नांदेड – बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. पक्ष्यांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे.झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागलात. ते नवी घरटी बांधण्याच्या कामालाही लागतात. शहरातील तरोडा शिवरोड नजिकच्या सप्तगिरी काॅलनीमधील लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील जोपासलेल्या झाडांवर आता अनेक पक्षांचा वावर वाढला असून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इथल्या अनेक झाडांवर पक्षांनी आपले बस्तान बसवले असल्याचे पहावयास मिळत आहे.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्ष्यांचा मृत्यूदरही वाढतच असतो. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड, तसेच वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे. एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याश्या पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी अलीकडे गायबच झाली आहे. निसर्गसाखळीत प्राणी-पक्ष्यांचं असलेलं महत्त्व ओळखून त्यांचे संगोपन गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे व झाडांचे संगोपन केल्यामुळे इथल्या झाडांवर चिमणीसह लाल बुडाचा पक्षी, कबुतर, कोकीळ, जांभळा सूर्यपक्षी, तांबट, शिंपी, लालबुड्या बुलबुल आदी पक्ष्यांचा राबता वाढला आहे.
सप्तगिरी काॅलनीतील काही चिमुकल्यांनी आपल्या परसातील झाडांवर छोट्या छोट्या द्रोणांमध्ये पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उन्हाळयात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहेत. सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. अशावेळी सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन दिले जाते. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी काॅलनीतील युवराज ढवळे, तन्मय कांबळे, अभिजित जाधव, अनिकेत खिल्लारे, तनिश सूर्यवंशी, असित गायकवाड, अनुष्का जोशी, पायल भावे, जयंती ढवळे या चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवाट्या तयार करून त्या झाडांना बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या वाटेवरून येता, जाता पक्ष्यांना पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.