राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कंधार तालुक्यास भेट देवून कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची केली पाहणी

कंधार ; प्रतिनिधी

११ जून २०२१ रोजी शुक्रवारी राज्याचे सचिव, कृषी तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी कंधार तालुक्यास भेट दिली व कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचा योजनांचा शुभारंभ करण्यात आला. उस्माननगर येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम या बाबीखाली लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन एमएयुएस 162 या वाणाचे प्रात्यक्षिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. याठिकाणी सोयाबीन पेरणीपूर्वी उगवणशक्ती चाचणीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले त्याचबरोबर सोयाबीन बियाणे बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी सहाय्यक सोपान उबाळे ,सतीश गोगदरे , परमेश्वर मोरे , गोविंद तोटावाड यांनी करून दाखवले.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांशी या पद्धतीच्या बाबतीत मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांशी संवाद साधला. घरचे बियाणे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. एक गाव एक वाण या उपक्रमांतर्गत तालुक्यात सहा गावांची निवड करण्यात आली.तेलंगवाडी तालुका कंधार येथील शेतकऱ्यांनी याअंतर्गत अंकुर सिडस कंपनी उत्पादीत बियाण्याची निवड केली.शेतकर्यांनी खरेदी केलेल्या बियाण्याचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करण्याबाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.उस्माननगर परिसरात भाजीपाला बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर शेडनेट मध्ये घेण्यात येतो या ठिकाणी एकनाथ डवले यांनी भेट दिली व भाजीपाला बीजोत्पादक शेतकरी विष्णुदास इंगोले संतोष गवारे दत्तात्रय घोरबांड संजय ताटे यांचेशी सविस्तर चर्चा केली.

दाताळा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीचे अवजारे बँकेची पाहणी केली.हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबविलेल्या विविध योजनांची माहिती घेतली.

माननीय सचिव यांच्यासोबत लोहा कंधार चे आमदार मा.आ.श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे ,उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड रविकुमार सुखदेव , विभागीय कृषि अधिकारी देगलूर माधव सोनटक्के, तहसीलदार कंधार व्यंकटेश मुंडे, मंडळ कृषी अधिकारी बारूळ रमाकांत भुरे, कृषी सहाय्यक राठोड ,काकडे, कदम, कृषी सेविका पल्लवी कचरे , उज्वला देशमुख यांची उपस्थिती होती.दत्ता पाटील ,बालाजी कळम, देशमुख ,गणेश शिंदे, बालाजी गाडेकर व शेतकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *