वृद्ध दांपत्यासह १७ जणांची कोरोनावर मात ; सुखरूप घरवापसी.,..फुलवळ गाव कोरोनामुक्त


कंधारः- (विश्वांभर बसवंते) 

     तालुक्यातील फुलवळ येथे एकूण १८ व्यक्ती कोरोना बाधित निघाल्या. त्यात एका ६४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर बाकी १७ व्यक्तींना कंधार, लोहा व नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या सर्वांनीच कोरोनावर यशस्वीपणे मात करुन डिस्चार्ज मिळवून सुखरूप घरी परतल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

    दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून वाडी-तांड्यापर्यंत या संसर्गाने पाय पसरले आहेत. कंधार तालुक्यातील फुलवळ येथे दि.१४ जुलै २०२० रोजी कोरोना संसर्गाने शिरकाव केला होता. त्यात एक ६४ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवाने १६ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरून गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्या कोरोना बाधित मयताच्या संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य विभागाच्यावतीने शोध सुरू झाला. त्यामुळे गाव भयभीत झाले होते.   

   फुलवळमध्ये कोरोना संसर्गाची साखळी वाढत जाऊन तब्बल १८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यामुळे बाहेरगावचा व्यक्ती गावात येणे व गावातील व्यक्ती बाहेर जाणे बंद झाले. गजबजलेल्या गावातील सर्व रस्ते मुके होऊन गावात शुकशुकाट पसरल्याचे भासू लागले. कोरोना विषाणू संसर्गाशी दोन हात करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून फुलवळ पत्रकार संघटना रस्त्यावर उतरली.   

   या पत्रकारांना साथ देत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, नवयुवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने गावातच श्री बसवेश्वर विद्यालयात कोरोना संशयित व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले. या कामी प्रभारी तहसिलदार एस.व्ही.ताटेवाड, कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद फिसके, फुलवळ उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा हात्ते, अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी अल्पावधितच तोडता आली. सर्वच्या सर्व १७ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन गावात सुखरूप परतली. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून गाव कोरोनामुक्त झाल्याचे ऐकावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *