कोरोणा काळातील निवडणुका: सत्तेसाठी जीवघेणा खेळ

गेल्या वर्षभरापासून ते आजपावेतो कोरोना महामारीच्या संकटानं जगभर थैमान घातलेलं असतांना गेल्या काही महिन्यांपासून आपल्यावर ज्या घटनांचे साक्षीदार होण्याची वेळ आलेली आहे त्या घडामोडी पाहता महात्मा गांधींच्या मुखातून बाहेर पडलेले “हे राम!” आपल्याही तोंडून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. एकतर कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात प्रचंड सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि मानसिक उलथापालथी होत आहेत. आधीच अनिश्चित होत चाललेल्या आधुनिक जीवनात अनाकलनीय अशी अस्थिरता निर्माण झाली आहे, क्षणात होत्याचं नव्हतं होत चाललं आहे. प्रत्येक पातळीवर जो तो आपापल्या परीनं परिस्थितीचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण कळीचा मुद्दा हा आहे की आपण सर्वच पातळ्यांवर आपल्या अविवेकी वागण्यानं आणि बेताल बडबडीनं आपल्या समस्यांमध्ये कायम भर घालत चाललो आहोत. या रौद्ररूप समस्या पाहता निसर्ग किती प्रचंड कोपला आहे याचीच प्रचिती येत आहे.

कोरोना सोबत मध्येच अवकाळी पाऊस, छोटी मोठी वादळं, भूकंपाचे धक्के इत्यादी हातमिळवणी करून आपला डाव साधत आहेत. या संपूर्ण घडामोडी पाहता असं वाटतं की ईश्वराला अवतार धारण करण्याची आज कमालीची निकड आहे, कारण माणूस पुरता हतबल झाला आहे. माणसाला माणसाचा आणि कुठल्याही वस्तूचा स्पर्शच वर्ज्य! वर घरात कोंडून राहण्याची सक्ती! कुटुंबासाठी वेळ मिळाला ही त्यातली एक जमेची बाजू, पण घरून कार्यालयीन काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये अख्ख्या घराचेच जणू कार्यालय झाले आणि आमच्यासारखी काम करणारी माणसे घरी दारी कुठेही आपले कामच घेऊन मिरवू लागल्यामुळे घरचे मात्र काही वेळेला जाम वैतागतात! हा झाला थोडासा सहज समजावा असा भाग, मात्र या सर्वांच्या ही पलीकडे जाऊन कोरोनाच्या महामारीला हाताळताना कोरोना या प्रलयंकारी विषाणूपेक्षाही अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या अनेक विकृती आज भूछत्रं उगवावी तशा जोमानं वाढताना दिसतात. प्राप्त परिस्थितीत ज्यावेळी राजकारण, धर्मकारण, समाजकारण, समाजमाध्यमं, आरोग्यसेवा, न्यायदान इत्यादी वेगवेगळया क्षेत्रांमधे सौहार्द लयाला जाताना आणि अंदाधुंद अशा स्वार्थी व्यावसायिक वृत्ती जोमानं फोफावलेल्या सर्वत्र पाहायला मिळतात. कोरोना या विषाणूचे आणि कोवीड 19 या आजाराचे जेव्हा जगात वर्ष सव्वा वर्षापूर्वी आगमन झाले, त्यावेळी चित्र जरासं आशादायक तरी होतं, उलटपक्षी, आता संपूर्ण समाजात कमालीचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


आपल्याकडे, अगदी छोट्यात छोट्या ते मोठ्यात मोठ्या समस्येपर्यंत सर्वत्र राजकारण बेमालूमपणे प्रवेश करताना आढळतं. अशा अगाध राजकारणाबद्दल आपण दीन पामरांनी काय बोलावं? महाभयंकर अशा कोवीड उत्कर्षाच्या काळात आपण ग्रामपंचायती पासून ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका अगदी बिनदिक्कतपणे आणि साग्रसंगीत अशा धुमधडाक्यात पार पाडल्या! एकीकडं अवाढव्य लोकसंख्येचा शाप, किड्यामुंगीप्रमाणं माणसं होत्याचं नव्हतं होत आहेत, तरीही आपले राजकारणी मती कुंठल्याप्रमाणं निवडणूकांमध्ये रमले आहेत. अगदी सर्व प्रकारच्या निवडणूका निश्चितच लांबवता आल्या असत्या, निदान काही काळापुरतं तरी लांबवता आल्याच असत्या, पण आईवडिलांच्या शब्दाखातर सत्तेचा सोपान धुडकावून लावलेल्या प्रभू रामचंद्राचा वारसा सांगणार्‍या या भूमीत सत्तेची आसक्ती एवढी अगाध आहे की ज्यांच्या गोवऱ्या सरणावर गेल्या आहेत असे सत्तालोलुप गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तेचा उपभोग घ्यायला एका पायावर तयार बसले आहेत. अशा लोकांनी निवडणूकीला विरोध करण्याच कारणच काय? गेल्या काही महिन्यांपासून आत्तापर्यंत ज्या निवडणूका पार पडल्या त्यादरम्यान प्रचंड धुरळा उडवणाऱ्या नेहमीच्याच पद्धतीने प्रचार सभांची मांदियाळी झाली. अगदी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते मंत्री, पुढारी, कार्यकर्ते या सर्वानीच कमालीची समर्पण भावना दाखवली! कोवीडच्या महाभयानक अशा दुसर्‍या लाटेवर आरूढ होऊन सत्तेसाठी दाही दिशा असे आपले वारू बेफाम उधळले.

निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या देशातील वेगवेगळे वर्ग अशा काही अविर्भावात होते की जणू त्यांची आणि कोरोनाची दूर दूर पर्यंत ओळखच नाही. उलट इतरांना त्यांचा प्रतिप्रश्न की कोण हा कोरोना? अत्यंत बेजबाबदार वर्तणुकीतून या लोकांनी संपूर्ण देशवासियांना प्रचंड भयप्रद परिस्थितीत लोटलं, वेठीस धरलं आणि धूर्तपणे स्वतःचा डाव साधून घेतला. यामध्ये देशाच्या सर्वोच्च पदावरील ते सर्वात कनिष्ठ नेत्यापर्यंत सर्वजण होते, सर्वजण एकमेकांची री ओढत सत्ता हस्तगत करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिले. निवडणुकीच्या या रणधुमाळीत कोवीडचा किती जोमाने प्रसार झाला याची अधिकृत आकडेवारी आपल्याकडे कुणीही सांगू शकणार नाही कारण ती कल्पनातीत आणि आवाक्याबाहेर आहे. काही अपवाद वगळता आपली बहुतांश समाजमाध्यमं आज कुणाचीतरी बटीक बनून अथवा बिनबुडाची कमंडलु बनून अतिशय बेफाम आणि अतिरंजित बातम्या आणि अहवाल प्रसिद्ध करण्यात गुंग आहेत, त्याचा परिणाम म्हणजे भेदरलेला समाज! उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची रीत अंगात भिनलेल्या या समाजमाध्यमांनी कसलाही द्राविडी प्राणायाम न करता निवडणूक वृत्तांकना सोबत संपूर्ण साथ संगत केली आणि जिथं निवडणुका होतात तिथं कोरोनाच जणू काही नामोनिशाण पहायला मिळत नाही अशा अविर्भावात काम केलं. साग्रसंगीत, ढोलताशांच्या दिमाखदार साथसंगतीत, उरात धडकी भरवणाऱ्या प्रचंड गर्दीत आपल्या अनेक छोट्या मोठ्या आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या गेल्या. यादरम्यान ज्यानं त्यानं ज्याची त्याची पोळी भाजून घेतली, कारण आपल्या देशातल्या वैचारिक दारिद्रय़ आणि आर्थिक दारिद्र्य यांनी खितपत असलेल्या भोळ्याभाबड्या जनतेला केवळ नाममात्र अशा नोटांच्या खेळाच्या जोरावर विकत घेता येतं हा पाढा “दुरितांचे तिमीर जाओ” असं आळवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना साक्षी ठेऊन या भूमीत सरसकट अवलंबिला जातो, तुम्ही – आम्ही उच्च शिक्षित मूक साक्षीदार!! माहीत सर्वांना आहे, पण बोलण्याचं धारिष्ट्य कुणी करावं, मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधावी, हा प्रश्नच आपला सुटत नाही. बरं, आपल्या कुठल्याही समस्यांचं काहीच केल्या जाऊ शकत नाही हा भाव आपणच निर्माण केला, आपणच पोसला आणि आपणच सर्वांपर्यंत पोहोचता करतो, सर्व “एकाच माळेचे मणी”. या मातीतील सर्व सामान्य जनता जर अशीच झोपेचं सोंग घेऊन याची त्याची भलावण करत राहिली तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाहून जाणं फार सोपं होऊन जाईल हे आपण ध्यानात घेऊन इथून पुढं वागलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे हाल, आणि राजकारण मालामाल! हे सांगताना कुठल्याही तत्त्ववेत्याची गरज भासणार नाही.

निवडणूक प्रचारसभा आणि वृत्तांत पाहताना उरात धसकन होत होतं, जणू काही आपण साक्षात मृत्यूशी हातमिळवणी केल्याचा भास होता तो! कोरोनाला आपण एवढं जवळ केलंय हे पाहूनच मन सुन्न झालं आहे. कोरोना नामक प्रसाद आपल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये गुलाल आणि इतर रंगांसोबत मुक्तपणे उधळला जात होता. अज्ञानात आनंद मानणारे या भारतमातेचे भावी शिलेदार पाहून निस्तब्ध व्हायला होतं. जनतेचा जीव ज्यांच्यासाठी कवडीमोल आहे अशा सत्तांध लोकांसाठी लोकांच आयुष्य पणाला लावलेलं पाहून संत महात्मे आठवत राहतात ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली…. प्राणपणाने आरोग्य सेवेत काम करणार्‍या शिलेदारांच्या करुण कहाण्या हृदयाचा ठाव घेत आहेत, त्यांची अगतिकता आणि साक्षात मृत्यूस आव्हान देऊन खंबीरपणे उभं राहण्याची वृत्ती यांची या व्यवस्थेनं दाणादाण उडविली, आरोग्यसेवा कोलमडली आणि आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला, अराजक यापेक्षा काही वेगळं असू शकतं का? प्रचंड संख्येनं लोक एकत्र येतात तेव्हा कोरोना प्रतिबंधक कोणत्या नियमांचं काटेकोर पालन होऊ शकतं, पोलीस यंत्रणांवर पराकोटीचा ताण येतो अशा वातावरणात, कारण इथल्या नागरिकांना कायद्यांच उल्लंघन करून पोलीस यंत्रणेला वेठीस धरण्यात आनंद मिळतो, मग पोलीस यंत्रणा ढिली पडली नाही तरच नवल. आपल्या सध्य परिस्थितीच गमक आपल्या वागण्यातून पुरतं प्रतिबिंबित होतांना दिसतं. निवडणुका संपल्या, यथावकाश निकाल घोषित झाले आणि आमचे सर्व पट्टीचे शिलेदार पुनश्च एकवार विजयोन्माद साजरा करण्यासाठी कोरोनाचं मनोभावे स्मरण करून रस्त्यावर उतरून नाचगाणी करताना दिसले. या निवडणुक विजयोत्सवाचं समाजमाध्यमांतून झालेलं डोळे विस्फारून टाकणारं चित्रण पाहता असं वाटत होतं की कोरोना नावाचं अक्राळविक्राळ संकट कधीकाळी माझ्या देशाच्या मातीला स्पर्शून सुद्धा गेलेलं नाही! निवडणूकीच्या विजयी मिरवणूका पाहताना मनास प्रचंड वेदना झाल्या. महामारीच्या आणि टाळेबंदीच्या नियमांचं हे संपूर्णतया उल्लंघन होतं. कोरोना आणि आपलं राजकारण यांचा नेमच नाही, काय बेमालूमपणे निवडणुकीत दोघांची युती झाली होती, या युतीला उपमाच नाही!!


नाक आणि तोंड सोडून कुठेतरी अस्ताव्यस्त लटकणार्‍या त्या मास्कमुळे चेहर्‍याच्या विद्रूपीकरणात तर भर पडलीच पण सारं काही इतकं अनियंत्रित होतं गेलं की अराजकता आणि हतबलता यांचा संगम झाला. प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणं परवडणारं नाहीच, असं होतं असेल तर ही क्रांतीच्या वणव्याची ठिणगी सुद्धा असू शकते, उठा, जागे व्हा आणि काळजी घ्या. भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतात हे विसरू नका.

डॉ संगीता जी आवचार,
उपप्राचार्य,
कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय,
परभणी, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *