अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास मनुष्यास दुःखापासून मुक्ती मिळते – भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड –  दुःख निरोध वा दुःख निवारण हा बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश आहे.  लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेते त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचरणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यास दुःखापासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


         २५६५ व्या बुद्ध जयंतीनिमित्त अ. भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने पाच दिवसीय राज्यस्तरीय आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन दि. २२ मे ते २६ मे या कालावधीत करण्यात आले होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ झेन मास्टर सुदस्सन यांनी केला तर बुद्ध जयंती दिनी प्रख्यात आंबेडकरी लेखक तथा विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे . व्याख्यानमालेचे चौथे पुष्प भदंत पंय्याबोधी थेरो यांनी ‘बुद्धाचा दुःख निरोध’  या विषयावर गुंफले. ते म्हणाले की, जगात दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे. हे कारण म्हणजे तृष्णा किंवा वासना होय. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय आहे. त्यांनी अंगुलीमाल, राजा प्रसेनजित, पटाचारा, किसा गौतमी यांच्या उदाहरणांनी बुद्धाचा दुःख निरोध समजावून सांगितला . व्याख्यानमालेत झेन मास्टर सुदस्सन, डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो यांनी बुद्धाविषयीचे सखोल चिंतन मांडले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, संजय डोंगरे,छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *