फुलवळ ; (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि. प. गटाचे जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असलेले सर्वगुण संपन्न , सदन आणि सुशिक्षित , जास्तीत जास्त शासकीय नोकर वर्ग असलेले मोठे गाव . राजकारणाच्या बाबतीत तर तालुक्यात मुर्रब्बी म्हणून परिचित असलेलं गाव , याच गावावरून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य मार्ग जात असल्याने फुलवळ गावाचा नक्कीच कायापालट होणार या आनंदात असलेल्या गावकऱ्यांना गावांतर्गत समस्यानेच गांजून टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गावावरून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने गावकऱ्यात मोठया प्रमाणात आनंदी वातावरण असून अनेकांना आता आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सुखासमाधानाने दिवस आपल्या जीवनात येतील अशी अपेक्षा आहे. परंतु गावातील अंतर्गत मुख्य रस्ते व गल्ली बोळातील रस्ते मात्र चिखलमय , खड्डेमय आणि दुर्गंधीयुक्त झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसून रस्त्याच्या बाजूने असलेल्या नाल्या , गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पुन्हा रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
गावातील अंतर्गत अडीअडचणी चा विचार करता सध्याची परिस्थिती म्हणजे गावाला वालीच नसल्यागत झाल्याने आणि ग्रामपंचायत च्या पळवाटी धोरणाने गावकऱ्यांनी आपल्या समस्या नेमक्या कोणापुढे मांडाव्यात हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
येणाऱ्या काळात काही महिण्यावर या ग्रामपंचायतसाठी निवडणूक प्रक्रिया लागणार असल्याने तसे इच्छुक भरपूर आहेत. शोशल मीडियावरून अनेक भावी नेते गावातील वेगवेगळ्या विकासात्मक बाबीचा अजेंडा घेऊन आपापल्या वैचारिक पातळी प्रमाणे राजकारण करू पाहत असुन येणाऱ्या काळात आपण गावात विकासाची गंगा आणू असा विश्वास देत सध्याच्या कार्यरत ग्रामपंचायत च्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
परंतु जाणकार असलेल्या लोकांना मात्र येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा सध्याच्या गावातील अडीअडचणी कोण आणि कश्या सोडवेल याचीच चिंता लागली असून ज्या मूलभूत गरजा आहेत त्यात रस्ते , पाणी आणि वीज या तीन गोष्टी जर व्यवस्थित आणि नियमित प्रमाणे मिळाल्या पाहिजेत यासाठी दररोज झगडावे लागत आहे.