेवाडी येथे १९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचे कळते. त्यानुसार कंधार तहसीलदार यांच्या आदेशानुसार सदर चारही गावं कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करून त्या त्या गावात बॅरिकेट , निर्जंतुकिकरण ची फवारणी करावी असे लेखी पत्र गटविकास अधिकारी कंधार , पोलीस स्टेशन कंधार व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कंधार यांना पाठवून सतर्क करण्यात आले आहे.
परंतु तहसीलदार कंधार यांनी ज्यांना ज्यांना जबाबदारी म्हणून सदरचे पत्र पाठवले होते त्यापैकी कोणीही अद्याप प्रत्यक्षात गावात फिरकलेच नसून केवळ औपचारिकता म्हणून ते पत्र ग्रामसेवक यांच्या वॉट्सअपवर पाठवून देऊन संबंधितांनी जबाबदारीतून हात झटकले असल्याची माहिती देत केवळ ग्राम पंचायतीवर त्याचा भार टाकून ते सर्व जबाबदार मोकळे झाले आहेत अशीही प्रतिक्रिया सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.
पुढे बोलताना सरपंच मुंडे म्हणाले की फक्त बॅरिकेट लावून आणि निर्जंतुकिकरण ची फवारणी करून जरा हा कोरोना पळून जात असेल आणि बाधित रुग्ण बरे होत असतील व प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता येत असेल तर सरकार कशाला एवढे कष्ट घेत असेल तेच कळत नाही बुवा अशी मिश्किल प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली. एकीकडे सरकार म्हणत अँटीजन , आर टी पी सी आर टेस्टिंग मोफत चालू आहे त्या करून घ्या , मोफत लसीकरण चालू आहे ते करून घ्या तर मग हे फक्त बॅरिकेट आणि निर्जंतुकिकरण फवारणीच करून काय उपयोग.
आजघडीला मुंडेवाडी या छोट्याशा गावात १९ कोरोना बाधित रुग्ण असून त्यात १२ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे . हे सगळे रुग्ण गावातच आहेत , जसेही आमचे गाव कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले तेंव्हापासून आजपर्यंत कोणीही साधी भेट द्यायला आले किंवा कोणत्या सुविधा , तपासण्या अद्याप केल्या गेल्या नाहीत. आरोग्याच्या सोयीसुविधा जर वेळेवर मिळत नसतील तर काय उपयोग आणि आम्ही मानस वाचवावी तर कशी अशी भावनिक साद घालत किमान गावातील नागरिकांची अँटीजन तपासणी करणे , आजारी असणाऱ्या लोकांना गोळ्या , औषधी पुरवठा करणे , गावात जनजागृती करणे या अशा बाबी तर संबंधित प्रशासनाने , अधिकारी , कर्मचारी यांनी करायला हवे होते परंतु तेसेही काही करण्यात आले नाही त्यामुळे आम्ही आता हतबल झालो असून प्रशासन फक्त आकडेवारी मोजतेय पण सुविधा कसल्याच पुरवत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही यावर ठाम आहोत.
शेवटी या प्रशासनाच्या भोंगळ कारभार व दुर्लक्षितपणा यावर अवलंबून न राहता आता आपणच आपले सुरक्षा रक्षक झाल्याशिवाय पर्याय नाही म्हणून गावात ग्राम पंचायत व गावकऱ्यांच्या सहकार्याने काही ठिकाणी बॅरिकेट लावले असून दोन वेळा निर्जंतुकीकरण ची फवारणी पण केली असल्याचे सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी सांगितले. हे सर्व सांगताना प्रशासनाप्रति व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रति नाराजी व रोष व्यक्त करत आशा प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षितपणामुळेच कोरोना ला आपण हद्दपार करू शकलो नाही आणि रोखू ही शकलो नाही यात दुमत नसल्याचे त्यांनी शेवटी बोलून दाखवले .