तुर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीचे पीक व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यावी – कृषी अधिकारी रमेश देशमुख यांची  मार्गदर्शक माहीती


कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तूरीचे पीक आंतरपीक म्हणून सोयाबीन, ज्वारी, कापूस इत्यादी पिकात घेतले जाते. गतवर्षी मध्यम ते हलक्‍या जमिनीवरील तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिक फुलोरा अवस्थेत असताना वाळल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
यावर्षी हे नुकसान टाळण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी खालील पंचसूत्रीचा अवलंब करावा.


यावर्षी तुरीचे घरचे बियाणे पेरणीसाठी वापरू नये कारण या बियाण्यावर बुरशीचा प्रादुर्भाव आहे. बियाणे बदल करून विद्यापीठाने संशोधित केलेल्या व मर रोगाला बळी न पडणारे वाण बिडीएन 711 ,बीडीएन 716 ,बीएसएमआर 736 या वाणाचा वापर करावा.
तुरीचे पीक त्याच त्या शेतात पेरु नये ,तूर पिकाची फेरपालट करावी.

तूर पिकावीषयी फोटो


पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक बीजप्रक्रिया करावी बाजारात विटावॅक्स पावर (थायरम +कार्बोक्झीन ) या नावाने उपलब्ध असलेले (संयुक्त बुरशीनाशक व किटकनाशक) घटकाची प्रती किलो ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी, पेरणीच्या दिवशी बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, रायझोबियम,पीएसबी १० मिली प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. जुलैच्या शेवटच्या अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास ट्रायकोडर्मा ४ किलो बायोमिक्स ४ किलो प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. तुरीच्या झाडाच्या खोडाची काळजीपूर्वक पाहणी करावी या खोडावर फायटोप्थोरा ब्लाईट या बुरशीचे राखेरी ठिपके दिसले तर रेडोमिल गोल्ड या घटकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यानंतरच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त झाले तर ह्याचा घटकाची ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात टाकून आळवणी करावी.
तूर पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी यावर्षी वरीलप्रमाणे पंचसूत्रीचा अवलंब करावा.

रमेश देशमुख ,

तालुका कृषी अधिकारी ,

कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *