▪ जिल्ह्यातील कोविड-19 सह कृषि विभागाचा पालक सचिवांनी घेतला आढावा
नांदेड :- विकेल ते पिकेल याचा अर्थ केवळ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अथवा शेतीचे उत्पादन घेऊन बाजारात बसणे किंवा शेतकऱ्यांना बाजारात बसविण्यासाठी मदत करणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही. कृषि विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांशी समन्वय साधत यादृष्टिने शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे व हे प्रक्रिया करुन उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव कसा मिळेल याचे संपूर्ण कसब देण्यापर्यंतची भूमिका ही शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आहे. कृषि विभागातील विशेषत: ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी येवढी व्यापक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहण्याचे निर्देश कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकास योजनांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचे कृषि अधिकारी उपस्थित होते.
विकेल ते पिकेल यासाठी तालुका पातळीवरुन ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजेत, ज्या गतीने शेतकऱ्यांचे गटस्थापन करुन त्यांनी गुणवत्तापूर्ण केलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी ग्रामीण भागात कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. ही दक्षता घेतली तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालातून मिळतील, असे पालक सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. कापसासारख्या पिकासाठी “एक गाव एक वान” जर लागवडीखाली आले, कापसाच्या उत्पादनाला काढणी पश्चात तंत्रज्ञानाची जोड मिळाली, गोळा केलेला कापूस कचरा विरहित जर गोळा केला गेला तर अशा कापसाला अधिकचा भाव मिळू शकेल. धागा चांगला यावा यासाठी कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. स्मार्ट कॉटनसाठी अग्रह धरला पाहिजे व शिवाय कापसावर बोंडआळी व्यतिरिक्त बोंडसरसाठी अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यात देगलूर, अर्धापूर आणि इतर काही ठिकाणी करडी, हळद व इतर पिकातून झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा व शासनस्तरावरुन व्हावयाची कार्यवाही लक्षात घेऊन त्यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीस डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तपासणीचे प्रमाण कोणत्याही परिस्थितीत कमी व्हायला नको याची दक्षता घेण्याचे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सुपर स्प्रेडर कालावधी आणि त्यासाठी योग्य ती घ्यावी लागणारी दक्षता आतापासूनच असायला हवी. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रावर टेस्ट किट्स आणि इतर बाबी उपलब्ध राहतील याबाबत दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.