कवी शेषराव पिराजी धांडे यांच्या प्रेम कविता — डाॅ.सुनिल भडांगे

समिक्षा……

          वाचक मित्रांनो आज आपण वाशीम जिल्ह्यातील कवी शेषराव धांडे  यांचे” आमचा आलेख कोरच” हे प्रेम कवितेचे पुस्तक आहे.या प्रेम कवितेच्या संग्रहात ,कवीने एकूण 53 कवितांचा समावेश केलेला आहे. या प्रेम कवितेच्या संग्रहाचे प्रकाशक आहेत अविष्कार पब्लिकेशन ,वाशिम.   कवी शेषराव धांडे  यांच्या “आमचा आलेख कोराच” प्रेमाला वाहिलेल्या कविता संग्रहाचे मर्म उलगडून पाहणार आहोत.तसेज या कवितासंग्रहातील एका कवितेचे आपण रसग्रहण  करणार आहोत.

          प्रेम हे तारुण्यातच नव्हे तर कुठल्याही वयात माणसाच्या मनात सहज नैसर्गिक रोपण होणारी भावना आहे मग तो दक्षिण आफ्रिकेतील काळा, गोरा , निळा ,पिवळा ,लाल रंगा चा असो की गरीब असो की श्रीमंत. जात, धर्म, देशाच्या पलीकडे जाणारी भावना आहे . बस आखो ही आखोमें इशारा  होण्याचं गरज असते. प्रेम हे निरागस असते ते दोन मनांच्या मिलनातून प्रसवत असते .गवताचे हिरवी हिरवी कुरणे जसे धरतीच्या कुशीतून वर उगवतात, तसेच प्रेम ही मनाच्या अंतरंगात हिरवळ घेऊन उगवत असते.प्रेम ही भावना जगाच्या पाठीवर कुठेही सेम असते. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात .”प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते”असे म्हटले जाते की ऋषींचे कूळ आणि विचारू नये प्रेमाचे मूळ” असे जरी असले तरी ,कवी ज्या दलित आंबेडकरी समूह मध्ये जन्माला आलेले आहेत, त्या समूहाला माणूस म्हणून पाहिले जात नव्हते,ही एका प्रचंड मोठ्या मानवी समूहाविरुध्द इथल्या विषमतामुलक समाजव्यवस्थेची खल प्रवृत्ती आहे. व्यवस्थेने या  माणसांच्या हातातून प्रेमच काय पण जगण्याचे सर्व अस्त्र हिसकावून घेतले होते.अश्या माणूसपण नाकारले गेलेल्या माणसांच्या प्रेम अनुभूतीच्या शेषराव धांडे यांच्या “आमचा आलेख  कोराच” या पुस्तकातील प्रेम कविता आहेत.

      आज आंबेडकरवादी दलित प्रेम कवींची तिसरी पिढी शिकून-सवरून मानाच्या जागेवर विराजमान झाली आहे.तरी मात्र जुने अनुभव आज ही त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. आजही जात कळल्या बरोबर जात व्यवस्था आदिक जाड होत जाते ,या प्रेमींना आज ही एक होऊ दिले जात नाही. या अनुषंगाने कवी कवितेत म्हणातात” तुझा सातबारा बदलला ,मालकीहक्क   व्यवस्थेने दलालांनी ठरवलेल्या पुरुषाकडे गेला. आणि आमचा आलेख कोराच “राहिला मनातली सल,दुःख, वेदना अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने कवीने सदर कविता संग्रहातून मांडली आहे.

             कवी शेषराव धांडे यांची प्रेमी कविता नव्या पिढीचे जागतिकीकरणाच्या बदलते टापांचे शब्द घुमणारी ही कविता आहे.नव  शिक्षणाने झालेले बदल येथोचितपणे कवीने टिपले आहेत.म्हणूनच या कविता संग्रहात ऐका मानवी समूहाची दाखवलेली दशा आणि दिशा इथल्या पोथीनिष्ठ , सडक्या मानसिक पंगूत्वाची झूल पांघरलेल्या समाजव्यवस्थेवर कवींनी सजगतेने ओढलेले कोरडे आहेत.       

              “आमचा आलेख कोराच”हा चिंतनशील कवींच्या प्रेम कवितेचा हा काव्यसंग्रह आहे. शेषराव धांडे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कवी आहेत.

         कवी शेषराव धांडे यांची प्रेम कवितेला स्वतःच्या एक लय सापडली आहे.त्यांच्या सभोवताली घडणार्‍या अनुभवावर आपली नवी दृष्टी ,नवे शब्द घेऊन उरात जळत असणाऱ्या जखम अशा लोकशब्दातून उपरोधकपणे अर्थाची अनेक वलये निर्माणकरीत वाचकाला विचारप्रवृत्तकरण्यास त्यांची कविता भाग पडते.

            या बदलत्या जागतिककरण्याच्या  प्रक्रियेत भारतीय माणसाने  विज्ञानाची अनेक अनेक क्षेत्र पादक्रांत केलेले आहेत.आकाशात आम्ही उंच भरारी मारायला शिकलो आहोत.तसेच माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलो आहोत.असे जरी असले तरी इथली बेमुर्वत व्यवस्था आजही कवींच्या समूहाकडे वेगळ्या नजरेने पाहते.वैचारिकतेच्याआणि पुरोगामित्वाच्या आम्ही कितीही गप्पा हाणल्या तरी त्या केवळ खोट्या आणि दिखाऊ  आहेत. बदल्यात फक्त मानसिक  मानहानी करणाऱ्या युक्त्या-प्रयुक्त्या.कृतीचे संदर्भ .बाकी आजही आहे ते जुनेच आहे.जागोजागी शब्दछल,विसंगतीचे दर्शन.

             कवी शेषराव धांडे यांची कविता माणूसपणाच्या हक्कांसाठी करावा लागणारा अनवरत संघर्ष याचे सच्चे पण आवेशपूर्ण शब्दांकण या कविता संग्रहातून विशेषत्वाने मांडते.ज्या समाजाच्या तरुणांच्या वाट्याला आजही तो विशिष्ट समूहाचा म्हणून त्याला नाकारला जात असेल, केवळ जात म्हणून त्याचा प्रेमभंग होत असेल तर त्याचा भावेद्रेक गोफणगुंड्या सारख्या रीतीने कवी मांडताच राहणार, कवी कोणाच्या अपेक्षा पूर्तीसाठी कविता कधीच करत नाही हे विसरता येणार नाही.

            कवी शेषराव धांडे यांच्या  प्रेम कवितेतील सामाजिक आशयाचा पदर अधिक प्रमाणात प्रतीत होताना दिसतो, उच्चनीचतेच्या उतरंडी ने चावून चोथा झालेल्या वर्गाची व्यथा सामूहिक व व्यक्तिगत पातळीवर कवी शेषराव धांडे यांनी समर्थपणे रेखाटली आहे.

           कवी शेषराव धांडे यांच्या “आमचा आलेख कोराच”  या प्रेम कवितेच्या संग्रहात अनेक गुनाड्य आशा प्रेमकविता आहेत.या प्रेम कवितेचे सामर्थ केवळ त्यातील अत्युग्र सामाजिक रेखाटनात कधीच नव्हते तर मानवी आयुष्यातील सर्व भावोन्मेषकडे आणि विभावअभावकडे सूक्ष्मपणे पाहून त्या कडे लक्ष वेधण्यात असते.

             शेषराव धांडे यांची प्रेम कविता स्वप्नाळू रोमँटिक नाही. कल्पनेच्या फुलपाखरावर बसून चंद्र,सूर्य आणि आकाशात ती भराऱ्या मारणारी नाही. येथील बेमुर्वत व्यवस्थेने दिलेल्या डागण्यांचे वास्तव रूप घेऊन ती अवतरते.हे सर्व अधोरेखित करत असताना कवी शेषराव धांडे कुठे ही शब्दांचा बडेजाव मांडत नाहीत.किंबहुना प्रतिमा आणि प्रतिमांची लयलूटही ते करत नाहीत, ते ज्या भागात वास्तव्य करत आहेत त्या मातीचे रूप घेऊन त्यांची शब्दकळा ,कविता अधिक टोकदार करताना दिसते ,ती अस्सल आहे.तिला आपल्या मातीचा वास आहे.  मनात रुजत असलेल्या प्रेमअंकुराला अत्यंत सहज सुसूनचनात्मकपणे आंतरिक पेटलेली धग घेऊन त्यांची कविता आपल्या काळजाला येऊन भिडते.हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे .

 शेषराव धांडे यांची प्रेमकविता गतानुगतिककाळाचे चालत आलेल्या विषमतेचे विरुद्ध संघर्षाचे बीज रोवते . स्व  व समूहाला येणार्‍या वास्तव  अनुभवाच्याअनुभूतीची दाहकता त्यांच्या कवितेतून अधोरेखित होते.

        शेषराव धांडे यांच्या प्रेम कवितेतील प्रियकर हा त्याच्या प्रेमभंगाला, त्याला नाकारले गेलेल्यापणाला,हिनवलेगेलेल्यापनाला तो आपल्या प्रेयसीला जबाबदार धरत नाही,  तिला इथली विषमतामूलक समाजव्यवस्था जात होऊन आड येते. तिला त्याला स्वीकारण्याची इजाजत देत नाही. तो जबाबदार धरतो तिच्या कुटुंबाला, तिच्या जात समूहाला आणि व्यवस्थेला. तिच्या मनात अजूनही त्याच्याबद्दल प्रेम आहे असे त्याला वाटते परंतु  ही विषमतामूलक व्यवस्था त्याच्या प्रेमाच्या आड येते हा त्याचा या समाज व्यवस्थेवर आरोप आहे.आणि तो खराही आहे. सवर्ण प्रेयसी त्याच्यात गुंतततेही, पण जात तिला पुढे जाऊ देत नाही.या अनुषंगाने  कवी शेषराव धांडे यांची ” वास्तव ” ही कविता पाहण्यासारखे आहे.

      “माझ्याशी हितगूज करताना   

   ती म्हणाली: 

     तू हुशार आहेस,   

   प्रगल्भ आहेस,   

   बुद्धिमान आहेस, 

     तुझं व्यक्तिमत्व छान आहे, 

     सारे काही ठीक आहे रे!       पण,   

   तुझी जन्मजात आडवी येते”

              ही प्रेम भंगाची सल उरात सुई टोचावी आणी हृदयाला आतून जखम व्हावी त्या भाळभणारी जखमेतून रक्त सतत ठिबकत राहावे असे ही जीवघेणी अनुभूती कवि कुठेही अतितीव्र त्वेषाने मांडत नाहीत. अतिशय तरलपणे ते आपल्या मनातील सल एक एक पापुद्रे उलगडावे तसे उलगडत जातात. आणि वेदना अधिक वेदनादायी वाटू लागतात. अशा चिंतनशील कवींचा हा कवितासंग्रह आहे ही वेदना जशी कवींची आहे तशीच ती त्यांच्या समूहाची  वेदनाही आहे.कवींच्या अनेक पिढ्यांना गावकुसाबाहेर सडवले गेले. डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी या माणसांच्या हातात लेखनीचे शस्त्र दिले.आणि हा हा म्हणता हा समूह व्यवस्थेच्या दलदलीतून वर आला आणि आपले वेगळे अस्तितत्वाने त्याने अवघ्या समूहाचे लक्ष वेधून,डोळे दिपवणारी कामगिरी केली. एक संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले.आज पाहतो तर समोरून त्याला सवर्ण प्रेयसी त्याला ऑफर देत आहेत. या बदलत्या नोंदींची नोंद घेणारी शेषराव धांडे यांची ही नवी कविता आहे. कवी शेषराव धांडे हे आपल्या “लेखणीचे इमान “या कवितेत म्हणतात.

” भंगार आयुष्य जगत होतो तू माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतीस रस्त्याने जाता जाता चुकून नजरानजर झाली तर नाकाला रुमाल लावायचीस लेखणीला इमान राखून जीवनाच सोनं झालं अन तू माझ्यावर भाळायला लागली आज माझ्या घामाचा वास ही तुला परफ्युम वाटायला लागला आता तू एक कर प्रथम माणसं वाचायला शिका मग आपल्या प्रेमाचं बघू.”

             कवी शेषराव धांडे हे “लेखणीचे इमान”या कवितेत आपल्या मनातील खंत व्यक्त करताना म्हणतात, जेंव्हा आमच्याकडे काही नव्हते, माणूस म्हणून जगण्याची ही आम्हाला सनद नव्हती. एक भंगार आयुष्य आम्ही जगत होतो.जसा भंगाराचा काही उपयोग होत नाही अडगळीत, बेवारस ,बिनकामाचे म्हणून टाकले जाते .असे हीन आयुष्य आम्ही जगत असताना, कधी प्रियसीने त्याच्याकडे पाहिले नाही.ही सल  हे नवे भान कवी शेषराव धांडे यांच्या कवितेत अधोरेखित झाले आहे. रस्त्याने चालताना चुकून नजरानजर झाली तर आमच्या नजरेलाही तुला विटाळ व्हायचा आणि एक घाण दर्प यावा असे तू नाकाला रुमाल लावायचीस पण बाबासाहेबांनी आमच्या हातात दिलेल्या लेखणीला इमान राखून आम्ही जिद्दीने आज शिकून मोठ झालोय, नव नवे क्षेत्र आज आम्ही पादाक्रांत केली आहेत.मानाच्या आणि सन्मानाच्या जागेवर आज आम्ही आरूढ झालो आहोत.हे आमचं नवरूप पाहून ,आज तू माझ्यावर लूब्ध झाली आहेस ,आता तर माझा घामाचा वास  ही तुला परफ्यूम सारखा वाटू लागला आहे. हा नवा बदल कवींनी  आपल्या कवितेतून अतिशय नेमकेपणाने टिपला आहे.शिक्षणाचे दूध पिलेला हा नवा प्रियकर अधिक सावध झाला आहे.तो आता सहज  आणि बेसावधपणे तिच्या जाळ्यात ओढला जात नाही. त्याला त्याच्या गतजीवनाच्या दशा आणि दिशा ज्ञात आहेत. अर्थात वाघिणीचे दूध प्राशन केलेला हा तरूण प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो आहे ,आता तू एक कर प्रथम माणूस वाचायला शिक ,या शब्दांच्या आडून कवींना हे सुचवायचं आहे की विषमताप्रणित  व्यवस्थेतील जे काय पालखीचे भोई आहेत. त्यांच्यासह तुझी जात व्यवस्था आधी समजून घे. मग माझ्याकडे ये. मग आपण आपल्या प्रेमाचे बघू  अशा सजग सुसूनचनात्मक पातळीवर शेषराव धांडे यांची कविता अभिव्यक्त होत, गतानुगतिककाळापासून  चालत आलेल्या बेबंदशाही विरुद्ध दंड थोपटून ,संघर्षाचे बीज रोवत ,आपल्या प्रेम आविष्काराचे  धगधगते वास्तव उपरोध आणि उपहासात्मकपणे तरलतेने आपली  प्रेम अनुभूती “आमचा आलेख कोराच या कवितासंग्रहातून मांडतात. कवी शेषराव धांडे यांच्या सर्वच कविता वाचकांच्या हृदयाचे ठाव घेतात.

        मी वाचकांना अपील करत आहे की कवी शेषराव धांडे यांच्या “आमचा आलेख कोराच” हा प्रेम कवितेचा, कविता संग्रह आपण नक्कीच वाचाल अशी आहे.

■□आमचा आलेख कोराच…!▪ कवी :शेषराव पिराजी धांडे▪मुखपृष्ठ : श्रीधर अंभोरे▪आविष्कार पब्लिकेशन वाशीम▪मुल्य :₹100        

       डॉ सुनील भडांगे   

       वाडा, पालघर,     

     9421549803

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *