( आज दि.०४ जून २०२१ अहमदपूर व परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडणारे मा.अशोककाका केंद्रे यांचा वाढदिवस.त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा आढावा.)
माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते.काही माणसे जन्मतात, वाढतात व एके दिवशी हे जग सोडून निघून जातात. त्यांची अवस्था ही ‘कहां गये तो कही भी नही, और क्या लाया तो कुछ भी नही ‘असी होते.अशा माणसाच जन्मन व जगणं हे भुईला भार आहे असे संत म्हणाले.खरे तर जन्माला येऊन कर्तबगारीला धार असावी लागते. तीच माणसे समाजासाठी आदर्शवत असतात. जगण्याला धार असणारे व मानवता ज्यांच्या नसानसात भरलेली आहे असे मानव्याचे दिपस्तंभ म्हणजे मा. अशोक काका केंद्रे होत.
केंद्रेवाडी ता.अहमदपुर जि.लातुर सारख्या एका छोट्या गावात पिता निवृत्तीराव व माता जनाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.घरात वडीलांपासूनच वारकरी सांप्रदायाचे वातावरण. वडीलही दानशूर म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले. त्यांना दोन मुले व तीन मुली असा परिवार. घरात शिस्तीचे वातावरण .तो काळ देश सेवेने भारलेला.त्याचा परिणाम निवृत्ती रावांच्या दोन्ही मुलांवर झाला.ज्यात वडील मुलगा अनिरुद्ध व छोटा मुलगा अशोक या दोघांनीही भारतीय लष्करात जाऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला व दोघेही सैन्यात भरती झाले. मायभूमीची डोळ्यात तेल घालून सेवा केली. मातृभूमीला परत आले. पण तेथील देशसेवेचे संस्कार या बांधवांना शांत बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी देशसेवेसाठी सैनिक घडवणारी एखादी संस्था उभी करावी असा निर्णय घेतला व श्री साई मिलिट्री फाउंडेशन रुध्दा पाटी अहमदपुरची स्थापना झाली. बघता बघता त्यांच्या या फाउंडेशन मधील शिक्षणाचा नावलौकिक सर्वत्र पसरला व या फाउंडेशन मध्ये आज मितीला १०००ते १५०० विद्यार्थी भारतीय सैन्यात जाण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत.ही सेवा मागील अनेक वर्षापासून ते देत आहेत.आजतागायत या संस्थेच्या माध्यमातून ३०,००० पेक्षा अधिक युवक भारतीय सैन्यात भरती झाले आहेत व प्रत्यक्ष सीमेवर देशाची सेवा करत आहेत. अनेक वेळा केवळ देशसेवेच्या गप्पा मारणारी अनेक मंडळी आपण पाहतो पण प्रत्यक्ष कृतीतून हे सत्यात उतरवण्याचे काम त्यांनी केले आहे. केवळ एवढ्या कामावरच ते थांबले नाहीत तर आज ज्या पर्यावरण संवर्धनाची गरज शासनाकडून पोटतिडकीने सांगितली जात आहे, ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’ असा सर्वत्र दर वर्षी जून-जुलै महिन्यात टाहो फोडला जातो पण म्हणावी तशी कृती दिसत नाही पण अशोक काका यांनी या संस्थेच्या परिसरात ०२ लक्ष वृक्ष लागवड केली आहे व लेकरा प्रमाणे त्याची जपणूक केली आहे. माळरानावर नंदनवन फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे.तसेची मातृभूमी केंद्रेवाडी या गावातही ५०० पेक्षा अधिकचे वृक्ष लावले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांच्या गावाला प्राप्त झाला आहे.तत्कालीन मंत्री जयंत पाटील साहेबांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची प्रशंसाही केली आहे.आज गावात नव्वद टक्के सूविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.मातृभुमिवर जिवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचे काम काकांनी केले आहे.
वृक्षा बरोबरच गायीची व आईची सेवा ही ते करताना दिसतात. गाईला आपल्याकडे मायीचा दर्जा दिला जातो अशा ३०० गाईंचे संगोपन आजही ते करतात.तसेच ‘मातृदेवोभव ‘ असी आपली संस्कृती सांगते.त्या आई जनाबाई यांची सेवा ही ते मनोभावे करतात.आज आईचे वय १०५ वर्षाचे आहे. तरी ही तब्येत खूप चांगली आहे.आधुनिक पुंडलिक म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते चुकीचे ठरणार नाही इतकी सेवा ते आईची करताना दिसतात.
अशोक काकांचे काम इतके विविधांगी आहे की त्या कामाला शब्दात बांधणे कठीण आहे.राजकीय क्षेत्रातील पंचायत समिती अहमदपूरचे सभापती किंवा सध्या किनगाव सर्कलचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य या नात्याने त्यांनी केलेली अनेक कामे चिरस्मरणात राहावीत अशी आहेत.गावोगाव बिसलेरीचे प्लॅंट त्यांनी स्वतः उपलब्ध करून दिले आहेत. राजकारणात त्यांची सर्वाधिक श्रद्धा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या वरती आहे. म्हणून साहेबांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम ते विविध उपक्रमातून साजरे करतात. आपल्या संस्थेत त्यांनी साहेबांचा पुतळा उभा केला आहे, अहमदपूरला स्व. गोपीनाथराव मुंडे चौक निर्माण करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अहमदपूर तालुक्यात गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने ५० पेक्षा अधिक बसस्थानकावर प्रवासी निवारे उभे केले आहेत.
दीनदलित वंचितांसाठी त्यांचा हात सतत देत असतो.अनेक गरीब लोकांना त्यांनी वैद्यकीय सेवा पुरविल्या आहेत. ऑपरेशन साठी मोफत पैसे देणे, नैसर्गिक आपत्तीत गरिबावर संकट कोसळले तर त्याला संसारोपयोगी वस्तू किंवा पैशाच्या रूपाने मदत करण्याचे कामही ते करतात.चिखली ता.अहमदपूर येथील स्वामी नावाच्या परिवाराला असीच भरभरून मदत त्यांनी केली आहे.’पाहणारे डोळे मदत करणारे हात ‘हा महाराष्ट्रात एक अनोखा उपक्रम ते श्री. रोकडोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केंद्रेवाडीच्या सहकार्याने राबवतात.त्यात जिल्ह्यातून दहावीला नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करतात.राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील एका आदर्श शिक्षकांची निवड करून त्याचा सत्कार ते करतात.त्यात माझी निवडही त्यांनी मागील दोन वर्षांपूर्वी केली होती.तसेच अनाथ आहेत ज्यांना कोणीच नाही अशा अनेक कुटुंबांना नगदी मदत व वस्तूचे रूपाने ते मदत करतात.याकामी त्यांना माधव केंद्रे गुरुजी यांचे सहकार्य लाभते. त्यांनी गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम आयोजित केले आहेत. विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकून त्यांना काम करण्यास प्रोत्साहन देण्याची वृत्ती काकांकडे आहे. दुर्गा महोत्सव, गणेशोत्सव, वारकरी सप्ताह आयोजन असे अनेक उपक्रम ते आपल्या संस्थेत आयोजित करतात. ईद सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना काही सहकार्य ते करतात. मुस्लीम व दलित बांधवांसाठी पाणी टंचाईच्या काळात मोफत पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी २५ हजार लिटरचे एक टॅंकर घेतले असून या टॅंकरच्या माध्यमातून घरपोच पाण्याची व्यवस्था मागील अनेक वर्षापासून ते करत आले आहेत. रुध्दा पाटी येथे त्यांनी स्वतः मंगल कार्यालय उभारले असून तिथे अनेक जणांचे विवाह विनामूल्य लावून दिले जातात. त्यांनी अकरा मुलींना स्वतःच्या मुली समजून त्यांची लग्ने लावून दिली आहेत संपूर्ण संसारोपयोगी साहीत्यही दिले आहे.
मुळात काकांचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या परिवाराचा स्वभाव हा धार्मिक आहे.अहमदपूर व परिसरात कुठेही धार्मिक कार्यक्रम असो तिथे हे पती-पत्नी आवर्जून उपस्थित असतात, जाताना रिकाम्या हाताने जात नाहीत. काहीतरी घेऊन जातात व देऊन येतात. अनेक सप्ताहात शेवटच्या महाप्रसादाची जबाबदारी त्यांनी कित्येक वेळा पार पाडली आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या परिचयाच्या महाराजांची सेवा ते अत्यंत निष्ठेने करतात. परम श्रध्देय शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर ही त्यांची भक्ती होती. महाराजही त्यांना पुत्रवत प्रेम द्यायचे.मराठवाड्यात अग्निसंत म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे कलियुगातील संत माधवबाबा मोळवणकर यांच्या देवस्थानाला ते सर्वतोपरी वेळोवेळी मदत करत आले आहेत. कमान बांधकामही त्यांनी करून दिले आहे. तसेच हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर,भगवानबाबा मंदिर, अशी मंदिरे त्यांनी त्यांच्या साई मिल्ट्री फाऊंडेशन परिसरात उभारली आहेत. दोघेही पती-पत्नी अत्यंत भाविकतेने ईश्वर भक्ती करताना दिसतात.
त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती. दोन्ही भाऊ आजही एकत्र राहतात.एका विचाराने निर्णय घेतात. आपली मुले व मुली उच्चशिक्षित बनवली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांची मुले व जावई कार्यरत आहेत. काका स्वतः निर्व्यसनी आहेत हे सांगताना खरोखरच अभिमान वाटतो. हे दांपत्य जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी होतात. धनाचा अभिमान त्यांच्या ठायी कुठेच दिसत नाही. ‘अतिथी देवो भव’असे आपण म्हणतो पण त्यांच्या घरी गेल्यावर कळते की खरोखरच ते अतिथींची सेवा देवा इतकीच मनोभावे करतात.त्यांच्याकडे चांगल्या कामासाठी काही अपेक्षा ठेवून माणूस गेला आहे आणि तो निराश होऊन परत आला आहे असे घडतच नाही. याचा अनुभव मी घेतला आहे, माझ्या पुस्तकाचे प्रकाशन परम श्रध्देय हरिहर महाराजांचे हस्ते किनगाव ता.अहमदपूर येथे होते. काकांना त्या कार्यक्रमाला मी निमंत्रित केले होते. प्रकाशनानंतर काकांनी पुस्तक बघीतले व म्हणाले सर, आमच्या संस्थेला शंभर पुस्तके द्या. मी भारावून गेलो, पण मला वाटले बऱ्याच वेळेला राजकीय माणसे आश्वासन देतात आणि पुन्हा विसरून जातात.मी पुन्हा फोन केला ते म्हणाले कधीही घेऊन या आणि पैसे घेऊन जा. १०० पुस्तके गाडीत टाकून त्यांच्या मिलिट्री फाउंडेशनला गेलो,तीथे चौकशी केली असता काका बाहेरगावी असल्याचे समजले,वाटले झाला धोका,आता चला वापस,पण काकांच्या मागील स्वभावावरून आशा सोडली नाही. काकांना फोन लावला व मी आल्याचे सांगितले,काका म्हणाले सर, दहा मिनिट थांबा,तुमची व्यवस्था होईल. पाच मिनिटांनंतर एक माणुस गेटमधून बाहेर माझ्याकडे आला व मला मध्ये घेऊन गेला. त्याने काकांचे मोठे बंधू अनिरुद्धजी यांची भेट घातली. त्यांनी मला बसवले, नाश्ता खाऊ घातला, चहा पाजवला व विचारले, बोला सर, मी कारण सांगितले,त्यांनी अवघ्या दोन मिनिटात १०० पुस्तके गाडीतून उतरून घ्यायला लावली व १०.००० रुपये हातात ठेवले व आग्रह केला की सर जेवण करून जा. मी अवाक झालो, मला कळतच नव्हते की हे कसले आतिथ्य! असे आतिथ्य फक्त आपण भाषणात सांगतो इथे ‘अतिथी देवो भवचा’प्रत्यक्ष अनुभव आला आणि मी भारावून गेलो.
एक आदर्श पती,पिता,समाजसेवक, राजनेता, देशभक्त अशी कितीतरी गुणवैशिष्ट्ये त्यांची आपणास सांगता येतील.
अशा या मानव्याचा दिपस्तंभ असणाऱ्या ज्यांच्या नावातच कसलाच शोक नाही अस्या आमच्या अशोक काकांना खरे तर हे सगळे काम करण्यासाठी सहकार्य लाभते. ते त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या भगिनी सौ.आयोध्या ताई यांचे.त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल काय लिहावे, पतिव्रतेची सगळी लक्षणे कुठे शोधायचे असतील तर इथे मिळतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा लेख लिहिल्या शिवाय त्यांच्या कार्याला न्याय मिळणार नाही व मलाही समाधान लाभणार नाही. त्यांच्या सहकार्यामुळेच काका हे सर्व काम करू शकतात.त्यासोबतच त्यांचे वडीलबंधु अनिरूध्दजी व परिवारातील सर्व सदस्य यांचे सहकार्य ही शब्दातीत आहे. अशा या आदर्श कुटुंबाला मी नमन करतो.काकांना पुढे दीर्घायुरारोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देवुन थांबतो.
प्रा. डॉ. रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि. नांदेड.
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५