संपादकीय..
चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने वांद्र्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येमागील गूढ कायम असले तरी त्याचे कवित्व काही संपायला अजून तयार नाही. त्याच्या आत्महत्येने सारा देश हळहळला होता. अभिनेत्री कंगना राणावत हिने चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर आरोप करीत नैराश्याच्या गर्तेत जाऊन सुशांतने आत्महत्या केली म्हणजेच इथल्या घराणेशाहीने त्याची हत्याच केली आहे असे तिचे म्हणणे होते. यात करन जोहर, शाहरुख खान, सलमान खान यांच्याकडे संशयाने पाहिले गेले. या वादात काही बाॅलिवूड कलाकारांनी उडी घेतली होती परंतु या वादाला आता वेगळेच वळण लागले असून सीबीआयच्या तपासात रिया चक्रवर्ती नामक अभिनेत्रीचे नाव पुढे आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रस्थानी आहे. सीबीआयच्या या तपासणी दरम्यान रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली गेली. यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आता रियाच्या कॉल डिटेल्सवर बरेच प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रीण होती. सुशांतच्या वडिलांनी त्याची आत्महत्येस कुणीना कुणी कारणीभूत असून सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप सुशांतचे वडील के के सिंह यांनी केला असून तिच्या विरोधात पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्याआधारे ‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा नोंदवून अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) रियाची आठ तास चौकशी करण्यात आली होती. यावर सुशांतसिंह राजपूत याच्या कार्डांवरून परस्पर मोठ्या रकमा काढून खर्च केल्याचे आरोप झालेली त्याची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांतने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले एक आभाराचे टिपण व एक पाण्याची बाटली एवढ्या त्याच्या केवळ दोनच वस्तू आपल्याकडे असल्याचे म्हटले होते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दोन सनदी लेखापालांंच्या (सीए) बँक खात्यात गेल्या वर्षभरात दोन कोटी ६३ लाख रुपये जमा करण्यात आले. सुशांतच्या बहिणीच्या नावे फिक्स्ड डिपॉझिट असलेली रक्कम मोडून ही रक्कम तिकडे हस्तांतरित केल्याचा दावा सुशांतच्या कुटुंबीयांनी केल्याचे समजते. ईडीकडून याची शहानिशा करण्यात येत आहे. सुशांतच्या कुटुंबाच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतच्या दोन सीएच्या खात्यांवर मे २०१९ ते एप्रिल २०२० या कालावधीत तब्बल २ कोटी ६३ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. सुशांतच्या बहिणीच्या नावे कायमस्वरूपी ठेव म्हणून साडेचार कोटी ठेवले होते. मात्र रियाच्या सांगण्यावरून ही रक्कम मोडल्याचा त्याच्या कुटुंबाचा दावा आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) संबधिताचे बँकेचे व्यवहार तपासून शहानिशा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडीने मनी लॉन्ड्रींगअंतर्गत सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शोविक यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. ईडीपुढे हजर राहत चौकशीच्या सत्रांना सामोऱ्या जाणाऱ्या रियानं आता या सर्व प्रकरणाबाबत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अनेकांच्या म्हणण्यानुसार हा रियाचा पलटवार आहे. चुकीच्या पद्धतीनं मीडिया ट्रायल सुरु असून, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आपल्याला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात येत आहे, असं म्हणत तिच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांतप्रमाणंच मागील ३० दिवसांमध्ये अभिनेता आशुतोष भाकरे, समीर शर्मा यांनीही आत्महत्या केली. पण, यांबाबत माध्यमांनी फारशी तसदी घेतलेली दिसत नाही. बिहारमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळणही प्राप्त झालं आहे. याच आधारे काही महत्त्वाचे मुद्दे मांडत रियानं दाखल केलेल्या याचिकेमध्ये 2 जी आणि तलवार प्रकरणांचा संदर्भ देत यामध्ये जशी मीडिया ट्रायल करण्यात आली आणि पुढं जाऊन आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं हा सारा असाच प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहे ही रिया चक्रवर्ती?
हरियाणाच्या अंबाला येथील रहिवासी असलेल्या रियाने एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘टीन दिवा’च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात पाऊल ठेवले. त्यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. रियाने व्हीजे असताना ‘एमटीव्ही वास्सअप’, ‘कॉलेज बीट’ आणि ‘एमटीव्ही गॉन इन 60 सेकंड्स’ होस्ट केले. यात काळात तिला अभिनेत्री व्हावे असे वाटू लागले. खरं तर तेव्हा ती अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. पण तिला अभियंता होण्यात काही रस नव्हता म्हणून तिने अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयाकडे वळली. अभिनेत्री होण्यासाठी रियाने खूप मेहनत घेतली. यशराज फिल्म्सच्या 2010 मध्ये आलेल्या ‘बॅंड बाजा बारात’साठी रियाने ऑडिशन दिले होते. पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते. पुढे या चित्रपटात अनुष्का शर्माला रोल मिळाला आणि तिच्या करियरने सुसाट दिशा घेतली. रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मध्ये आलेली तेलगू फिल्म ‘तुनेगा तुनेगा’ च्या माध्यमातून मिळाला होता.
या चित्रपटात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यानंतर 2013 मध्ये लवकरच रियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. तिला ‘मेरे डॅडकी मारुती’ या चित्रपटामध्ये जसलीनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. 2014 मध्ये रियाचा आलेला तिसरा चित्रपट ‘सोनाली केबल’ हा देखील सुपरफ्लॉप ठरला. याचा परिणाम असा झाला की, तिला तीन वर्षे घरात बसून राहावे लागले. 2017 मध्ये तिला ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘दोबारा: सी योर ईविल’ सारख्या चित्रपटांतून पुनरागमन केले. मात्र हे चित्रपटही फ्लॉप ठरले. यानंतर 2017 मध्ये आलेल्या ‘बँक चोर’ आणि 2018 मध्ये आलेल्या ‘जलेबी’ मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामध्येही तिला फारसे यश लाभले नाही. यानंतर रिया कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही. रियाने आजवर एकूण आठ चित्रपटांमध्ये काम केले. तरीदेखील तिचे फिल्मी करिअर यशस्वी होऊ शकले नाही. रिया आणि सुशांतसोबत ‘रुमी जाफरी’ एक चित्रपट बनवण्याचे प्लानिंग करत होते. या चित्रपटाचे शूटिंग याच वर्षी मे महिन्यात सुरु होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे असे होऊ शकले नाही.
आता सुशांत गेल्यानंतर हा चित्रपट कधीच बनू शकणार नाही. 28 वर्षांच्या रियाच्या गेल्या दोन वर्षांच्या इन्कमटॅक्स रिटर्नवर नजर टाकली तर तिचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपासच आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. ही प्रॉपर्टी रियाने कशी बनवली या प्रकरणी ईडी तपास करत आहे. ही सर्व माहिती अधिकृत स्त्रोंताकडून मिळाली आहे. या प्रकरणी रियावर सुशांतच्या 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे. रियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शौविक आहे. या चौघांवर सुशांतच्या कुटुंबाने आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड