नांदेड ; प्रतिनिधी
लॉकडाऊन मध्ये आधार गरजूंना आणि लॉयन्सचा डबा या उपक्रमांतर्गत खा.चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,
लॉयन्स सेंट्रल अध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या पुढाकाराने रस्त्यावरील निराधारांना जेवणाचे डबे वितरित करण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून दिलीप ठाकूर व त्यांची टीम करत आहे. यादरम्यान नांदेड शहरात शंभराच्या आसपास माणसांचे अवास्तव केस वाढल्याचे आढळून आले. नागनाथ महादापुरे यांच्या सहकार्याने दिलीप ठाकूर यांनी ” कायापालट ” या उपक्रमाची सुरुवात केली. दिलीप ठाकूर,नागनाथ महादापुरे,अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा,प्रशांत पळसकर,कामाजी सरोदे,रामदास पाटील,कैलाश महाराज वैष्णव यांनी सर्व रस्ते फिरून योग्य व्यक्तीची निवड केली.
यामध्ये व्यवसायाने न्हावी असलेल्या बजरंग वाघमारे यांनी मोलाची भूमिका बजावली. कोरोना संक्रमण लक्षात घेऊन त्यांना पीपीई किट देण्यात आला.मोफत दाढी कटिंग करून देणार असल्याचे सांगून देखील एकानेही कटिंग दाढी करण्यास तयारी दर्शविली नाही.त्यामुळे दिलीप ठाकूर यांनी जो कटिंग दाढी करेल त्याला नवीन कपडे व शंभर रुपये देणार असे सांगितले. क्षणात चित्र पलटुन अनेक जण तयार झाले.रेल्वे स्टेशन,शिवाजी पुतळा,बालाजी मंदिर परिसरातील 21जणांचा पहिल्या दिवशी कायापालट करण्यात आला.पूर्वीचा अवतार आणि नंतरचा झालेला बदल आश्चर्य कारक होता.या सर्वांना पैंट,शर्ट, अंडर पैंट, बनियन,नगदी शंभर रुपये व जेवणाचे डबे देण्यात आले.दोघांची प्रकृती ठीक नसल्याचे आढळून आल्यामुळे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.संतोष शिर्शीकर यांच्या सहकार्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.यापुढे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ” कायापालट ” हा उपक्रम राबवण्याचा निर्धार दिलीप ठाकूर व नागनाथ महादापुरे यांनी केला आहे. वर्षभरात 74 उपक्रम राबविणाऱ्या दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमात आणखी एकाची भर पडल्यामुळे त्यांचे व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.