बुद्ध जयंतीचे विचारमंथन

माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे. जे लोक आपल्या जीवनाशी विज्ञानाच्या तत्वज्ञानाला पडताळून पाहत नाहीत त्यांना जगण्यातील विज्ञान दिसत नाही.‌ म्हणून एक तर ते अज्ञानी असतात किंवा अज्ञानी असतात म्हणून ते अंधश्रध्दाळू असतात. विज्ञान माणसाच्या जीवनात सौंदर्य निर्माण करते.‌ बुद्धकालीन लेण्या, शिलालेख, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला या वैज्ञानिक मूल्यांच्या आधारावर निर्माण झाल्या आहेत.‌ त्या नैसर्गिक आहेत म्हणजेच सौंदर्यकलांची निर्मिती करणाऱ्या आहेत. वैज्ञानिक मूल्ये ही सौंदर्यशास्राशी निगडित आहेत. त्यामुळे बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू म्हणजे मानवी जगण्याचे सौंदर्यशास्त्रच आहे.

भौतिक आणि मानसिक विज्ञानाचा विचार धम्मामध्ये करण्यात आला आहे. धम्माकडे मनोविज्ञानाचा पर्यायीस्रोत म्हणून पाहिले जाते. आजचे विज्ञान सतत शोध आणि संशोधनाचे आहे. त्याला अंत नाही. सकारात्मक आणि विधायक जीवनपद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा विकास बौद्ध धम्मात अंतर्भूत आहे. जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहेत. धम्म ही या सिद्धांताची पुढची विकसित अवस्था आहे त्यामुळे सिग्मंड फ्राईड, ह्यूम, फेड्रिक नित्से, अल्बर्ट आईन्स्टाईन, आर्किमिडीज, न्यूटन या शास्रज्ञानांनी मांडलेल्या सिद्धांताचा बुद्ध विचारातून अभ्यास केला पाहिजे.

आधुनिक मनोविज्ञाना बरोबरच बुद्ध धम्माची सुद्धा आवश्यकता आहे. धम्म आणि विज्ञान यांनी जगाचे नियमन‌ केले पाहिजे. धम्माशिवाय विज्ञान भयंकर आहे, विध्वंसक आहे. समाजकारण आणि राजकारण या मानवी जीवनाच्या दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत. परंतु राजकारण आणि धम्म, समाजकारण आणि धम्म अशी सांगड घातली पाहिजे. धम्मविज्ञानातून प्रेम मैत्री करूणा निर्माण होते. विज्ञानाच्या पाठीमागे धम्म नसेल तर ते विध्वंसाकडे घेऊन जातं. बुद्ध हे मानवाचे कल्याणमित्र आहेत. राजकीय पक्ष राजकारणाच्या माध्यमातून लोककल्याण साधु इच्छितात. पण या माध्यमातून भौतिक सुखसुविधा निर्माण केल्या जाऊ शकतीलही. पण राजकीय व्यवस्थेच्या मर्यादाही सिद्ध झाल्या आहेत. या संदर्भाने बुद्धलेण्यांचे संरक्षण व संवर्धन हे अतिशय महत्वाचे आहे.

‌ कोरोनाच्या विषाणूची निर्मिती ही मानवनिर्मितच आहे. ती विज्ञानाची सर्वोच्च प्रकारची विध्वंसक निर्मिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविला आहे. कोरोना म्हणजे विध्वंसक विज्ञान आहे.‌ बुद्ध धम्मात बहिर्गामी आणि आंतर्गामी विज्ञानाचा अंतर्भाव असतो. त्यामुळे संशोधक मानवी जीवनाच्या कल्याणासाठी जेव्हा शोध लावतात तेव्हा धम्म कारुण्यमय विज्ञानाची शिकवण देतो. तुम्ही विज्ञानसंशोधनात सर्वोच्च कामगिरी करु शकता पण त्याच्या उपयोगितेसाठी तुमच्याकडे प्रज्ञा असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. नाहीतर कोरोना महामारीच्या माध्यमातून जगावर जिवितहानीचे तसेच आर्थिक संकटाचे महायुद्ध लादले आहे अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी बुद्ध विचारांशिवाय पर्याय नाही.

मानवाला बुद्ध हवा, युद्ध नको आहे ही भूमिका अखिल विश्वाची आहे. जगभरात बुद्ध विचारांचा स्विकार आणि चिंतन सुरू आहे.‌ भारतात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. बुद्धाचा धम्म प्राचीन असला तरी तो अनेकार्थाने तो आधुनिक आहे. कार्यकारणभाव, स्त्री-पुरुष समानता, समग्र मानवी स्वातंत्र्य, बंधुवाद यांचा पुरस्कार करणारा आणि अधिकाधिक विज्ञानवादी व विवेकवादी असणारा धम्म बाबासाहेबांनी स्विकारला. तथागताने रुढी, परंपरा, खुळचट कल्पना, अंधश्रद्धा नाकारल्या आणि बुद्धीवादाचे प्रतिपादन केले. या अनुषंगाने बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या आदर्श मुल्यांचे संविधानच आहे.

बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्यावेळी भ. बुद्धाची मुर्ती मिळणंही दुर्मिळ होतं. दीक्षेकरिता बुद्धाची मूर्ती सुद्धा संग्रहालयातून मागवावी लागली होती. आज मात्र आपण १९५६ ते २०२१ च्या या कालखंडात बघतो की देशभर हजारो बुद्धविहारं , हजारो बुद्धमुर्त्या , पुतळे , शिल्पं इत्यादी निर्माण झाले आहेत. ग्रंथ , पुस्तकं , साहित्य , कलाविष्कार निर्माण झालेले आहेत. हा प्रचंड बदल लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेण्याच्या पूर्वीपासून त्यांच्या विविध व्याख्यानांमधून वेळोवेळी बौद्धधम्माचे प्रतिपादन करत होते. त्यांनी दीक्षेपूर्वी स्थापन केलेल्या महाविद्यालयांची नांवे ‘सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय , परिसराला ‘नागसेन वन’ ही बौद्धधम्म संस्कृतीतील नांव देतात. लेण्यांच्या परिसरात शैक्षणिक संस्था स्थापन करतात. यावरून बौद्धधम्माच्या दिशेने झालेला त्यांचा प्रवास उलगडतो.

बुद्धाच्या प्रकाशदायी विचारांची ऊर्जा अफाट आहे. बुद्धाच्या संदर्भात निर्माण झालेली नालंदा तक्षशिला, विक्रमशिला इत्यादी विद्यापीठं , साकार करण्यात आलेल्या बुद्धलेण्या , ८४ हजार चैत्यस्तूप विहारं , हजारो शिलालेख निर्माण करून त्यांचा इतिहास अक्षय करण्याचा प्रयत्न केल्या गेला, असं दुसऱ्या कुठल्याही दुसऱ्या महापुरूषाविषयी घडलेलं नाही. यावरून बुद्ध आणि धम्म यांचं जगाला कित्ती महत्व वाटलं असेल याची कल्पना करता येईल.

बुद्धाने सांगितलेला प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धांत म्हणजेच कार्यकारणभावाचा सिद्धांत हा अतिशय महत्वपूर्ण आहे. स्त्री-पुरुष समतेचा बुद्धाने त्यावेळेस केलेला पुरस्कार ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक आहे. बुद्धाने धम्माच्या तत्वज्ञानातून नव्या लोकशाहीची मांडणी केली. काल्पनिक थोतांड, कर्मकांडांना नकार दिला. तरीही बौद्ध साहित्यात चुकीची माहिती घुसडून वैचारिक प्रदुषण केले जाते. बुद्धाला चमत्काराच्या स्वरुपात मांडले जाते. विष्णूचा अवतार याबाबत बाबासाहेबांनीच हा खोडसाळ प्रचार असल्याचे सांगितले होते. इथली धम्मद्वेषी व धम्मद्रोही यंत्रणा बुद्ध विचारांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचते. ऐतिहासिक कालखंडात बदल करून संभ्रम निर्माण केला जातो. धम्माला एक संप्रदाय असल्याचे सिद्ध केले जाते. बुद्धाला देवत्व प्राप्त करून त्याचा प्रचार केला जातो. कोणत्याही मार्गाने होत असलेला अपप्रचार थांबवायला हवा.

तथागत गौतम बुद्धांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देऊन समाज जीवनातील असमानतेचे बुरूज नष्ट केले. त्याचबरोबर अज्ञान व तत्कालीन दु:खाचा बीमोड करण्याचा मार्ग शिकवला. अखिल मानव जात प्रबुद्ध बनविणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य पाया आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, वर्गव्यवस्था, जातीभेद नाकारते‌. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मानाने जागा दिली. बुद्धाने कर्मकांड, अंधश्रद्धा, मानवी जीवनात विषमता पेरणाऱ्या रुढी, परंपरांना नाकारुन समाजव्यवस्थेची पुनर्रचना केली. बुद्धाने आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला तसेच मोक्षाऐवजी दु:खमुक्तीचा विचार दिला.

स्त्रीही राष्ट्राची म्हणजे भूमीची अधिपती स्वामिनी असल्यामुळे ती भूमातेची प्रतिनिधी मानली गेली आहे. म्हणूनच स्त्रीकडे सम्राज्ञीचा अधिकार आला. बुद्ध धम्मात तथागताच्या उपदेशाने स्त्रिया अर्हतपदाला पोहोचल्या. तथागताने स्त्रियांना दीक्षा दिली, ज्ञानार्जनाचे धडे देत संघात स्थान दिले. तथागताच्या आचार-विचारातून आदर्श जीवनपद्धती स्त्रीजीवनाला पोषक होती. थेरीगाथांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास गौतम बुद्धांच्या स्त्रीविचाराकडे लक्ष वेधले जाते. तथागत गौतम बुद्धांनी व्यावहारिक व तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. स्त्रियांना संघात प्रवेश देण्याची बुद्धांची कृती म्हणूनच स्त्रीस्वातंत्र्याची नांदी ठरली. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वत्रयीमुळे बुद्धाचा धम्म अडीच हजार वर्षांहून अधिक काळ टिकून आहे. बुद्धाने सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसेच केवळ माणसामाणसातील समानता नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही त्याने समानता प्रस्थापित केली आहे.‌

भिक्खुणी संघामधे सर्व स्तरातील स्त्रियांचा सहभाग ही देखील महत्वाची आणी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. राजघराण्यातील स्त्रियांपासून तर विविध जातीतील किंवा गरीब मध्यमवर्ग श्रीमंत वगैरे असा कोणताही भेदाभेद न करता संघामधे प्रवेश घेता येत असे. स्त्रियांच्या मनातील मुक्तीच्या स्वराला संघामधे पहिल्यांदाच असा सन्मान देण्यात आला हे ऐतिहासिक व क्रांतीकारी गोष्ट आहे. संघामधे स्त्रियांना प्रवेश देणे ही त्या काळाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठी गोष्ट होती. संघनायक तथागत बुध्द यांनी स्त्रीचं माणुस असणं अधोरेखीत केलं.‌ सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था ही राजकीय व्यवस्थेला प्रभावित करते. बुद्धाचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन समतावादी होता. ज्ञानप्रक्रियेमधे स्त्रियांचा सहभाग मुक्तीचे साधन म्हणजे बुद्धाचा संघ. जाती वर्ण धर्म विरहीत संघ हेच बुद्ध धम्माचे समतामुलक लक्षण आहे. संघाची निर्मिती केवळ अध्यात्मिक प्रगती करिता नव्हती तर बहुजन हिताय बहुजन सुखाय हाच संघाचा पाया आहे. संघातील प्रवेश महाप्रजापतीच्या विनंतीला दिलेला नकार हा स्रीपुरुषांतील विषमतेवर अाधारलेला नसुन तो व्यावहारिक कारणांवर अाधारलेला आहे.

पूर्वीच्या काळी भिक्खू संघांमध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जात असे; परंतु स्त्री आणि पुरुष हे समान मानले जात असताना महिलांना भिक्खू संघात प्रवेश मिळायलाच हवा, असा गौतम बुद्ध यांची मावशी महाप्रजापती यांचा आग्रह होता. त्यानुसार राणी तथा वेश्या अशा विविध स्तरातील स्त्रियांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संघात भिक्खू आणि भिक्षूणी हे धम्मप्रसाराचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. आजही अनेक ठिकाणी भिक्खू संघात एक तर भिक्षुणी नसतात किंवा त्या अत्यंत कमी असतात. आजच्या समाजव्यवस्थेत होणाऱ्या सर्वच प्रकारच्या शोषण आणि दमनाविरुद्ध लढा उभारण्यासाठी भिक्खू संघात भिक्षुणींची संख्या वाढली पाहिजे. तरच योग्य पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *