बुद्धांनी मोक्षाऐवजी मुक्तीचा विचार दिला – डॉ. वंदना महाजन

बुद्ध जयंतीनिमित्त आॅनलाईन व्याख्यानमाला ; आज डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते समारोप

नांदेड – तथागत गौतम बुद्धांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देऊन समाज जीवनातील असमानतेचे बुरूज नष्ट केले. त्याचबरोबर अज्ञान व तत्कालीन दु:खाचा बीमोड करण्याचा मार्ग शिकवला. अखिल मानव जात प्रबुद्ध बनविणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य पाया आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, वर्गव्यवस्था, जातीभेद नाकारते‌. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मानाने जागा दिली. बुद्धाने कर्मकांड, अंधश्रद्धा, मानवी जीवनात विषमता पेरणाऱ्या रुढी, परंपरांना नाकारुन समाजव्यवस्थेची पुनर्रचना केली. बुद्धाने आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला तसेच मोक्षाऐवजी दु:खमुक्तीचा विचार दिला असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी केले. त्या बुद्ध जयंतीनिमित्त अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत बोलत होत्या. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, डॉ. सीमा मेश्राम, अरविंद निकोसे, अमृत बनसोड, संजय मोखडे, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.

तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दि. २२ मे पासून महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आॅनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला सुरू आहे. मुंबई येथून व्याख्यानमालेत ‘बुद्धाचा स्त्रीवाद’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना प्रा. डॉ. वंदना महाजन म्हणाल्या की, स्त्रीही राष्ट्राची म्हणजे भूमीची अधिपती स्वामिनी असल्यामुळे ती भूमातेची प्रतिनिधी मानली गेली आहे. म्हणूनच स्त्रीकडे सम्राज्ञीचा अधिकार आला. बुद्ध धम्मात तथागताच्या उपदेशाने स्त्रिया अर्हतपदाला पोहोचल्या. तथागताने स्त्रियांना दीक्षा दिली, ज्ञानार्जनाचे धडे देत संघात स्थान दिले. तथागताच्या आचार-विचारातून आदर्श जीवनपद्धती स्त्रीजीवनाला पोषक होती. थेरीगाथांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास गौतम बुद्धांच्या स्त्रीविचाराकडे लक्ष वेधले जाते. तथागत गौतम बुद्धांनी व्यावहारिक व तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. स्त्रियांना संघात प्रवेश देण्याची बुद्धांची कृती म्हणूनच स्त्रीस्वातंत्र्याची नांदी ठरली. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वत्रयीमुळे बुद्धाचा धम्म अडीच हजार वर्षांहून अधिक काळ टिकून आहे. बुद्धाने सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसेच केवळ माणसामाणसातील समानता नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही त्याने समानता प्रस्थापित केली आहे, असे डॉ. महाजन म्हणाल्या.

डॉ. महाजन म्हणाल्या की, भिक्खुणी संघामधे सर्व स्तरातील स्त्रियांचा सहभाग ही देखील महत्वाची आणी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. राजघराण्यातील स्त्रियांपासून तर विविध जातीतील किंवा गरीब मध्यमवर्ग श्रीमंत वगैरे असा कोणताही भेदाभेद न करता संघामधे प्रवेश घेता येत असे. स्त्रियांच्या मनातील मुक्तीच्या स्वराला संघामधे पहिल्यांदाच असा सन्मान देण्यात आला हे ऐतिहासिक व क्रांतीकारी गोष्ट आहे. संघामधे स्त्रियांना प्रवेश देणे ही त्या काळाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठी गोष्ट होती. संघनायक तथागत बुध्द यांनी स्त्रीचं माणुस असणं अधोरेखीत केलं.‌ सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था ही राजकीय व्यवस्थेला प्रभावित करते. बुद्धाचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन समतावादी होता. ज्ञानप्रक्रियेमधे स्त्रियांचा सहभाग मुक्तीचे साधन म्हणजे बुद्धाचा संघ. जाती वर्ण धर्म विरहीत संघ हेच बुद्ध धम्माचे समतामुलक लक्षण आहे. संघाची निर्मिती केवळ अध्यात्मिक प्रगती करिता नव्हती तर बहुजन हिताय बहुजन सुखाय हाच संघाचा पाया आहे. संघातील प्रवेश महाप्रजापतीच्या विनंतीला दिलेला नकार हा स्रीपुरुषांतील विषमतेवर अाधारलेला नसुन तो व्यावहारिक कारणावर अाधारलेला अाहे.

भिक्खू भिक्षुणी हे पूर्णवेळ कार्यकर्ते…

पूर्वीच्या काळी भिक्खू संघांमध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जात असे; परंतु स्त्री आणि पुरुष हे समान मानले जात असताना महिलांना भिक्खू संघात प्रवेश मिळायलाच हवा, असा गौतम बुद्ध यांची मावशी महाप्रजापती यांचा आग्रह होता. त्यानुसार राणी तथा वेश्या अशा विविध स्तरातील स्त्रियांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संघात भिक्खू आणि भिक्षूणी हे धम्मप्रसाराचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. आजही अनेक ठिकाणी भिक्खू संघात एक तर भिक्षुणी नसतात किंवा त्या अत्यंत कमी असतात. आजच्या समाजव्यवस्थेत होणाऱ्या सर्वच प्रकारच्या शोषण आणि दमनाविरुद्ध लढा उभारण्यासाठी भिक्खू संघात भिक्षुणींची संख्या वाढली पाहिजे. तरच योग्य पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल असे मत डॉ. वंदना महाजन यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *