नांदेड,दि.17 (प्रतिनिधी)- जगातील संपूर्ण मानवजातीवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. यामुळे मानव जातच अडचणीत सापडली आहे. या अडचणीत सापडलेल्या मानव जातीवरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे असे साकडे श्री केदारनाथांकडे जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी घातले आहे.
उत्तराखंड राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असलेल्या श्री केदारनाथ मंदिराचे शीतकालानंतरचे कपाट श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आज दि. 17 रोजी सकाळी 5 वाजता विधिवत पूजा करुन उघडण्यात आले. त्यानंतर नव्यानेच बनविण्यात आलेला स्वर्णमुकुट श्री केदार जगद्गुरु यांनी श्री केदारनाथ यांच्या मूर्तीवर अर्पित केला. त्यानंतर जनकल्याणाचा संदेश देताना ते बोलत होते.
यावेळी आशीर्वचन देताना श्री केदार जगद्गुरु म्हणाले की, उत्तराखंड राज्यातील केदारपीठास अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे. या मंदिरास मोठी परंपरा आहे.उत्तराखंड राज्यावर हीमवृष्टी व अतिवृष्टीसारखी अनेक संकटे आली. परंतु केदारनाथांनी या संकटावर मात करण्याचा मानव जातीला नेहमीच मार्ग दाखवला आहे. चारधामांपैकी एक धाम व 12 ज्यार्तीलिंगापैकी एक ज्योर्तीलिंग असलेल्या श्री केदारनाथांच्या आशीर्वादाने जनकल्याणाचा मार्ग सुकर होत असतो.
कोरोनाच्या महामारीतसुध्दा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार श्री केदारनाथ मंदिराचे कपाट आज उघडण्यात आले. यानंतर श्री केदारनाथांचे दिव्य दर्शन संपूर्ण जगाला झाले आहे. तमाम मानवजातीला कल्याणाचा मार्ग दाखवणारे श्री केदारनाथ कोरोनाच्या या संकटातूनही मानवाला मुक्त करेल असा विश्वास श्री केदार जगद्गुरु यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री बद्रीनाथ- केदारनाथ समितीचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी.सिंग व रुद्र प्रयागचे जिल्हाधिकारी श्री वर्मा यांची उपस्थिती होती. हे मंदिर लौकिक अर्थाने जरी उघडले असले तरी कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतरच भक्तांना शासनाच्या परवानगीने दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री केदार जगद्गुरु यांनी आपल्या आशीर्वचनातून सांगितले.