कोरोनाच्या संकटकाळातही बुद्धाचे विचार मार्गदर्शक ठरतात – गंगाधर ढवळे


नांदेड – तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी  सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. जगात दुःख कायम आहे, हे बुद्धाने सांगितले. त्याच्या निवारण्याचा उपायही सांगितला. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजेच दुःखाचे निरोधन आहे.बुद्धाच्या पायाजवळ मनःशांती लाभते. दुःखावर मात करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळातही बुद्धाचे विचार मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी रोडगी येथे केले. यावेळी भिक्खू संघातील भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुमेध, भंते पट्टीसेन, माताजी शाक्यन ज्योती, सरपंच दगडू काकडे, पोलिस पाटील भुजंगराव काकडे, माजी सरपंच प्रल्हाद काकडे, उपसरपंच दत्तराव काकडे, साहित्यिक गंगाधर ढवळे, शामराव लोणे, भुजंग लोणे, निवृत्ती लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


             तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे महामाया प्रजापती बुद्ध विहाराची स्थापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंते सुदर्शन आणि भंते श्रद्धानंद यांच्या हस्ते झाली. गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप‌ आणि धूपपूजन झाल्यानंतर बुद्ध विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी साहित्यिक ढवळे बोलत होते. ते बोलतांना ढवळे म्हणाले की, वेळ, परिस्थिती बदलली, मात्र गौतम बुद्धाच्या विचारांना आपल्या जीवनात विशेष स्थान आहे.  बुध्द म्हणजे, एक पवित्र विचार असून समर्पणाची भावना आणि जगण्याची आदर्श आचारसंहिता आहे.  कोरोना संकटात प्रत्येक जण लढा देत आहे. या संकटात बुद्धाची शिकवण महत्त्वाची आहे. बुद्धांनी सांगितलेले दया, करुणा, समता, बंधूभाव ही  शिकवण तमाम  मनुष्यप्राण्यांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी भिक्खू संघाची धम्मदेसनाही संपन्न झाली. भंते श्रद्धानंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

       कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधीवत बुद्ध वंदना, त्रीसरण पंचशील, परित्राण पाठ संपन्न‌ झाले. त्यानंतर उपासक उपासिकांकडून भिक्खू संघाला चिवरदान आणि पाच हजार रुपयांचे आर्थिक दान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजंग लोणे यांनी केले.‌ प्रास्ताविक शामराव लोणे यांनी तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. यावेळी दत्ता लोणे, हरी लोणे, हरी कोकरे, शंभुराज सोनाळे, गंगाबाई लोणे, राधाबाई लोणे, जयश्री कोकरे, वंदना कोकरे, अनुसया सोनाळे, राजश्री सोनाळे, शोभा सोनाळे, आशा कोकरे, सुनंदा कोकरे, धोंड्याबाई कोकरे, मनिषा कोकरे, विशाखा कोकरे, ज्योती लोणे, रत्नमाला लोणे, रंजना लोणे, प्रकाश लोणे, शारदा लोणे, शितल लोणे, ममता लोणे, रंजना कोकरे, सोपान कोकरे, सुनिता लोणे, सविता लोणे, सुमन लोणे, अनिता लोणे, छाया लोणे, सयाबाई लोणे, कमलबाई लोणे, विमलबाई लोणे, प्रयागबाई लोणे, शालिनी लोणे, ऋतुजा लोणे, सोनी लोणे, प्रमोद लोणे, गंगाधर कोकरे, विशाल लोणे, राजू कोकरे, राहुल लोणे, चंद्रकांत सोनाळे, साहील कोकरे, अजय लोणे, संदेश लोणे, अक्षय लोणे, शुभम लोणे यांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *