नांदेड – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर ज्यांना तमाम आंबेडकरी जनता रमाई म्हणून संबोधते, या रमाईचं आयुष्य अत्यंत कष्टप्रद आणि हालाखीचं होतं. रमाईनं शेणाच्या गोवऱ्या थापून आपला उदरनिर्वाह चालविला. बाबासाहेब नावाच्या महासूर्याची ती सावली झाली म्हणूनच हा महापुरुष घडला. रमाईचं जीवन म्हणजे इतिहासाचा धगधगता पदर होय असे प्रतिपादन येथील लेखिका रमाईकार डॉ. करुणा जमदाडे यांनी केले. यावेळी साहित्यिक गंगाधर ढवळे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, आम्रपाली खाडे, सुभाष लोखंडे हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड मनपा माजी उपायुक्त प्रकाश येवले हे होते.
प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमामाता आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते धूप, दीप आणि पूष्पपूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.