आज पहाटेच पुण्याच्या रुबी हॉल मध्ये सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आणि साहित्य- संस्कृतीचे गाढे अभ्यासक दत्तात्रय विठ्ठलराव भालेराव साहेबांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त धडकले.
पदव्युत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्या लेकीला भेटायला गेलेले भालेराव साहेब दोन महिन्यांपूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यामुळे उपचारासाठी भरती झाले. तब्येतीत चढ-उतार होत होते. आयसीयू मधून ते बाहेरही आले होते. त्यांना जेवण जात होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सर्व काही व्यवस्थित होईल. साहेब घरी येतील, असे वाटले असतानाच आज ही दुर्दैवी बातमी ऐकावी लागली.
अहमदपूर तालुक्यातील चेरा (वांजरवाडा) हे त्यांचे मूळ गाव. दुष्काळामुळे या परिसरातील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चंद्रपूरच्या झाडी भागात स्थलांतर केले. साहेबांच्या वडिलांनीही जिवती तालुक्यातील केकेझरी येथे शेती कसायला सुरुवात केली. साहेबांचे शिक्षण तिथेच झाले. एमपीएससी उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान झालेले ते जिवती तालुक्यातील मातंग जात समूहातील पहिले अधिकारी.
त्यांची बहुतांश सेवा चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती भागातच झाली. पोलीस निरीक्षक अशी बढती मिळाल्यानंतर ते परभणी जिल्ह्यात आले. पूर्णा, परभणी, सेलू पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. सेलूला असतानाच त्यांची पोलीस उपाधीक्षक या पदावर पदोन्नती झाली आणि ते उदगीरला रुजू झाले. उदगीर परिसरात जनतेचे मन जिंकून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांना यश आले. या परिसरातील लोक आजही त्यांची आठवण काढतात. उदगीरहून त्यांची बदली थेट नागपूरला झाली. आणि तिथूनच दहा-बारा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले.
आपल्या तीन भावांसह साहेब किनवट तालुक्यातील लोणी येथे स्थायिक झाले. मात्र मुलांच्या शिक्षणासाठी ते पुन्हा नांदेड येथे राहायला आले. त्यांनी आपल्या सुनबाईंना पीएच.डी.पर्यंतचे उच्चशिक्षण दिले. दोन तीन महिन्यांपूर्वीच सुनबाईंचा 'व्हायवा' विद्यापीठात झाला होता. साहेबांना शिक्षणाबद्दल, साहित्याबद्दल खूपच ओढा होता. सेवेत असल्यापासूनच त्यांचे वाचन जबरदस्त होते. सेवानिवृत्तीनंतर आत्मकथन लिहिण्याचे त्यांनी मान्यही केले होते. सतत नव्या नव्या पुस्तकांची खरेदी करणे आणि त्यांचे वाचन करणे हाच त्यांना आता छंद जडला होता. पुस्तक वाचल्यानंतर साहेब तासभर त्या पुस्तकावर भरभरून फोनवर बोलत असत.
माझ्या वैयक्तिक जडणघडणीत साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. साहेब सेलूला ठाणे प्रमुख असताना आम्ही काही मित्र त्यांना भेटायला गेलो होतो. आदल्या रात्री त्यांच्यासोबत त्यांनी घरून आणलेला डबा आम्ही खाल्ला. सकाळी मी परभणीला निघून गेलो. गणपत भिसे आणि अशोक उफाडे यांच्यासोबत चर्चा करीत बसलो होतो. एवढ्यात आबासाहेब लोंढे सायकलवरून आमच्याकडे आले. ते घामाघूम झालेले होते. 'आमच्या गावात रात्री आपल्या लोकांना खूप मारहाण झाली', असे त्यांनी सांगताच आम्ही तिघेही त्यांच्या बरोबर सेलूला निघालो.
सार्वजनिक नळावर पाणी भरताना " तुझ्या हंड्याचा आमच्या हंड्याला ' बाट' झाला" म्हणून एका मातंग जात समूहातील दो जीवाच्या बाईला सवर्ण स्त्रि- पुरुषांनी लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळे तिचे अंग काळेनिळे झाले होते. ती कण्हत होती; तरीही पोलीस तिची तक्रार घेत नव्हते. आम्ही ठाणे प्रमुखांकडे गेलो. ते आमचेच साहेब होते.कालच त्यांच्यासोबत आम्ही जेवण केले होते. मात्र तेही गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हते. नळावरचे भांडण आहे ; त्यात कसली ॲट्रॉसिटी ? असे त्यांचे म्हणणे होते. दिवसभर आम्ही बसून असतानाही साहेब ऐकत नव्हते. शेवटी आम्ही परभणीला एस. पी. कडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आम्ही निघालो तेव्हा कुठे साहेबांनी आम्हाला थांबवले. साहेबांपुढे मी त्या बाईला उभे केले आणि " हा तुझा भाऊच आहे. दाखव तुला लागलेलं. " असं म्हटल्यानंतर तिनं पाठ दाखवली. तिचं सर्वांग काळं निळं झालं होतं. बाकीच्या लोकांच्याही अंगावर गावकऱ्यांनी काठ्या मोडल्या होत्या. हे सर्व पाहिल्यानंतर साहेबाचे अंतकरण पाझरले. त्यांना सत्य पटले आणि गुन्हा दाखल झाला.
आमच्या देखत गुन्हेगारांना गाडीत घालून आणले. गुन्हा नोंदीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आम्ही तिथून निघालो. त्यानंतर साहेबांची बदली उदगीरला झाली. मी उदगीरलाच महाविद्यालयात सीएचबीवर काम करत होतो. साहेबांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. सेलूच्या घटनेपासून ते मला "कॉम्रेड" म्हणत होते. माझ्यातला कार्यकर्ता त्यांना आवडला होता.
माझं पुस्तक साहेबांना भेट दिलं. त्यानंतर उदगीर परिसरातील कित्येक कार्यक्रमांना साहेब आम्हाला गाडीत बसवून घेऊन जात.
मला नोकरीच्या वेळी पैसे लागत होते. सर्व काही करूनही काही पैसे कमी पडत होते. साहेबांना ही गोष्ट कळाली. त्यांनी बोलावून घेऊन मला पैसे दिले. जेव्हा पगार होईल, तेव्हा मला परत द्या असे साहेब म्हणाले. पगाराच्या पहिल्या दिवाळीला साहेबांना लोणी येथे जाऊन मी पैसे परत केले. तेव्हा साहेबांनी घरच्या सगळ्यांना माझी ओळख करून दिली. लोणी जवळचे किनवट माझी सासरवाडी. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी सासरवाडीला जाई, तेव्हा आवर्जून साहेबांची भेट घेण्यासाठी लोणीला जात होतो.
फोनवरून साहेबांशी माझा नेहमीच संपर्क असायचा. सूनबाईंच्या व्हायवासाठी साहेबांनी मला नांदेडला आग्रह करुन बोलावले होते.पण नियतीला आमची भेट होऊ द्यायची नव्हती. नोकरीच्या कामामुळे मी जाऊ शकलो नाही, याचे शल्य आता आयुष्यभर वाटत राहील. सूनबाईंनी पीएच.डी. केल्यामुळे साहेबांना खूपच आनंद झाला होता. त्यांची मुलगीही पुण्यात एम.फिल. करते, हे साहेब अभिमानाने सांगायचे.
पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक या सारख्या उच्च पदावर नोकरी करूनही साहेबांच्या मनाला कधी गर्वाने शिवले नाही. आपला पगार हीच आपली कमाई असे त्यांचे धोरण होते. म्हणून ते अत्यंत सन्मानाने पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेचा शासनाने गौरव केला.
पोलीस खात्यात नोकरी करूनही त्यांनी आपले चारित्र्य स्वच्छ राखले. शासनाची इमानदारीने नोकरी केली. आपल्या कर्तव्याच्या काळात गोरगरिबांना न्याय दिला. त्यांच्यामध्ये एक स्वच्छ स्वच्छ, नितळ, निर्मळ मनाचा माणूस होता. साहित्य संस्कृतीचा अभ्यासक होता. लहानपणापासून त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले होते. नोकरीच्या काळातही संघर्ष केला होता. अशा या बहाद्दर वाघाने गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी दिलेली झुंज शेवटी अयशस्वी ठरली आणि नियतीने एक सोन्यासारखा माणूस आपल्यातून ओढून नेला… साहेबांना माझी भावपूर्ण आदरांजली…!
( अंत्यविधी दि. १९ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता लोणी ता. किनवट येथे होणार आहे.)
– डॉ. मारोती कसाब