नांदेड, दि. 5 :- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी शिवस्वराज्याचा अभिषेक केला. याच्या प्रित्यर्थ 6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून शासनातर्फे साजरा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती पुढे सरसावल्या आहेत. जिल्हा परिषदेत सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य समारंभ होईल. सकाळी 9 वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन केले जाईल. पालकमंत्री अशोक चव्हाण हे या कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधून शुभेच्छा देतील.
हा कार्यक्रम साजरा करतांना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे / नियमांचे पालन करुन शिवराज्य दिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये “शिवस्वराज्य दिन” साजरा करतांना पुढील निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. भगवा स्वराज्यध्वज संहितेनुसार ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा 3 फुट रुंद आणि 6 फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहितेत शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा. सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकु, ध्वनीक्षेपक या आवश्यक साहित्याचा वापर करावा.
6 जून सकाळी 9 वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्यावा. शिवरायांना सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधवा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणुन सांगता करावी. सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवुन द्यावा.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरुन घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शक कर्ते ही झाले. तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करुन स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्यांची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे.